यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३८

तथापि कौटुंबिकदृष्ट्या यशवंतरावांना ते वर्ष कटु अनुभव आणून देणारे ठरले. त्यांचे बंधू गणपतराव यांचे क्षयाचे दुखणे वाढत गेले आणि वर्षअखेरीस त्यांचे त्यातच निधन झाले. गणपतरावांच्या पत्नीलाही या रोगाची बाधा झाली होती. त्यानंतर चारएक वर्षात त्याही इहलोक सोडून गेल्या. वेणुताईनाही क्षयरोगाने ग्रासले. त्यांना मग मिरजेच्या हॉस्पिटलात हलवण्यात आले. तिथल्या डॉ. जॉन्सन यांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि वेणुताईना सहा-सात महिन्यांनी क्षयरोगापासून मुक्त केले. मग त्यांना मुंबईला आणण्यात आले. पुढील काळात त्यांची प्रकृती यथातथाच राहिली.

यशवंतरावांनी लिहिले आहे की, १९४६ सालच्या निवडणुच्या वेळी त्यांची आणि इतर तिघांची निवड अगदी सुरळीतपणे झाली, पण महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस समितीत इतक्या सुरळीतपणे गोष्टी घडल्या नाहीत. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना शंकरराव देव व त्यांचे निकटचे सहकारी यांचा वरचष्मा होता. उमेदवारांची निवड करताना शंकरराव मोरे व बाबासाहेब घोरपडे यांना तिकिटे नाकारण्यात आली. या दोघांनी बेचाळीसच्या आंदोलनाच्या वेळी सरकारची माफी मागून सुटका करून घेतली, असा त्यांच्याबद्दल आक्षेप घेतला गेला. यासाठी काही कागदपत्रेही पुराव्यादाखल जोडण्यात आली. शंकरराव मोरे यांनी मग सरदार वल्लभभाई पटेल यांना सविस्तर पत्र लिहिले. त्यांनी म्हटले होते की, बेचाळीसच्या चळवळीस त्यांचा तात्त्विक विरोध होता व तो त्यांनी कधी लपविला नव्हता. असे असताना सरकारने अटक केली. तेव्हा सरकारच्या नजरेस हे आणून देण्यात आले आणि म्हणून सुटका झाली. यात माफी मागण्याचा प्रश्न नव्हता. सरदारांची उत्तरादाखल लिहिले की, हा आता इतिहास झाला असून त्याचा विचार करण्याचे कारण नाही. तथापि शंकररावांनी निवडणूक लढवली नाही.

बाबासाहेब घोरपडे यांच्याबाबतीत उघड अन्याय झाला होता. त्यांनी सरकारची माफी मागण्यासाठी पत्र लिहिल्याचा आरोप ठेवून, त्या पत्राची म्हणून एक प्रत पुराव्यादाखल देण्यात आली होती. ते पत्र बनावट होते. ते सिध्द झाल्यावर बाबासाहेबांना तिकीट देण्यात आले. पुढे कालांतराने ह. रा. महाजनी यांच्याकडून या प्रकरणाची स्थूल स्वरूपाची माहिती मला मिळाली होती. मग स्वत: बाबासाहेबांना पुण्यात त्यांच्या घरी भेटलो. त्यांनी माहिती खरी असल्याचे सांगितले आणि अधिक तपशील दिला. ते म्हणाले, की ते मुंबईत सरदार पटेल यांना भेटले तेव्हा त्यांनी ते पत्र दाखवले. त्यावरची सही आपली नाही हे सांगून आपण सही कशी करतो त्याचा नमुना सरदारांना दाखवला. तसेच वाटल्यास आपण ज्या ‘सकाळ’ मध्ये काम करतो, तिथे कागदापत्रांवर कशी सही केली आहे हे पाहावे, असेही त्यांनी सुचवले. सरदारांनी, ‘लगेच पुण्याला जा आणी उमेदवारीचा अर्ज भरा’, असे सांगितले. इतक्यावर हे थांबले नाही. मोरारजीभाईंना सरदारांनी, की ते जेव्हा पुण्यास जातील तेव्हा जिल्हाधिका-यांच्या कचेरीत त्या बनावट पत्राचा बनाव कसा व कोणी केला, याची चौकशी करा, मोरारजीभाईनी तशी ती केल्यावर जिल्हाधिका-याच्या कचेरीतील एका कारकुनाकडून ते करून घेण्यात आले आणि तो करकून प्रांतिक काँग्रेसच्या एका दुय्यम अधिका-याचा दूरचा नातेवाईक होता असे उघड झाले. शंकरराव देवांनीही याच प्रकारे सर्व घडल्याचे आपल्या नजरेस आणून देण्यात आल्याची जाहीर कबुली दिली. पण मग या सर्व प्रकरणास जातीय तेढीचे स्वरूप आले आणि बहुजनसमाजावर अन्याय करण्याचा हा प्रयत्न असल्याचा समज पसरला.

त्या वेळी केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीस केशवराव उभे राहण्यास तयार नसल्यामुळे काकासाहेब गाडगीळ व भाऊसाहेब हिरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्याच वर्षी प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षपदी केशवराव जेधे यांची पुन्हा निवड करण्यात आली होती. केशवराव जेधे व काकासाहेब गाडगीळ यांना ३७ साली मंत्रिमंडळ बनवताना विश्वासात घेतले नव्हते आणि तसेच या वेळीही झाले. बेचाळीसच्या आंदोलनात ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात सामील झाले असल्यामुळे त्यांना केवळ विधानसभेतच अधिक जागा न देता मंत्रिमंडळ व प्रांतिक काँग्रेस समिती यांतही योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा निर्माण झाली असेल तर ते स्वाभाविक होते. पण खेर व मोरारजी देसाई तसेच शंकराराव देव यांनी बदललेल्या सामाजिक परिस्थिचा अर्थ लक्षात घेतला नाही. शिवाय ३७ साली खेर मंत्रिमंडळाची हे दोघेही नाराज होते.