यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६८

नेहरूंचा समाजवाद

यशवंतरावांनी स्वतःला 'नेहरूवादी' हेही बिरुद कधी लावले नसले, तरी त्यांनी आपल्या निष्ठा नेहरूंना समर्पित केल्या होत्या, हे स्पष्ट आहे.  रॉयच्या मार्क्सवादात उगम पावलेली त्यांची विचारसरणी नेहरूंच्या समाजवादात परिणत झाली हाती, असे रास्त विधान तर्कतीर्थांनी केले आहे.  नेहरूंच्या मार्गाने काँग्रेस गेली, तर देशात समाजवाद येईल, याची त्यांना एवढी खात्री होती, की नेहरू जे म्हणतील व करतील, तोच समाजवाद, हे त्यांनी जणू गृहीतच धरले होते.  त्यांच्या प्रारंभिक काँग्रेस-निष्ठेचे रूपांतर असे नेहरूनिष्ठेत झाल्यामुळे आपल्या मूळ समाजवादी धारणांना मुरड घालण्याचे अनेक प्रसंग पुढे त्यांच्यावर ओढवले.

नेहरूंची वैचारिक परिबद्धता समाजवादाशी निश्चितपणे होती.  रशियातील समाजवादाच्या यशाचे त्यांना कौतुक होते.  भारतातले प्रश्नही रशियातील प्रश्नांप्रमाणेच असून समाजवादाच्या मार्गाने त्यांची सोडवणूक होऊ शकेल, अशी त्यांना खात्री वाटे.  १९३६ साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात :

''समाजवाद म्हणजे अशी एक व्यवस्था, की जीमध्ये भूमी आणि भूमीची फळे यांचा समाजाच्या हितासाठी अशा तर्हेने उपयोग व्हावा, की मिळणारा लाभ खाजगी मालमत्तेच्या अपघाताने न ठरता लोकांनी केलेल्या सेवेच्या प्रमाणात ठरावा.'' ('नेहरू स्पीचेस्' खं. ३, १५६-७).

उत्पादन व वितरणाच्या साधनांचे राष्ट्रीयीकरण करून त्याद्वारे आमूलाग्र बदल घडवून आणणे हा त्यांच्या मते समाजवादाचा गाभा होता.

१९३७ नंतर क्रमशः काँग्रेसची मंत्रिमंडळे सत्तेवर आल्यानंतर आधी काँग्रेस चळवळीबद्दल तटस्थ असलेला स्थानिक भांडवलदारवर्ग काँग्रेसला पैसा व पाठिंबा पुरवू लागला, आणि मग नेहरू प्रभृतींना आपल्या समाजवादी विचारांना मुरड घालणे अनिवार्य होऊ लागले.  जोपर्यंत काँग्रेस सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या ध्येयवादाच्या बळावर उभी होती आणि जनजागृती व जनसंघटनांतूनच आपले आधार भरभक्कम करू पाहत होती, तोपर्यंतच नेत्यांची समाजवादी ध्येयनिष्ठा टिकून राहू शकली.  पुढे मात्र ती शिथिल होणे भाग ठरले.  नेहरूंनी आणि नेहरूंनंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी पुनःपुन्हा समाजवादी कार्यक्रमांचा जोरदार जाहीर पुरस्कार केला असला, तरी ख-या अर्थाने काँग्रेस कधीच समाजवादी होऊ शकली नाही.  नेहरूंच्या समाजवादाची ही अपरिहार्य शोकांतिका होती आणि स्वाभाविकच नेहरूंमध्ये समाजवादाचे आदर्श शोधणा-या चव्हाणांसारख्यांच्या पदरीही निराशा येणे त्यामुळे अटळ ठरले होते.