यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६५

पण लवकरच एक शृंगापत्ती त्यांच्यापुढे उभी राहिली.  मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक गट काँग्रेसमध्ये निर्माण झाला.  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भय्याशास्त्री वाटवे, ह. रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी प्रभृती त्या गटात होते.  यशवंतरावांचे त्यांच्यापैकी काहींशी वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध होते.  यशवंतरावांनी काँग्रेस समाजवादी पक्षात जावे, हे या मंडळीला पसंत नव्हते.  

''(समाजवादी) मंडळी खरा समाजवाद देशात आणू शकणार नाहीत.  हे गांधींचा अहिंसावादच समाजवादाच्या परिभाषेत मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यांच्या वैचारिक भूमिकेत मूलभूत असे काहीही क्रांतिकारकत्व नाही.  हिंदुस्थानचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटायचे असतील, तर स्वराज्याची चळवळ अशा कार्यक्रमांवर व अशा पद्धतीने बांधायला पाहिजे, की तिची जसजशी प्रगती होईल, तसतसे त्यातून समाजवादाचे स्वप्न साकार व्हायला मदत होईल,'' (कित्ता, १८७) अशी भूमिका रॉयवादी घेत असत.  

यशवंतरावांना निवड करायची होती.  त्यांनी विचार केला : समाजवादी बुद्धिमान व देशभक्त निःसंशयपणे आहेत.  पण ते पुस्तकी आहेत, हस्तिदंती मनो-यात बसून चिंतन करणारे आहेत, लोकांच्या प्रश्नांचे त्यांना यथार्थ आकलन नाही.  त्यांच्या पुस्तकी विचारांना शहरी झालर आहे, जनतेमधील आंदोलनाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मुळीच नसल्यामुळे ते या देशात समाजवाद आणू शकणे असंभवनीय आहे.  याउलट रॉय तुरुंगातून आपल्या अनुयायांना पत्रांद्वारे जे विचार कळवीत किंवा चळवळ-बांधणीविषयी मार्गदर्शन करीत, ते पाहिल्यावर समाजवाद्यांच्या भोंगळ विचारांपेक्षा व्यक्तिमत्वानेच ते जास्त प्रभावित झाले होते, हे त्यांच्या लेखनावरून दिसते (कित्ता, १९०).  रॉय यांची तीव्र बुद्धिमत्ता, मार्क्सवादाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, रशियात लेनिनसोबत केलेले राजकीय व वैचारिक कार्य, चीन, द. आफ्रिका व मेक्सिकन क्रांतीतील प्रत्यक्ष सहभाग आणि पूर्व आशियाई देशांमध्ये ज्या भांडवलशाहीविरोधी चळवळी करायच्या, त्यांच्या आखणीतील जागतिक पातळीवरचा पुढाकार- या बाबींमुळे रॉय यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक तेजोवलय त्या काळात निर्माण झाले होते.  समाजवाद्यांपेक्षा रॉयवाद्यांमध्ये समाजवादी क्रांती घडवून आणण्याची अधिक क्षमता आहे, असे त्या वेळी यशवंतरावांना वाटून त्यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला आणि रॉयवाद्यांची सोबत धरली.