पत्र - ३७
दिनांक ३११०२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
मी १ जून १९८३ रोजी निलंगा तालुक्यातील कासार शिरसीला भटक्या-विमुक्तांच्या मेळाव्यात भाषण करीत होतो. बेरड समाजातील लोकांना स्मशान नव्हते. एका माणसाची मयत झाली होती. प्रेत पुरायला गाव जागा देत नव्हते. त्यांची परंपरागत स्मशानभूमी होती तिच्याकडे जाणारा रस्ता एका माणसाच्या खाजगी जागेतून जात होता व त्याने तो अडविला होता. आम्ही प्रेताचे करायचे काय, म्हणून चिंतेत होतो. नातेवाईक, पैपाहुणे जमले होते. प्रेत पुरायला जागा नव्हती. सारे गावकरी त्या माणसाची समजूत घालीत होते. पण तो ऐकायला तयार नव्हता. लोक हळूहळू जमू लागले. गर्दी वाढली. लोकांनी प्रेत उचलले आणि त्या माणसाच्या विरोधाला न जुमानता स्मशानात नेले. विरोध करणारा माणूस, त्याची भावकी यांनी दगडफेक केली. काही लोक जखमी झाले. या देशात मेलेल्या माणसाला पुरायलाही जागा नाही. घराला जागा नाही. मी प्रचंड अस्वस्थ होतो. लातूरच्या जिल्हाधिकार्याच्या कचेरीवर सत्याग्रह करायचा ठरवून छोटेमोठे मेळावे घेत फिरत होतो. माझे भाषण चालू होते. आणि विलास माने हा माझा अत्यंत तळमळीने काम करणारा कार्यकर्ता माझ्याजवळ आला नि म्हणाला, 'रेडिओला बातमी सांगितलीय वेणूताई चव्हाण गेल्या.' क्षणात सारा नूर बदलला. आमच्या मेळाव्यात ही बातमी समजली आणि मेळाव्याचे शोकसभेत रूपांतर झाले. श्रद्धांजली अर्पण करून सभा संपली.
मी मुंबईपासून खूपच दूर होतो. मला अत्यंविधीला उपस्थित राहता येणार नाही हे उघड होतो. मी रात्रीच सातारला पोचण्याचा निर्णय केला. दुसर्या दिवशी मुंबईला निघावे म्हणजे रक्षाविसर्जनाचा विधी तरी मिळेल. मी निलंग्याच्या स्टॅन्डवर पोचलो. सातारला थेट जाता येणार नव्हते. सोलापूरपर्यंत जावे आणि पहाटे सातारला गाडी आहे त्या गाडीने निघावे असे ठरवून सोलापूरच्या गाडीला बसलो. कार्यकर्त्यांना निरोप दिला. डोळ्यांपुढून चव्हाणसाहेबांची करुण मूर्ती काही हलत नव्हती. त्यांचे सांत्वन मी कसे करावे ? काय करावे ? माझ्या डोळ्यांपुढून वेणूताई हलत नव्हत्या. त्यांच्याशी माझा फारसा संबंध आला नव्हता. पण जो काही आला त्यात त्यांनी ज्या आपुलकीने, मायेने पाठीवर थाप मारली होती ते हात आता पुन्हा पाठीवर फिरणार नव्हते. माझी जर अशी स्थिती तर साहेबांची स्थिती काय असेल ? मी कल्पनाच करू शकत नव्हतो. मी पाहिलेल्या वेणूताई पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे उभ्या राहत. मी डोळे पुसत होतो. पुन्हा पुन्हा ते भरून येत होते. सौजन्यशीलता म्हणजे काय ? सौजन्यशीलतेचे दुसरे नाव वेणूताई होते. साहेबांचा-माझा स्नेह तसा चार-दोन वर्षांचा, पण हे नाते वर्षानुवर्षांचे असावे तसे मायेने भरलेले होते. यशवंतरावांच्या अखेरच्या काळात मी त्यांच्यासोबत होतो. सूर्याची मावळतीची दिशा त्यांना फार आवडत असे. मावळतीचा सूर्य ही संकल्पना ते अनेक अर्थाने वापरीत असत. थकलेला सूर्य, वाकलेला सूर्य, निरोपताना ते नाते थेट त्यांच्यापर्यंत पोचत असे.
आपणा सर्वांना एकच सावली असते. ती चोवीस तास आपल्याबरोबर असते. सावलीशिवाय काहीच नाही. यशवंतरावांना दोन सावल्या होत्या. एक त्यांची स्वतःची आणि दुसरी वेणूताईंची. एक क्षणसुद्धा त्यांच्याशिवाय ते जगले नव्हते. तब्बल एक्केचाळीस वर्षे ही सावली चव्हाणसाहेबांबरोबर अहोरात्र सोबतीला होती. पतीवरील त्यांची अविचल श्रद्धा, निष्ठा, पतिपरायणता ही एखाद्या व्रतस्थासारखी. पातिव्रत्य म्हणजे वेणूताई. श्रद्धा, करुणा, सात्त्विता, सौजन्यशिलता, सहनशीलता, मृदूता, प्रेमळपणा, आत्मीयता, चाणाक्षपणा, आत्मसंयम म्हणजे वेणूताई. राजकीय आणि खाजगी आयुष्यात यशवंतराव अनेकानेक कठीण प्रसंगांत वावरले. तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीमागे त्यांची ही सावली खंबीरपणे उभी राहिली. वेणूताईंचे असणं हाच मोठा आधार होता त्यांना. त्यांचा हात हातात होता तोवर हा माणूस कधी वाकला नव्हता. आता अचानकपणे हा हात सुटला होता. एका कर्तबगार पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते हे निदान चव्हाणसाहेबांच्या बाबतीत तरी शंभर टक्के खरे होते. जन्माला येणार्या प्रत्येकाचा प्रवास मृत्यूकडेच होत असतो हे सर्वज्ञात आहे. जनमाला आलेला प्रत्येक जीव मरणाकडेच निघालेला असतो. जन्म हा मृत्यूचाही जन्मच असतो. जन्मापासून मृत्यू बरोबरच प्रवास करीत असतो.