यशवंतराव चव्हाण (14)

१९३५ च्या कायद्यानुसार प्रांतिक सरकारांच्या निवडणुका घेतल्या जाणार आणि त्यात सर्व राजकीय पक्ष उतरणार असे वातावरण दिसू लागले.  त्यावेळी यशवंतराव ज्युनिअर बी. ए. च्या वर्गात होते.  १९३७ च्या प्रारंभी निवडणुका होणार असे जाहीर करण्यात आले.  काँग्रेसने या निवडणुकात भाग घ्यावा की नाही यावर खूप चर्चा झाली आणि अखेर निवडणुका लढवाव्यात असा निर्णय झाला.  सातारा जिल्ह्यात काँग्रेसला विजयी करण्याचा निश्चय सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केला.  यशवंतरावांना ज्युनिअर बी. ए. ची विद्यापीठाची परीक्षा नव्हती.  त्यामुळे त्यांनी जिल्ह्यात हिंडून कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला व त्यांची मने व मते निवडणुकीच्या दृष्टीने तयार केली.  दोन वर्षांपूर्वी झालेल्या मध्यवर्ती असेंब्लीच्या निवडणुकीची आठवण त्यांनी आपल्या सहकारी तरुण कार्यकर्त्यांना करून दिली.  ही निवडणूक काँग्रेसतर्फे श्री. काकासाहेब गाडगीळ आणि तात्यासाहेब जेधे यांनी जिंकली होती.  त्यावेळी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी पराकाष्ठेचे प्रयत्‍न केले होते.  विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली.  भाऊसाहेब सोमण हे जिल्ह्याचे नेते होते.  त्यांना जाऊन भेटायचे आणि ग्रामीण भागातला आपला उमेदवार मागून घ्यायचा असे यशवंतरावांसह सर्व तरुण कार्यकर्त्यांनी ठरविले.  त्याप्रमाणे आत्मारामबापू पाटील, रामभाऊ पाटील आणि यशवंतराव हे तिघेजण भाऊसाहेबांना भेटले.  भाऊसाहेबांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.  भाऊसाहेब शेवटी म्हणाले, ''तुमचे म्हणणे ठीक आहे.  तथापि उमेदवार हा पोक्त असला पाहिजे.  लोकांमध्ये चांगला माहीत असायला पाहिजे आणि निवडणुकीचा मोठा खर्च करू शकेल असा ऐपतदार पाहिजे.''  भाऊसाहेबांच्या या बोलण्यातून जो अर्थ काढायचा तो यशवंतरावांनी काढला आणि बोरगांवला निवडक दहा-बारा कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली.  बरीच चर्चा झाली.  वाळव्यातून कांही लोक आले होते.  कराड तालुक्यामधून राघूअण्णा लिमये व यशवंतराव चव्हाण उपस्थित होते.  आत्मारामबापू पाटील यांनी निवडणूक लढवावी असा कल चर्चेतून दिसून आला.  भाऊसाहेबांचा शब्द अखेरचा न मानता प्रांतिकच्या नेत्यांना पटवून द्यायचे असे या बैठकीत ठरविण्यात आले.  महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व शहरी आहे, त्याला ग्रामीण भागाची व तेथील कार्यकर्त्यांची जाण नाही हे सर्वांना ठाऊक होते.  केळकर-भोपटकर आदि काँग्रेसची नेते मंडळी, एखादा वृद्ध वकील किंवा डॉक्टर यांची निवड करतील याचाही अंदाज तरुण कार्यकर्त्यांनी बांधला होता.  सातारा आणि कराड असे दोन मतदारसंघ होते.  कराडमध्ये कराड, वाळवा आणि आसपासचा भाग होता.  या मतदार संघासाठी आत्मारामबापू पाटील यांचा आग्रह धरण्यात आला.  ते शतेकरी कुटुंबातील होते आणि त्यांच्या दोघा बंधूंनी निवडणूक लढविण्याची त्यांना मुभा दिली होती.  बापू अविवाहित होते.  शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेले होते, वक्तृत्व चांगले होते.  भाषा शुद्ध, स्वच्छ होती.  व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते.  १९३० व १९३२ च्या दोन्ही आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला होता.  सोमणांचे मन वळविण्याकरिता बुवासाहेब गोसावी व शंकरराव साठे यांची मदत घेण्यात आली.  राघूअण्णा लिमये व यशवंतराव या दोघांनी या दोन्ही नेत्यांपुढे आपली बाजू मांडताना बदलत्या राजकारणाची, बदलत्या नेतृत्वाची त्यांना कल्पना दिली.