यशवंतराव चव्हाण (12)

:  २  :

तुरुंगात आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन यांच्यासारख्या थोर मंडळींचा सहवास यशवंतरावांना लाभला.  पुस्तके वाचायला मिळाली, चर्चा ऐकायला मिळाल्या.  एस. एम. जोशी, विनायकराव भुस्कुटे आदि मंडळीची याच बराकीत होती.  पुणे-नगर येथील विद्यालयांचे काही विद्यार्थी पण होते.  एके दिवशी आचार्य भागवतांनी विद्यार्थ्यांना एकत्र बोलाविले आणि सांगितले, 'येथील वेळ बुद्धी आणि मन संस्कारित करण्याचे प्रयत्‍नांत घालवा.  उपलब्ध होणारी पुस्तके वाचा.  वामन बापट, डॉ. लागू, कराडचे श्री. दयार्णव कोपर्डेकर, सोलापूरचे भोसले आदींनी एकत्र येऊन आचार्य भागवतांचा सल्ला कृतीत आणायचे ठरविले.  राघुअण्णा लिमये, ह. रा. महाजनी हे पण तुरुंगात दाखल झाले.  त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी वाचनाचे वर्ग सुरू करण्यात आले.  ह. रा. महाजनी विद्वान आणि पंडित.  संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व.  म्हणूनच त्यांना महाजनीशास्त्री असे संबोधिले जाई.  महाजनींनी राजबंदी विद्यार्थ्यांना 'शाकुंतल' नाटक आणि आचार्य भागवतांनी 'ज्युलियस सीझर' नाटक शिकविले.  आचार्य भागवत गांधीवादी होते.  गांधीवाद ते उत्तम प्रकारे विशद करून सांगत.  बराकीत गांधीवादाबरोबरच समाजवाद, मार्क्सवादाचीही चर्चा होत असे.  एस. एम. जोशी, ह. रा. महाजनी आदि मंडळी गांधीवाद स्वीकारण्याऐवजी समाजवादाचा विचार मांडीत.  विनायकराव भुस्कुटे मार्क्सवादाचा आग्रह धरीत.  'टेन डेज, दॅट शुक द वर्ल्ड' हे जॉन रीड यांचे पुस्तक बाराव्या बराकीत लोकप्रिय झाले होते.  यशवंतरावांनी ते वाचल्यावर लेनिन यांच्यासंबंधीची आपली आदराची भावना द्विगुणित झाली असे त्यांनी श्री. महाजनींजवळ बोलून दाखविले.  चर्चेत महाजनी मानवेंद्रनाथ रॉय यांचा वरचेवर उल्लेख करीत.  लेनिनबरोबर एम. एन. रॉय यांनी काम केलेले आहे, मेक्सिकोमध्ये त्यांनी कम्युनिझमचा स्वीकार कसा केला हे महाजनी आणि भुस्कुटे यांच्याकडून यशवंतरावांना ऐकायला मिळायचे.  तुरुंगातून सुटल्यावर कांही मित्रांच्या सहवासामुळे आणि आग्रहामुळे यशवंतरावांनी रॉय यांच्या विचारांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.  एका बाजूला आचार्य भागवत आणि दुसर्‍या बाजूला विनायकराव भुस्कुटे.  एक गांधीवादी तर दुसरा मार्क्स-लेनिनवादी.  'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' वाचल्यावर मार्क्सच्या विचारांचा यशवंतरावांच्यावर पगडा बसला.  तथपि मार्क्सच्या मार्गाने भारताचे प्रश्न सुटतील अशी त्यांना खात्री वाटत नव्हती.  बराकीत महराष्ट्राच्या राजकारणावरही चर्चा होत असे.  त्या चर्चेतून यशवंतरावांना आढळून आले की, शहरी नेत्यांचा ग्रामीण समाजाबद्दल मोठा गैरसमज आहे.  त्यातली उच्चभ्रू मंडळी सत्यशोधक चळवळ आणि महात्मा फुले यांच्याविषयी फारशी माहिती नसताना टीकेच्या स्वरूपात काहीही बोलायची.  एस. एम. जोशी, ह. रा. महाजनी यांच्यासारखे कांही अपवाद होते.  बारा नंबरच्या बराकीचे वैशिष्ट्य असे होते की त्या बराकीत चर्चा, वादविवाद, शिक्षण एवढेच काम चालायचे नाही तर बराकीचे एक बुलेटिन पण निघायचे.  ह. रा. महाजनी एका पाटीवर 'बजरंग' या नावाने मजकूर लिहायचे आणि सर्वत्र फिरवायचे.  त्यांची शैली, त्यांचा अभ्यास पाहिल्यावर कित्येकांनी बोलून दाखविले की महाजनी हे पुढे मोठे लेखक होणार आणि ते खरेही झाले.