यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६४

अर्थात या विचारमंथनातून समाजवादाची त्यांना सांगोपांग कल्पना आली होती किंवा समाजवाद कसा आणता येईल, याची दिशा स्पष्ट झाली होती, असे मात्र म्हणता येणार नाही.  कारण त्यांनीच पुढे हे कबूल केले आहे, की अतिव्याप्त अर्थानेच त्या वेळी समाजवाद शब्दाचा प्रयोग ते करीत असत.  समाजवाद शब्दामागे असलेले संदर्भांचे सगळे पदर उकलण्याऐवजी त्यांनी समाजवादाचा आपल्यापुरता एक सुटसुटीत अर्थ करून घेतला होता.  स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपण काँग्रेसचे व्यासपीठ मूलभूत मानतो आणि त्याच वेळी समाजवादही स्वीकारतो, याचा मर्यादित अर्थ-

''एवढाच, की राजकीय स्वातंत्र्य म्हणजे निव्वळ इंग्रजांचे राज्य जाऊन या देशातील जनतेची प्रगती होणार नाही, त्याचबरोबर आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मूलभूत फेरफार करावे लागतील.''

स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय न राहता सामाजिक-आर्थिक आशयही त्यास लाभावा, एवढ्या स्थूल व संदिग्ध स्वरूपातच समाजवादाचा विचार यशवंतरावांनी स्वीकारला होता.  साम्यवादी मंडळींशी शास्त्रीय समाजवादासंबंधी वादविवाद करताना आपली गडबड उडत असे, मात्र तरीही खोलात जाण्याची आपली तयारी नव्हती.  हे त्यांनी स्वच्छ शब्दांत कबूल केले आहे.  पुस्तकी विचारविमर्शापेक्षा प्रत्यक्ष जनआंदोलनाच्या अनुभवांमधूनच आपल्या देशातील परिस्थितीला अनुरूप असे समाजवादाचे प्रारूप पुढे येईल, अशी आशा त्यांनी बाळगली होती.  आपल्या समाजवादी दृष्टिकोनाने काँग्रेसनिष्ठवर मात करू नये, अशी दक्षताही त्यांनी आरंभापासून घेतली होती.  

१९३४-३५ पर्यंत काँग्रेसवर राष्ट्रवादी विचाराची एवढी गडद छाया होती, की ब्रिटिशांनी देश सोडून जाणे एवढाच नकारात्मक अर्थ काँग्रेसप्रणित स्वातंत्र्याला आला होता.  सामान्य जनतेच्या जीवनात क्रांती व्हावी किंवा सामान्य नागरिक सामाजिक-आर्थिक दास्यातून मुक्त व्हावा, हे त्या राष्ट्रवादात तोपर्यंत अंतर्भूतच झालेले नव्हते.

ही जाणीव ज्यांना प्रकर्षाने झाली, त्यांनी काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष संघटित केला होता.  राघूअण्णा लिमये यांच्यामुळे यशवंतराव या गटाशी जोडले गेले होते.  समाजवादाचा विचार खेड्यांतल्या शेतक-यांनाही आवडतो, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते.  गरीब-श्रीमंत विषमता नष्ट व्हावी, आणि जे मागासलेले आहेत, त्यांना उन्नतीच्या सर्व संधी अधिकार म्हणून मिळाव्यात, (कित्ता, १५६) या समाजवादाच्या उद्दिष्टांबाबत काँग्रेसमध्येही कुणाचे दुमत होईल, असे यशवंतरावांना वाटले नव्हते.  गरिबी आणि मागासलेपणा यांच्या ओझ्याखाली पिचलेले कार्यकर्ते मित्र समाजवादी विचाराने प्रेरित होतात, हे पाहिल्यावर काँग्रेस संघटनेत राहूनच सर्व जिल्हा काँग्रेस समाजवादी विचाराची करायची, असे मनसुबेही यशवंतरावांनी आखले होते.