महाराष्ट्राच्या राजकारणांतील समस्या
डॉ. ना. र. देशपांडे
एक उत्तम प्रशासक आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून श्री. यशवंतराव चव्हाण यांचा पंतप्रधान नेहरूंनी अनेक वेळां गौरव केला आहे. भारताच्या नेतृत्वपदाच्या संदर्भात नेहरुनंगर कोण असा प्रश्न उपस्थित केलाजातो. त्या दृष्टीने श्री. जयप्रकाश नारायण यांनी यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला होता. अशा त-हेचीं अखिल भारतीय पातळीवरील पदा-यांची प्रशस्तिपत्रकें यशवंतरावांनी गेल्या कांही वर्षांत मिळविलीं आहेत. परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती, विशेषत: ती ज्या पद्धतीने झाली ती, यशवंतरावांच्या नेतृत्वाचें खरें प्रशस्तिपत्र समजावयाला हवें. कारण, प्रशासक आणि राजकीय नेता या दोन्ही नात्यांनी आवश्यक असलेले गुण ज्या ठिकाणी एकवटून व्यक्त झालेले पहावयास सापडतात अशी यशवंतरावांची कामगिरी म्हणजे विशाल द्विभाषिकाचा कारभार कार्यक्षमतेने चालवून, महाराष्ट्रराज्याची निर्मिति त्यांनी सुकर आणि निश्चित केली, ही होय.
महाराष्ट्र राज्य कसें झालें ?
महाराष्ट्र राज्य निर्माण होणार हें निश्चित झाल्यापासून त्याचें श्रेय कोणाचें व किती याबद्दल एक प्रकारची अहमहमिका सुरु झाली. सर्व श्रेय काँग्रेसला किंवा यशवंतरावांच्या नेतृत्वाला देणें वस्तुस्थितीला धरून होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीला आणि तिने केलेल्या चळवळीला श्रेयाचा मोठा भाग दिला पाहिजे. आणि खुद्द यशवंतरावांनी समितीच्या कार्याचें महत्त्व मोकळेपणाने मान्य केलें आहे. मराठी जनतेने इतर मतभेद बाजूस सारून या प्रश्नावर जी एकजूट दाखविली तिला मुख्य श्रेय दिलें पाहिजे. परंतु संयुक्त महाराष्ट्राची निर्मिति ज्या वातावरणांत आणि ज्या पद्धतीने झाली त्याचें पुष्कळसें श्रेय यशवंतरावांना दिलें पाहिजे. आणि भारतीय लोकशाहीच्या उपासकांचे दृष्टीने तरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीएवढेंच महत्त्व ही निर्मिती ज्या पद्धतीने झाली त्या पद्धतीला आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती ज्या पद्धतीने झाली तिचा विचार करीत असतांना जी एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती अशी की, लोकशाही पद्धतीला अनुसरून आण भारतीय संदर्भाशी सुसंगत अशी रीतीने आणि वाटाघआटींनी हें राज्य निर्माण झालें आहे. त्यामुळे अनुकूल वातावरण या राज्याला जन्मापासून लाभलें आहे. याला यशवंतरावांचे नेतृत्व नव्हंशी कारणीभूत आहे यात शंका नाही. विशाल द्विभाषिकाचे मुख्यमंत्री या नात्याने यशवंतरावांनी जें काम केलें त्यायोगें दोन मुख्य गोष्टी साधल्या.
भारतीय नेतृत्वाचा विश्वास संपादन करून मुंबई शहर एकभाषी मराठी राज्याचा भाग बनविण्यास ज्या शंका, संदेह, अविश्वास यांमुळे विरोध होत होता त्यांचे निराकरण केलें. त्यामुळे यशवंतरावांच्या शब्दाला दिल्लीमध्ये महत्त्व प्राप्त झालें. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणा-या नेत्यांचा प्रभाव त्या मानाने कमी झाला. आत्मविश्वासाचे सामर्थ्य यशवंतरावांच्या भूमिकेमागे उभें राहिलें, परंतु आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाने केवळ भारतीय नेतृत्वाचाच विश्वास यशवंतरावांनी संपादन केला नाही, तर खुद्द मुंबई राज्यामध्ये सहका-यांचा विश्वास संपादन करून या राज्याच्या भिन्न भिन्न प्रादशिक घटकांचाहि पाठिंबा मिळविला. गुजराथ आणि महाराष्ट्र यांच्या निर्मितीपूर्वीच्या वाटाघाटी ज्या बंधुभावाच्या वातावरणांत आणि गुण्यागोविंदाने झाल्या त्याला यशवंतरावांनी गुजराथी सहकारी व गुजराथी समाज यांचा संपादन केलेला विश्वास बर्व्हशी कारणीभूत होता हें स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याने नि:संकोचपणे महाराष्ट्र राज्याला दिलेला पाठिंबा आणि विदर्भांतील सहका-यांनी वाटाघाटीनंतर आणि कांही थोड्या खळखळीनंतर महाराष्ट्र राज्यांत सामील होण्यास दर्शविलेली तयारी ह्यालाहि यशवंतरावांनी या दोन्ही प्रदेशांत संपादन केलेला विश्वास कारणीभूत होत यांत शंका नाही. एवढेंच नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्र समितीची भूमिका कट्टर विरोधाची असतांना सुद्धा हा विरोध राजकीय मतभेदांच्या पातळीवर राहावा, त्यांतून कटुतेची भावना निर्माण होऊं नये या दृष्टीने यशवंतरावांनी विरोधकांबरोबर वागण्याचें जें धोरण स्वीकारलें होतें त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर तीव्र लोकमत प्रभावी रीत्या संघटित झालें असूनहि वातावरणांत फार कटुता निर्माण झाली नाही; आणि महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न वाटाघाटींनी सुटू शकला. अर्थात् यशवंतरावांप्रमाणेच संयुक्त महाराष्ट्र समितीचें नेतृत्व करणा-या एस्. एस्. जोशी प्रभृतींनाहि या संबंधात मोठे श्रेय दिलें पाहिजे.