यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ४१

देशात निर्माण होणा-या निरनिराळ्या फुटीर प्रवृत्तींना आपण आपल्या तात्त्विक भूमिकेवरून विरोध केला पाहिजे व प्रसंगी धैर्याने व आत्मविश्वासाने पुढे पाऊन टाकले पाहिजे. कोणत्याही कारणाने काँग्रेसला व आपल्या सरकारला कमजोर होण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करू तर आपण आपले स्वातंत्र्य धोक्यात आणू. म्हणून जातीयतेचे उच्चाटन करण्याकरिता, आर्थिक समता स्थापन करण्याकरता व उत्पादन वाढवण्याकरिता काँग्रेस-संघटना मजबूत केली पाहिजे. महाराष्ट्रात बुध्दिभेद करण्याचे जे निरनिराळे प्रयत्न चालू आहेत त्यांपासून जनतेने सावध राहिले पाहिजे. कारण हे प्रयत्न देशाचा घात केल्याशिवाय राहणार नाहीत.

महाराष्ट्रात कुणी अराजक माजवण्याचा, बेशिस्त वर्तन करण्याचा व जातिभेद अगर वर्णद्वेष फुलवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उघडपमाने विरोध करण्याची आता वेळ आली आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षोपक्षांशी द्वेश-बुध्दीने अगर वैरभावाने वागण्याचा काँग्रेसचा केव्हाही हेतू नव्हता व नाही. काँग्रेसशी निष्ठावंत राहून काँग्रेसच्या शिस्तीप्रमाणे काँग्रेसजनांनी वागावे असे आमचे आवाहन आहे. काँग्रेसबद्दल ते अनुदारपणा, अप्रीती निर्माण करतील अगर बाहेरून किंवा आतून काँग्रेससंघचना दुर्बल करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या प्रयत्नानांना विरोध करणे हे हिंदी स्वातंत्र्याच्या दृष्टीने आमचे कर्तव्य होईल.’ (यशवंतराव, इतिहासाचे एक पान, पृष्ठे ९९-१००.)

पुढे काँग्रेसने पक्षात स्वतंत्र गट स्थापन करण्यास बंदी घालण्याचा ठराव मंजूर केल्यावर स्वामी रामानंदतीर्थ यांनी २८ ऑक्टोबर १९५३ रोजी शंकरराव देव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “काँग्रेस संघटनेत राहून शिस्तीच्या बाहेर गेल्याचा वास येऊ नये असे मला वाटते.” म्हणजे मुंबईला जमलेल्या यशवंतरावांसारख्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेसारखीच ही भूमिका होती.

श. का. पक्ष स्थापन करायला निघालेल्या नेत्यांनी देशातील परिस्थिती लक्षात घेतली नव्हती आणि आपली स्वत:ची राजकीय ताकद किती आणि आपण ज्या प्रकारचा समाज निर्माण करायला निघालो आहोत ते उद्दिष्ट शक्य कोटीतील आहे की नाही, याचेही भान ठेवले नाही. या उलट ज्या काँग्रेसजनांनी मुंबईत जमून पत्रक प्रसिध्द केले त्यांनी वास्तव दृष्टी दाखवली होती, हे नंतर घडलेल्या घडामोडींमुळे स्पष्ट झाले. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबईतील अधिवेशनात, देश स्वतंत्र झाल्यामुळे काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट असू नयेत असा ठराव संमत झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसजनांपैकी काहींनी जी भूमिका घेतली होती, ती या घटनादुरूस्तीला पूरक होती.

या स्थितीत यशवंतराव संसदीय चिटणीस या नात्याने, गृहमंत्री मोरारजीबाई देसाई यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. मोरारजींकडे नागरीपुरवठा, वन अशीही खाती होती. यामुळे विविध खात्यांच्या कामाची यशवंतरावांना चांगली ओळख झाली. त्या काळात पोलिस दलाचा विस्तार फार नव्हता आणि फाळणीमुळे झालेल्या वातावरणात हे दल अधिकच अपुरे पडू लागले होते. म्हणून नागरिकांचा संरक्षणात सहभाग असावा अशी कल्पना निघाली आणि यशवंतरावांना ही यंत्रणा उभारण्याच्या कामी बरीच जबाबदारी सांभाळावी लागली. मोरारजी देसाई हे कारभारात कार्यक्षम होते आणि आपल्या कामात ते यशवंतरावांना सहभागी करून जबाबदारी टाकीत असत. इतर काही मंत्र्यांनी याप्रकारचे धोरण अवलंबिले नसल्याचे दिसून आल्यामुळे, यशवंतराव कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळातच मोरारजींचे सहकारी झाले, हे बरे झाले.

सरकारने बंदी घातलेल्या पुस्तकांची तपासणी करून निर्णय देण्याचे कामही यशवंतरावांवर आले होते. मग लोककलेला सरकारी उत्तेजन देण्यासंबंधी यशवंतरावांनी एक टिपण तयार केले. ते मोरारजींनी मान्य केले व बाळासाहेब खेरही त्या टिपणावर खूश झाले होते. यातून मग तमाशा मंडळाची स्थापन झाली. असे असले तरी सरकारच्या धोरणासंबंधात पूर्णत: समाधान वाटावे अशी स्थिती नव्हती. बेचाळीसच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या गरजा व अपेक्षा काय आहेत, याची खेर व मोरारजींना काही कल्पना नव्हती आणि त्या जनतेचे खरे प्रतिनिधीही मंत्रिमंडळात जवळपास न घेतल्यामुळे, या अपेक्षांना मंत्रिमंडळात वाचा फुटण्यास संधी नव्हती.