भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीने ता. २७,२८ व २९ जून १९६० रोजी वेल्लूर (मद्रास) येते भरलेल्या बैठकींत ठरावरुपाने ना. यशवंतराव यांचे या अभिनव निर्णयाबाबतहि आभार मानले आहेतच. ठरावांत असें म्हटलें आहे की,
" (ब) महाराष्ट्र राज्य सरकारजवळ असणा-या शेतीलायक जमिनीचें भूमिहीनांना वाटप करण्याबाबत रिपब्लिकन पक्षाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल ही कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांचे आभार मानीत आहेत."
त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ता. ११ व १२ जून १९६० रोजीं जळगाव येथें झाली. या बैठकींत महाराष्ट्र राज्य सरकारचें म्हणजेंच पर्यायाने ना. यशवंतराव यांचेंच अभिनंदन केलें आहे.
खालच्या थरांतील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे ना. यशवंतराव नेहमीच आकर्षिले जातात; आणि त्या प्रश्नाचें महत्त्व त्यांच्या बुद्धीला पटतांच लागलीच ते त्यावर उपाय म्हणून पुढचीं पावलें टाकतात, हा त्यांचा महत्त्वाचा गुण यांतून दिसतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंति दिनाची सुट्टी मान्य केली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय अस्पृश्य व बौद्धजनांचें दैवत आहेत आणि याच अंतरीच्या भावनेने ही दलित जनता त्यांना भजते व पुजते. आपल्या परमपूज्य नेत्याच्या जयंतिदिनाची सुटी सरकारने द्यावी, अशीच त्यांची मागणीहि होती. डॉ. बाबासाहेब यांच्याबद्दल ना. यशवंतराव यांना आदरभाव आहे. ना. यशवंतराव ता. १४-४-१९६० रोजीं मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एका समारंभाला हजर होते. त्यावेळीं ते डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढून म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ख-या अर्थानें थोर होते. त्यांनी भारताला घटना दिली. त्यांनी पददलित समाजाला माणसांत आणलें. त्यांनी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली आहे. त्यांनी केलेला बौद्धधर्माचा स्वीकार हाहि पूर्ण विचारांती स्वीकारलेला मार्ग आहे. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून योग्य तेंच केले असें मला वाटतें !" ( प्रबुद्ध भारत ता. २३-४-६०)
ना. यशवंतराव यांचे डॉ. बाबासाहेब यांच्याबद्दल काय विचार आहेत, याची यावरून कल्पना येते. त्यांतच ना. यशवंतरावजींनी डॉ. आंबेडकर-जयंति -दिनाची ( ता. १४ एप्रिल ) सुटी देण्याचें मान्य करून, भारतीय अस्पृश्य व बौद्धजनांच्या भावनेचा आदर केला आहे. एका परीने बाबासाहेबांच्या थोरपणाला व थोर-गुणाला सरकारनेच अभिवादन केलें आहे. अर्थात् याचें सर्व श्रेय ना. यशवंतरावजींना आहे, ही गोष्ट डॉ. आंबेडकर यांचे कोट्यवधि अनुयायी कधीच विसरणार नाहीत. १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकींत घटनेच्या शिल्पकाराचा पराभव काँग्रेस पक्षाने केला आणि आज त्याच राज्यांत त्याच पक्षाच्या मुख्य मंत्र्याने डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतिदिनाची सुटी देण्याचें मान्य केलें, हा केवढा अपूर्व योगायोग आहे ! जनतेच्या भावना ना. यशवंतरावजी चांगल्या ओळखूं शकतात म्हणून त्यांच्या हातून अशा स्वरुपाच्या अभिनव व अपूर्व घटना घडतात हेंच त्यांतील खरें रहस्य होय.
पवित्र दीक्षाभूमीची मागणी
नागपूर येथे ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तिला पवित्र दीक्षाभूमि असें नव-दिक्षित बौद्ध मानतात. याच भूमीवर भारतांत पुन्हा बैद्धधर्माच्या पुनरुज्जीवन कार्याला सुरुवात झाली. त्या दृष्टीने या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब यांच्या नांवाल व कीर्तीला साजेलसें भव्य स्मारक उभारण्याचा भारतीय बौद्धजनांचा निर्धार आहे. आणि त्याच स्मारकासाठी ही 'दीक्षाभूमि' आम्हांला द्यावी, अशी बौद्धजनांची मागणी आहे. ही भूमि महाराष्ट्र राज्याच्या मालकीची आहे. ही भूमि मिळावी म्हणून बौद्धजनांचे नेते अनेक वेळां महाराष्ट्र राज्यसरकार व ना. यशवंतरावजी यांना भेटले आहेत. ही दीक्षाभूमि भारतीय बौद्धांच्या भावनेचा प्रश्न आहे, त्यांचा हा मानबिंदु आहे, ही गोष्ट ना. यशवंतरावजी यांना पटलेली आहे. याबाबत लौकरच ही सर्व 'दीक्षाभूमि' देण्याबाबत यशस्वी तडजोड होईल, अशी आशा आता निर्माण झालेली आहे.