यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३८-०१११२०१२-१

अरे, मोर्चा काढला तर यांना एवढा राग कशाला यायला पाहिजे ?  आम्ही सभ्यतेनेच बोलत होतो ना ?

साहेबांनी माझा हात धरून मला गेटवर आणले.  समोर मोर्चेकरी उभे होते.  साहेबांना बघितले आणि सारे शांतपणे रस्त्यावर बसले.  साहेब बोलू लागले.  सारा मोर्चा शांत झाला.

''तुम्हाला या प्रश्नासाठी मोर्चा काढावा लागला.  तुमची स्वतःची जमीन आहे.  ती मीच त्यावेळी दिली आहे.  सार्‍या सेटलमेंटच्या जमिनी तुमच्याकडेच राहतील यात मला शंका नाही.  आता शासनाने काय केले आहे ते मी पाहतो.  जनावरांचे गोठे तेथे होणार नाहीत, तुम्ही काळजी करू नका.  मी संबंधितांशी बोलतो.  जमीन जायला लागली तर मी तुमच्यासोबत राहिन.''  टाळ्यांचा कडकडाट झाला.  मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकरवी पुन्हा निरोप दिला पण आता आम्हाला जायचेच नव्हते.  सरूबाईने आभार मानले.  ती साहेबांना म्हणाली, ''साहेब, तुमाला कळवळा आला.  उन्हात हिथं तुमी आला.  पर चौगुल्याला पाटीलकी दिली म्हण काय राजा होता येत का ?  ज्याचं जळतं त्याला कळतं.  आमचं पॉट दुखतया म्हण आम्ही बोंबलतुया.  तेवढं दादास्नी सांगा की, सरूबाई अशा मैंदाळ्या टाळ्या मिळवून भाव खाऊन गेली.  साहेब गाडीत बसून गेले.  मला 'संध्याकाळी या' असे सांगून जायला विसरले नाही.

मी मोर्चाची निरवानिरव केली.  संध्याकाळी साहेबांच्या चतुश्रुंगी येथील घरी त्यांना भेटलो.  साहेब सांगत होते.  मुख्यमंत्री असताना मुंढवा सेटलमेंटच्या जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला होता.  सारेच अडाणी.  फार्मिंग सोसायटी करून दिली.  जमिनी कसण्याची तयारीच नव्हती.  जमीन पडून होती.  कुणी कशी कसावी ?  मनगटाच्या ताकदीवर ठरू लागले.  रामा शेटीप्पा नावाचा कार्यकर्ता होता.  त्याने माझ्यापुढे खूप गोंधळ घातला.  मी शांतपणे जमिनीचे पट्टे करून देण्यासंबंधी प्रशासनाला सांगितले होते.  हजारो एकर जमिनी होत्या.  काय स्थिती आहे आज तिथली ?  साहेबांनी मला विचारले.

साहेब, महसूल खात्याकडे गेल्या.  काही समाजकल्याणकडे गेल्या.  काही जमिनी खाजगी लोकांनी लाटल्या.  विसापूर, उंदीरगाव, दरेगाव या जेलच्या सेटलमेंट जमिनी हजारो एकर होत्या.  त्या अक्षरशः पुढारी मंडळींनी लाटल्या.  सोलापूरच्या साडेचारशे-पाचशे एकरांतल्या सर्व जमिनी, इमारती लोकांनी लुटून नेल्या.  

साहेबांचा चेहरा पडला होता.  मी नेहरूंना शब्द दिला होता.  अनेकदा वाटते, अजून पाच-दहा वर्षांचा काळ मिळाला असता तर हे पेंडिंगला पडलेले प्रश्न नक्की मागा्रला लागले असते.  लक्ष्मण, सत्ताधारी बदलले की धोरणे बदलतात.  आधीच्या शासनाने घेतलेले निर्णयही बदलतात.  थोडे कमिशनचे हे काम होते.  शासकीय मालकीच्या जमिनी होत्या.  योग्य नियोजन करून त्यांचे पुनर्वसन करायचे होते.  मी सोसायट्या केल्या होत्या, त्याही हातोहात चोरीला गेल्या असे दिसते.

साहेब, कोल्हापूरला राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी साडेतीनशे एकर जमीन दिली होती.  त्यातली बरीच जागा कंजारभाट, माकडवाले, पारशी, कैकाडी या गुन्हेगार जमातींना दिली होती.  त्या जागेवर आपण शिवाजी विद्यापीठ केलेत.  

कोणती, सागरमाळाची जमीन म्हणता ?

होय साहेब.

माझ्या आठवणीप्रमाणे, लक्ष्मण, तेवढीच जागा या लोकांना उचगावच्या माळावर मी द्यायचा प्रस्ताव केला होता.  त्याचे काय झाले हे मला आता माहिती नाही.  पण आपण त्यांना पर्यायी जागा दिली असे आठवते.

होय साहेब, पारधी कंजारभाटांनी ती जमीन मिळवली.  काही जागेत शांतीनगर ही पारधी वसात आहे आणि १८० एकर जमीन शेतजमीन आहे.  ती या लोकांच्या वहिवाटीत आहे.