यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३९-०५११२०१२

पत्र - ३९
दिनांक ०५-११-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

त्या दिवशी सकाळी सकाळी अप्पासाहेबांचा माणूस दारात उभा.  तुम्ही आहात का ?  आमचे साहेब येणार आहेत.

'का, काय काम काढलेत ?  आज तर रविवार आहे.  बँकेला सुट्टी आहे ना ?

हो, मला साहेबांनी आपण आहात का पहायला सांगितले आहे.  ते भेटायला येणार आहेत.

मी घरी असल्याचे अप्पासाहेबांना कळवले.  १०-१०:३० वाजता अप्पासो भोसले आले.  मला म्हणाले, दुपारी चव्हाणसाहेब सातारला पोहोचतील.  त्यांना तुमचा गवडी प्रकल्प पाहायचा आहे.

मला आश्चर्यच वाटले.  आणीबाणीच्या काळता खाजगी सावकारविरुद्ध आणीबाणीतल्या वीस कलमी कार्यक्रमाचा फायदा घेत समाजवादी युवकदलाने खाजगी सावकारीविरुद्ध चळवळ केली होती.  गवडी, सातारा येथली मागासवर्गीयांची जमीन सावकारीतून सोडवली होती.  गावाचा मोठा विरोध होता.  तरीही आबासाहेब वीरांनी आम्हाला पाठबळ दिले.  बँकेतले अधिकारी आणि त्या भागातले मोठे नेते बबनराव बडदरे यांना सोबत दिले.  शेतकर्‍यांना सांगून आबांनी ट्रॅक्टर दिले.  आम्ही मागासवर्गीयांच्या शेतजमिनी वहिवाटीखाली आणून सावकारीतून मुक्त केल्या.  त्या काळता अप्पासाहेबांनीही मोठी मदत केली होती.  त्या जमिनींची आताची स्थिती काय आहे.  आज त्यात काय पिकते आहे, हे खरे तर मलाही माहीत नव्हते.  मी तसे अप्पासाहेबांना म्हणालो.  ते हसले आणि म्हणाले, अहो, तोच तर प्रश्न आहे.  आज काय तेथे आहे ते पाहायचे आहे.  या सर्व काळात साहेबांचे दिल्लीतून लक्ष होते.  का, कशी त्यांना या प्रकल्पाची आठवण झाली, माहीत नाही.  त्यांचा काल निरोप आला.  म्हणून आपण जागा पाहायला जायचे आहे आणि आणखीही काही जागा पाहायच्या आहेत.  साहेबांना तुम्हांला काहीतरी संस्था करून द्यायची आहे, असे ते म्हणत होते.

आता माझी ट्यूब पेटली.  भटक्याविमुक्तांच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन करायची हे ठरले होते.  साहेब जागा शोधायला लागले होते.  आता मला मनाने तयार व्हायला लागणारच होते.  दुपारपर्यंत आम्ही सर्वत्र जागा शोधल्या.  बँकेचे काही अधिकारी, तलाठी, तहसिलदार बरोबर होते.  सारखळ, गवडीची जागा पाहिली.  डेव्हलपमेंटला मोठा खर्च आला असता.  दुसरी जागा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याला लागून पाहिली.  लिंब खिंडीत आता तिथे रयत शिक्षण संस्थेचे इंजिनीअरिंग कॉलेज झालय ना त्याचवेळी त्या जागेच्या समोर रस्त्याच्या कडेला डोंगर आहे.  ती जागा प्रशासनाने सुचवली.  नुसता डोंगर, अप्पासाहेब म्हणाले.  लक्ष्मणराव जागा चांगली आहे पण डेव्हलपमेंटला मोठा खर्च येईल.  माळवाडीला आणखी जागा आम्ही पाहिल्या.  काही ना काही अडचणी होत्या.  आम्ही परतलो.  

साहेब सातारला सर्किट हाऊसला आले.  वेणूताई गेल्यानंतर ते पहिल्यांदाच सातारला आले होते.  त्यांचा अत्यंत उदास, करुण चेहरा अंगावर काटा आणीत होता.  ते नॉर्मल होण्याचा प्रयत्‍न करीत होते.  हसून माझे स्वागत केले.  जवळ येऊन बसले.  अत्यंत हळव्या मनाचा हा माणूस.  शशीची, मुलांची चौकशी केली.  आईवडिलांची चौकशी झाली.  डॉ. विजय मोहिते यांनी साहेबांची प्रकृती तपासली.  त्यांच्याशी काही बोलले.  बी.पी. नॉर्मल होते.  गोळ्या वेळेत घ्यायला हव्यात असे ते म्हणाले.  साहेबांच्या डोळ्यांच्या धारा थांबत नव्हत्या.  ४० वर्षे हा प्रश्नच कधी पडला नव्हता.  वेणूताई औषधांची वर्गवारी करून, कुठल्या गोळ्या किती वाजता घ्यायच्या त्याच्या स्वतंत्र पुड्या करून जाकीट, कोट, शर्ट, यांच्या खिशांत ठेवीत.  पुडी उघडली की गोळी वेळेत घ्यावी लागे.  आता स्वतःला गोळ्या घ्याव्या लागत.  त्या वेळा पाळता येत नसत.  त्याची आठवण झाली की साहेब लहान मुलांसारखे रडत.  क्षणात सावरले आणि बॅगेतले काही कागद काढले.  भारतीय भटकेविमुक्त विकास संशोधन संस्था, सातारा या नावाने टाईप केलेले काही कागद माझ्याकडे दिले.  'वाचून पाहा.  संस्थेच्या घटनेचे टिपण आहे.  ध्येय, उद्दिष्टे तुम्हाला लिहावी लागतील.  तुम्हाला हवी असतील ती माणसे घ्या.  पदाधिकारी, त्यांची कर्तव्ये, निवडणुका यासंबंधी सारे मी लिहिले आहे.  वाचून पाहा.  पुन्हा बसू.  बाबांशी बोला.  रजिस्ट्रेशन करून घ्या.  तात्पुरता अध्यक्ष कुणाला तरी करा.  सह्यांसाठी अडायला नको.  मी आहेच.'  मे.पु. रेगे, व.द.देशपांडे, अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्र.ना.परांजपे, किशोर बेडकिहाळ अशा नावांची यादी झाली.  अप्पासाहेब भोसल्यांनी आम्ही पाहिलेल्या जागा सांगितल्या.  साहेब म्हणाले, शक्यतो कराड-सातारा रोडवर किंवा पुणे-सातारा रोडवर चालेल.  मला सहजपणे संस्थेत जाता येईल अशी जागा शोधली पाहिजे.  पाहू, शक्य तेवढ्या लवकर जागा शोधली पाहिजे.  इतर गप्पा सुरू झाल्या.