यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६२

४.  यशवंतराव आणि समाजवाद

सामाजिक पार्श्वभूमी आणि बौद्धिक तयारी

ज्या सातारा जिल्ह्यात यशवंतरावांचा जन्म झाला आणि जिथे त्यांनी नेतृत्वाची उभारणी केली, तो महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा समाजवादी विचारसरणीच्या जोपासनेत अधिक अनुकूल होता.  जमीनदार आणि त्यांची कुळे यांच्यांतील संघर्ष या जिल्ह्यात अधिक ठळक व झुंजार स्वरूपात व्यक्त झाला होता.  एकेकाळच्या मराठा साम्राज्याची इथे राजधानी असल्यामुळे पराक्रम आणि राष्ट्रभक्ती यांची दीर्घ परंपरा तिथे आधीपासून होतीच.  शिवाय टिळकप्रणित शिवाजी संप्रदायानेही या जिल्ह्याला बरेच प्रभावित केले होते.  विद्यमान परिस्थितीविषयी असमाधान आणि ती बदलण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची शोषितांची तयारी यांमधून आपोआपच समाजवादी विचाराची पूर्वपीठिका जिल्ह्यात तयार झालेली होती.  ब्राह्मणेतर चळवळीचा बालेकिल्ला या जिल्ह्यात होता.  त्या चळवळीने तिथल्या जनसामान्यांच्या मनांवर सामाजिक समता व सामाजिक न्याय या तत्त्वांचे खोल संस्कार केले होते.  शेटजी-भटजी या युतीविरुद्ध असंतोष मोठ्या प्रमाणात उसळला होता.

बहुजन-समाजातील श्रेष्ठींच्या ठिकाणी या चळवळीतून कायदेकौन्सिलातील राखीव जागा, सरकारी नोक-या, व्यवसाय-उद्योगांतील वाढीव भागीदारी वगैरेंबद्दल आकांक्षा निर्माण झाल्या, तर खालच्या श्रेणीच्या सामान्य शेतकरी, शेतमजूर वर्गांच्या ठिकाणी तिने पिळवणुकीपासून सुटका करवून सामाजिक न्याय पदरात पाडून घेण्याच्या अपेक्षा पल्लवीत केल्या होत्या.  त्यांच्यासाठी ही चळवळ केवळ ब्राह्मण जातीचे वर्चस्व झुगारून देण्यापुरती नव्हती, तर तिला वर्गवर्चस्वविरोधी स्वरूप आपसूकच प्राप्त झाले होते.

गांधींचे असहकारिता आंदोलन सामान्य शेतकरी वर्गाला जवळचे वाटले, कारण त्याचे आवाहन वरिष्ठवर्गीय श्रेष्ठींना डावलून तळपातळीवरच्या सामान्य नागरिकांना केले गेले होते.  नेतृत्वाचे पारंपारिक वलय छेदून नवे नेतृत्व उदित होण्याची शक्यता या आंदोलनातून पुढे आली होती.  स्वाभाविकच पुरोगामी पिंडाच्या सातारा जिल्ह्यातील बहुजनसमाजात नवचैतन्य प्रसृत होऊ लागले होते.  यशवंतराव हे या चैतन्याची पेरणी करणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून जिल्ह्यात वावरत होते.  काँग्रेसच्या चळवळीबद्दल आदर बाळगूनही काँग्रेस सामान्य शेतक-यांच्या प्रश्नांशी एकरूप होत नसल्यामुळे ती तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही, हे सत्य प्रस्तुत कार्यकर्ते दुर्लक्षू शकत नव्हते.  आर्थिक शोषणाचा खोलवर विचार केल्यामुळे जातिविग्रही भूमिका मांडणा-या बहुजनश्रेष्ठीपेक्षा वर्गविग्रही मांडणी करणारांकडे ते अधिक आकर्षित झाले होते.