अस्पृश्य व नवदीक्षित बौद्ध
-अॅड. शंकरराव खरात , संपादक, 'प्रबुद्ध भारत', पुणे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांचे नेतेपण खालच्या थरांतील जनतेंतून निर्माण झालेलें आहे. म्हणूनच ते सर्वसामान्य जनतेची, विशेषत: खालच्या थरांतील जनतेची, दु:खें काय आहेत हें जाणूं शकतात. ते जनतेच्या दु:खांशी समरस होतात आणि जनतेचें दु:ख निवारण्याच्या दिशेने निश्चित पावलें टाकतात. ना. यशवंतरावजी यांच्या कार्याला पुरोगामी व शास्त्रीय विचारांची बैठक असून, त्यांचे ठायीं तळमळ, कळकळ आणि भावनेचा ओलावा याबरोरच 'दूरदृष्टी' हि आहे. त्यांचा मूळ पिंडच लोकशाही-समाजवाद्याचा असल्याने ते जनतेच्या प्रश्नांशी समरस होतील. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्या पुरोगामी व शास्त्रीय विचारांच्या आधाराने पुढची पावलें टाकतील. या गुणवत्तेमुळेच ना. यशवंतरावजी, निदान महाराष्ट्रांत तरी, समाजवादी समाजरचनेंचें ध्येय साध्य करण्यास समर्थ आहेत असा विश्वास वाटतो.
अर्थात् ना. यशवंतरावजी यांच्या विचाराला व कार्याला त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या मर्यादा राहणार आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या मर्यादेंत राहून त्यांना पाऊल टाकणें भाग पडतें. या दृष्टीनेच त्यांच्या जीवन-कार्याचे मूल्यमापान करणें योग्य होईल. आपल्या ध्येयवादी दृष्टिकोनांतून पण पक्षीय बंधनाच्या चाकोरींतून कार्य करीत असतानांच ना. यशवंतरावजी यांनी महाराष्ट्रांतील पददलित अस्पृश्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने योग्य दिशेने पावलें टाकलीं आहेत. त्यांत त्यांचे धैर्य व दूरदृष्टि तर आहेच; परंतु त्याचबरोबर अस्पृश्यांचा प्रश्न मूलत: सोडविला पाहिजे, ही तळमळ व कळकळंहि त्यांत आहे. यशवंतरावजी यांची पददलितांच्या समस्या सोडविण्याची मूळदृष्टि व त्यामागील प्रामाणिक तळमळ व शुद्ध हेतु पाहूनच भारतीय रिपब्लिकन पक्षनेत्यांनी व नव-दीक्षित बौद्ध जनतेने नागपूर येथे ता. १६ डिसेंबर १९६० रोजी दीक्षाभूमिमैदानावर त्यांचा प्रचंड स्वरुपांत हार्दिक सत्कार केला. रिपब्लिकन पक्षीय बौध्द समाजाने त्यांच्यावर अक्षरश: पुष्पहारांची दृष्टीच केली. या सत्कारसमारंभाचे अध्यक्ष खा. दादासाहेब गायकवाड हे होते. मुख्य वक्ते अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जनरल सेक्रेटरी खासदार बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे होते. इतर रिपब्लिकन पक्षनेते समारंभाला हजर होतेच हें उल्लेखनीय होय.
कायद्याप्रमाणे व्यवहार करतात.
भारतीय समाजाला अस्पृश्यतेची लागलेली कीड नष्ट करण्यासाठी कायदे करणें हें आवश्यक तर आहेच; परंतु कायदा व व्यवहार यांत संगति असणें अधिक महत्त्वाचें आहे. त्याशिवाय ज्या उदात्त हेतूने कायदा केला जातो, तो हेतु सफल होत नाही. याचा विचार करतां, ना. यशवंतरावजी हे अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याच्या बाबतींत कायदा व व्यवहार यांची संगति घालण्याचा सतत प्रयत्न करतात, असें दिसतें. मूळ प्रश्न काय आहे हें पाहून त्यावर आपल्या विचाराचे व प्रत्यक्ष कृतीचे मुळांतच घाव ते घालतात, हेंच त्यांचे वैशिष्टय होय.
ना. यशवंतरावजी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथमत: मुंबई राज्याची व नंतर महाराष्ट्र राज्याचीं सूत्रे हाती घेतल्यावर, अस्पृश्य व नव-दीक्षित बौद्ध यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने भारतांतील इतर राज्यांना आदर्शभूत होईल असेंच मूलगामी स्वरुपाचें बहुमोल कार्य केलें आहे, ही गोष्ट कृतज्ञताबुद्धीने कोणाहि जाणकाराला मान्य करावी लागेल, 'अस्पृश्यांचा प्रश्न सोडविला पाहिजे' असा तोंडी प्रचारकरणें वेगळें व राज्यसत्ता हातांत असतांना त्या दिशेने कृतीचें प्रत्यक्षं पाऊल टाकणें हें वेगळें आहे. या दृष्टिकोनांतून विचार करतां ना. यशवंतरावजी यांनी अस्पृश्य वर्ग व नवदीक्षित बौद्ध समाज यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने जें कांही केलें त्याचें महत्त्व फार मोठें आहे. पूर्वीच्या मुख्य मंत्र्यांना वा मंत्र्यांना करतां आलें नाही असें, अस्पृश्य व नव-दिक्षित बौद्धांच्या समस्या सोडविण्याचे कार्य त्यांनी केलें आहे.