यशवंतराव चव्हाण (8)

मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी यशवंतरावांना कराड सोडून कोल्हापूरला जावे लागले.  राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.  त्यावेळी प्राचार्यपदी डॉ. बाळकृष्ण होते.  तर्कशास्त्र विषय प्रा. ना. सी. फडके शिकवीत.  फडके यांची शिकविण्याची पद्धत यशवंतरावांना खूप आवडायची.  एक अभ्यासू, हुशार मुलगा या नात्याने डॉ. बाळकृष्ण यांचे ते आवडते विद्यार्थी बनले.  वाचन-मनन-चिंतन या संवयीचा यशवंतरावांना कॉलेज जीवनात खूप फायदा झाला.  कोल्हापुरातील वास्तव्यात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे बहुमोल कार्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले.  सत्यशोधक चळवळीचाही जवळून अनुभव घेतला.  त्यांना या चळवळीबद्दल खूप आपुलकी वाटायची.  तथापि या चळवळीत सामील होण्याऐवजी त्यांनी राष्ट्रीय विचारांच्या काँग्रेसची निवड केली.  बहुजनांचे हित काँग्रेसच्यामार्फत साध्य करता येईल असे त्यांचे ठाम मत झाले होते.  म्हणून त्यांनी बंधू गणपतराव हे कराड म्युनिसिपल निवडणुकीत काँग्रेस विरोधी उमेदवार म्हणून उभे राहिले असता त्यांच्या विरोधी प्रचार केला आणि त्यांना पराभूत केले.  तत्त्वाच्या आड बंधुप्रेम येऊ दिले नाही.

कॉलेजात शिकत असताना वेगवेगळी राजकीय विचारसरणी समजावून घेण्याची, समाजवादी, साम्यवादी, तत्वज्ञानाचा परिचय करून घेण्याची भूमिका स्वीकारून यशवंतरावांनी उपलब्ध राजकीय ग्रंथांचे वाचन केले.  ''रशियन राज्यक्रांती''चा अभ्यास करताना त्यांनी मनाला विचारले की भारताला हे ठोकळेबाज तत्त्वज्ञान मान्य होईल का, ते या भूमीत रुजेल का ?  रॉयवादाकडे ते आकर्षित झाले होते, तथापि डोळसपणाने ते वेळीच त्यापासून दर झाले.  आपल्या देशाला समाजवाद हवाय पण तो भारतीय संस्कृतीशी सुसंगत लोकशाही समाजवाद हवा अशी त्यांची धारणा बनली होती.  आपण नवे नवे शिकावे, त्यासाठी नवे नवे वाचावे, चर्चा करावी, संवाद करावा या मनोधारणेमुळे कॉलेज जीवनातच त्यांनी भावी सार्वजनिक जीवनाचा पाया भक्कम केला.  कोल्हापुरातील वास्तव्यामुळे त्यांना साहित्याचा, कलांचा, कुस्तीसारख्या क्रीडेचा आनंद लुटता आला.  राजाराम कॉलेजात त्यांचा के. डी. पाटलांशी स्नेह जडला.  हा स्नेह व सहकार्य पुढे राजकारणातही लाभले.  १९४६ च्या निवडणुकीत यशवंतराव आणि के. डी. पाटील हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन आमदार झाले.  आमदार चंद्रोजी पाटील उर्फ कारभारी यांच्या खून प्रकरणी के. डी. पाटलांवर संशय व्यक्त करण्यात येऊन त्यांचाही खून करण्यात आला.  यशवंतराव एका तरुण-उमद्या मित्राला पारखे झाले.  यशवंतरावांना या प्रकरणी बदनाम करण्याचा प्रयत्‍न झाला.  पण तो अयशस्वी ठरला.