यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३७-३११०२०१२-२

हे दुःख वेणूताई सहन करू शकल्या नाहीत.  चव्हाण कुटुंबातला सगळ्यात कर्तबगार मुलगा.  हा लहान असतानाच वडील आई गेली.  त्यामुळेच या मुलाचे संगोपन वेणूताईंनी केले होते.  राजा या नावाने ताई त्याला बोलावीत.  त्यामुळे तो सर्वांचा लाडका राजा झाला.  तो डॉक्टर झाला.  झोपडपट्टीत दवाखाना चालवू लागला.  जातपात, गरीब-श्रीमंत असले काही भेद न पाळता त्याने समाजसेवेला वाहून घेतले.  दोन मुले पोटाशी असताना अपघातात गेला.  राजा गेल्यानंतर हे सारे कुटुंबच कोसळले.  असे धक्क्यावर धक्के हे पतीपत्‍नी सोसत होते.  ६ मार्च रोजी डॉ. विक्रमचे निधन झाले या दुःखातून ताई सावरल्याच नाहीत.  दोन नातवंडे, तरुण सून त्यांचे दुःख सागरासारखे.  त्यानंतर वेणूताई केवळ दोन महिने कशातरी जगल्या.  १ जूनला त्या गेल्या.  साहेबांच सारे दोरच नियतीने कापून टाकले होते.  अखेरचा बळकट धागा हातातून हात सोडवून गेला होता.  वटवृक्षाचे कोसळणे होते ते.  या दुःखातून ते कधी सावरलेच नाहीत.  एक्केचाळी वर्षे ज्या आधाराने चव्हाण कुटुंब आपली नौका हाकीत होते त्या नौकेचे शिडे आता तुटून पडले होते.  नावाडी नौका सावरू शकत नव्हता.  त्याची सारी शक्तीच गळाली होती.  त्याचे स्वत्व, सावली तो या गर्दीत शोधत होता.  यशवंतरावांचा शोकाकुल चेहरा त्यानंतर अखेरपर्यंत शोकमग्नच राहिला.  मनाचा हा कोपरा कदाचित भरून येण्यासारखा नव्हता.  रक्षाविसर्जन झाले.  त्यानंतर आम्ही अनेकवार अनेक प्रसंगांत भेटलो.  पण वेणूताईंना एक क्षणभरही ते कधी विसरू शकले नाहीत.  

वेणूताईंच्या निधनानंतरचे यशवंतराव सत्व नसलेल्या बियाणांसारखे जगले.  दर पावलांवर त्यांना ताईंची आठवण येत असे.  औषधे वेळेवर घेतली का ?  कोणते औषध कोणत्या खिशात ठेवले आहे, ते किती वाजता घ्यायचे आहे, ते घेतले की नाही ?  साहेब जगात कोणत्याही कानाकोपर्‍यात असोत वेणूताईंना सारा तपशील ठाऊक असे.  औषधाची वेळ झाली की त्या स्वीय साहाय्यकाला लगेच सांगत.  जेवणे, झोपणे, त्यांचे ग्रंथ, टिपणे, टाचणे, कपडे, बॅगा भरणे, कपड्यांचे इस्त्रीपासून सारे सोपस्कार त्या करीत.  घरात काय लागते, काय लागत नाही, त्याच्या किमती काय असतात.  कोणती वस्तु कुठे मिळते.  यातले साहेबांना काही पाहावे लागत नसे.  ते क्वचितसुद्धा बाजारात जात नसत.  ते सारे काम ताईंचे.  तो विभाग नातेवाईक, पैपाहुणे, कार्यकर्ते, मित्र, साहित्यिक, कुशल राजकारणी ज्या तर्‍हेने प्रश्न हाताळतो तसे वेणूताई सारे हाताळीत असत.  साहेबांना काय हवे, काय नको किंवा आता आपला नवरा काय भूमिका घेईल याचा अचूक अंदाज त्या बांधीत असत.  त्यावेळी कर्‍हाडला एक जातीय दंगल झाली होती.  साहेब पार्लमेंटमध्ये होते.  तेथील काम संपवून ते तात्काळ बाहेर पडले.  घरी आले.  ताईंना म्हणाले, काय काय झाले ते समजले का ?  ताई म्हणाल्या, हो.  बॅग भरून तयार आहे.  म्हणजे आता आपला नवरा काय करील याचा केवढा अंदाज त्या बरोबर बांधू शकत !  साहेबांनी राजकीय चर्चा करावी ती पहिल्यांदा वेणूताईंशी.  अनेकांना वाटे या साध्या घर चालवणार्‍या बाईला काय समजत असणार.  त्या लोकांना हे कळत नाही की यशवंतरावांसारख्या असामान्य माणसाचे घर चालवणे, प्रपंच चालवणे म्हणजे काय पोरखेळ आहे ?  बावन्न आण सत्तावन्नच्या निवडणुका तर ताईंनीच बरोबर जाऊन प्रचार करून जिंकल्या होत्या.  फार मोठा विरोध या काळात होता.  सारे संयुक्त महाराष्ट्राचे वारे होते.  त्या तुफानात साहेब तरले.  त्या भाषणे करीत नसत.  घरोघरी जाऊन प्रचार करीत.  महिलांचे संघटन करीत.  आज साध्या सरपंचाची बायको सरपंच असल्याच्या तोर्‍यात वागते.  पण वेणूताई कधीही तशा वागल्या नाहीत.  राजकारण असो की प्रशासन, त्यांनी कधीही अपवाद वगळता हस्तक्षेप केला नाही.  पैशापाण्याच्या, प्रसिद्धीच्या मागे पळाल्या नाहीत.  यासाठी फार मोठ्या संयमाची गरज असते.  तो संयम, ती निरपेक्ष वृत्ती असणे हे सामान्य माणसाचे काम नाही.  त्यासाठी फार मोठे मन लागते.  माझ्यापुरते सांगायचे तर माझ्यासाठी पेढे वाटणारी ही माऊली अनंतात विलीन झाली होती.  तिच्या ॠणातून मुक्त होणे सोपे नाही.  आणि मातेच्या ॠणातून मुक्त होताही येत नाही.  साहेब दुःखसागरात बुडाले ते कायमचे.  या दुःखातून तेही सावरूच शकले नाहीत.  जरामरण यातून सुटला कोण प्राणीजात असे ग. दि. मा. म्हणाले, ते काही खोटे नाही.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका