यशवंतराव चव्हाण (16)

मुंबई कौन्सिलचे अधिवेशन पुण्यात भरले असताना आत्मारामबापू पाटलांच्या पाहुणचारासाठी यशवंतराव चार दिवस पुणे येथे गेले होते.  'महार वतन नष्ट करा' या मागणीसाठी एक मोठा मोर्चा श्री. खेर यांना भेटण्यासाठी गेला असताना खेरांनी मोर्चेवाल्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.  महारांना जमिनी वतन म्हणून दिल्यानंतर त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पिढ्यान् पिढ्या, जन्मभर गांवगाड्याचे काम करून घ्यायचे ही पद्धत या महान वतनात होती.  त्यात बदल होण्याची गरज होती.  डॉ. आंबेडकरांनी त्यासाठी प्रयत्‍न सुरू केले होते.  आत्मारामबापूंना आणि यशवंतरावांना आंबेडकरांची मागणी न्याय्य वाटत होती.  कांही आमदारांना त्यादृष्टीने त्यांनी तयार केले.  पण त्याचा कांही उपयोग झाला नाही.  राजकारण करताना सामाजिक जाणिवांचे भान ठेवून पुढे गेले पाहिजे तरच मुख्य प्रवाहापासून अलग राहिलेला समाज राष्ट्रय चळवळीत येईल याची खूणगांठ यशवंतरावांनी मनाशी बांधली.  इंग्रजांचे राज्य गेले, स्वातंत्र्य मिळाले, म्हणजे सर्व कांही मिळाले असे होणार नाही.  राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक, आर्थिक जीवनही बदलले पाहिजे, विषमता दूर झाली पाहिजे असा अर्थ निश्चित करून यशवंतराव समाजवादाच्या विचाराकडे वळले.

आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण आदि नेत्यांनी काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  राघूअण्णा लिमये आदि सहकारी कार्यकर्त्यांचे मत पडले की या पक्षात सामील व्हावे.  त्याप्रमाणे यशवंतरावांनी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय मनाशी घेतला.  एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्याशी चर्चा करून राघूअण्णा लिमये कराडला परतले की ते कार्यकर्त्यांना जोशी-गोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करून सांगत.  याच सुमारास मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आत्मारामबापू पाटील, लक्ष्मणशास्त्री जोशी, ह. रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी मंडळी यांच्याकडे वळली होती.  काँग्रेस समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अधिवेशन १९३५ मध्ये कराड येथे घेण्याचे निश्चित झाले.  यशवंतराव आणि राघूअण्णा यांनी चिटणीस, सहचिटणीस म्हणून परिषदेची जबाबदारी स्वीकारली.  अध्यक्षस्थानी युसूफ मेहेरअली होते.  त्यांचा आणि यशवंतरावांचा परिचय झाला.  मेहेरअली यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा त्याग, त्यांचा उमदेपणा याचा यशवंतरावांवर प्रभाव पडला.  ही परिषद कराडमध्ये चालू असताना रॉयवादी मंडळी कराडमध्ये मुक्काम ठोकून होती आणि समाजवाद्यांना हिणवीत होती.  परिषद संपल्यावर यशवंतरावांनी काँग्रेस समाजवादी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  रॉय यांच्या प्रभावाखाली काम करणार्‍या मंडळींनी त्यांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले होते.  रॉय यांचे विचार, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा त्याग, त्यांचा कम्युनिझमचा अभ्यास आदि बाबी यशवंतरावांना आकर्षित करीत होत्या.  आत्मारामबापू पूर्णतः रॉयवादी बनले होते.   महाजनी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री प्रभृती यशवंतरावांना मानवेंद्रनाथ रॉय यांचे वाङ्‌मय वाचायला देऊन आपल्या कळपात ओढण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्‍न करीत होते.  तथापि काँग्रेस संघटना. नेहरू-गांधी यांचे नेतृत्व, काँग्रेस कार्यकर्त्यांचा संच, शेतकरी, कामगार, गरीब, दलित यांचे हित डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसमध्येच राहण्याचा ठाम निर्णय यशवंतरावांनी घेतला.