यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २२-१६०९२०१२-३

दरवर्षी रीतिरिवाजा पाळणारी, उत्तम पेहराव करणारी, मिठास बोलणारी, शहाणीसुरती पण अंतर्यामी स्वाथीब् हेतूने ग्रस्त झालेली व इतरांस त्रस्त करणारी माणसे अवतीभोवती आहेत.  खुषमस्करी करून मतलब साधणारी. याचा महाराजांना तिटकारा होता.  वरकरणी तुमचाच म्हणून भासवणार्‍या बेईमान माणसापेक्षा 'इमानदार' फासेपारधी त्यांना जिवलग वाटत.  मग त्यांची भाषा असेना का रांगडी, 'ए महाराज, हिकडं ये, हा ससा घे' अशी त्यांची एकेरी बोली.  आणि कपडे असेनात का मलीन.  शुभ्र कपड्यांच्या अच्छादनाखाली खुनशी, दुष्ट, काळेकुट्ट हृदय असण्यापेक्षा मलीन कपड्याखालचे विशुद्ध अंतःकरणे व अविचल निष्ठा ही पृथ्वीमोलाची.

सुप्रिया, हे ऐकून चव्हाणसाहेबांना जो आनंद झाला तो मी शब्दात नाही पकडू शकत.  पृथ्वीमोलाचा या शब्दावर नंतर कितीतरी वेळ ते तो शब्द पुन्हा पुन्हा म्हणत होते, स्वगत.  शामराव नि मी पाहतच राहिलो.  साहेब बराच वेळ हरवून गेले होते.

लक्ष्मण, ज्याला यश मिळवायचे असते ना त्याचेठाई असावीच लागते अशी अविचल, अव्यभिचारी, नितळ पृथ्वीमोलाची निष्ठा.  आज हे सारे जरी निरुपयोगी झाले आहे असे वाटत असले तरी हेच सत्य आहे.  ते काळाच्या कोणत्याही कसोटीवर उतरेल.  आज नाही उद्या; काळच सांगेल निष्ठेचे मोल.  या त्यांच्या स्वगताला तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ आहे.  

लक्ष्मण, बोला.

एकदा एक मोठे जाणकार विद्वान मित्र महाराजांकडे आले होते.  त्यांनी पहार्‍यावरची ही पारधी माणसे पाहिली.  अंगावर कळकट मळकी वस्त्रे, डोक्याच्या झिपर्‍यातून सतत खाजवणारे हात, ओंगळवाणे, महाराजांना त्यांचे मित्र म्हणाले, महाराज, हे काम या पारध्यांना कशाला दिले ?  किती घाणेरडे लोक, उवांनी भरलेले.  

महाराज म्हणाले, असे आहे होय !

पाहा, आता समजेल तुम्हाला बसा असे निवांत.

फासेपारध्यांची निष्ठा तपासण्याचे महाराजांनी ठरवले.  थोरामोठ्यांच्या दडपणाला बळी पडतात कां तेही तपासायचे होते.  त्यांनी आपले बंधु बापूसाहेब महाराजांना सोनतळी कॅम्पवर तात्काळ बोलावले.  इकडे पहार्‍यावर असलेल्या फासेपारध्यास कोणासही सोडायचे नाही अशी आज्ञा दिली.  तासाभराने बापूसाहेब महाराज आले.  पण पहारेकरी पारध्याने त्याना अडवले.  बापूसाहेब महाराज त्यांचेवर रागावले.  पण पारध्यांचा ठेका एकच, 'मला महाराजांनी कुणासही सोडू नकोस असं सांगितलंय.'  यावर बापूसाहेबांनी आपण महाराजांचे सख्खे भाऊ असल्याचे सांगितले.  महाराजांनी तातडीने बोलावल्याचेही सांगितले.  तरीही तो पोरधी ऐकेना.  मग बापूसाहेबांना संताप अनावर झाला.  तेव्हा पहारेकरी पारधी म्हणाला, 'महाराजांचा हुकूम मी मोडणार नाही, तुम्हाला आता सोडणार नाही.  तुम्हाला जर आत जायचच असेल तर ही घ्या बंदूक.  घाला मला गोळी आणि मग खुशाल जावा.  महाराजांचे भाऊ आहात म्हणून सांगतो.'  इतक्यात महाराज बाहेर आले.  बापूसाहेबांना घेऊन गेले.  महाराजांच्या मित्रांना काय समजायचे ते समजले.  ते मित्राला म्हणाले, 'त्यांच्या अंगावरची घाणेरडे कपडे मी काढू शकतो, त्यांचे मुंडण करून डोक्यातल्या उवाही घालवू शकेन पण तुमच्या डोक्यातल्या विषमतेच्या मनूने ठासून भरलेल्या उवा कोणत्या औषधाने माराव्यात हे मला कळत नाही.'

महाराजांचा गोरगरीबांवर असा भरवसा होता.  तो त्यांच्या जीवाचा जिवलग होता.  आमच्या या बोलण्याच्या नादात गाडी कराडात पोहोचली.  साहेबांसोबत चहा घेतला आणि मी सातारला पळालो.  राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा आम्हा दोघांचा फार विक पॉईंट होता.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका