प्रेमळ वागणुकीने माणसें कायमची जोडली जातात
अशीं माणसें जोडण्याची कला छत्रपति शाहू महाराजांना साधली होती. प्रत्यक्ष देणग्यांहून अशी वागणूकच माणसाला बांधून घेते. शाहू-महाराजांच्या अशा अनेक गोष्टी सांगून कृतज्ञेतेचे अश्रू वाहणारे लोक अनेक आहेत. घरच्या मंडळींची वास्तपुस्त करणें, शेतक-यांच्या बुट्टींतली शिळी भाकर मागून खात बसणें, त्याला गाडींत बरोबर घेऊन हिंडणे या क्षुल्लक वाटणा-या गोष्टींनी शाहू महाराजांनी माणसें जिंकली आहेत.
माझे परममित्र लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे आग्रहावरून मी केवलानंद स्मारक मंदिराच्या उद्घाटन-समारंभासाठी वाईस गेलों होतों. डॉ. राजेंद्रबाबू आल्यानंतर गव्हर्नर श्रीप्रकाश व यशवंतरावजी यांच्यासह खास व्यासपीठावर जाऊन बसले. मी एक साधा नागरिक, काँग्रेसचा सभासदहि नाही. अर्थात् पदाधिकारी नव्हतों. एका लांबच्या कोप-यांत जाऊन बसलों होतो. यशवंतराववजीचें लक्ष कसें गेलें कुणाला ठाऊक, त्यांनी तेथल्या कलेक्टरना पाठवून मला बोलावून घेतले व माझी राजेंद्रबाबूंना मुद्दाम ओळख करून दिली ! वस्तुत: या गोष्टीचे कांहीच प्रयोजन नव्हतें. पण या साध्या गोष्टीने त्यांनी माझ्या मनावर पगडा बसवला हें नाकारतां येणार नाही. त्यांच्या या अशा गोष्टी किती तरी सांगतां येतील. मोठ्या माणसांची नम्र होणें हाच त्यांचा खरा मोठेपणा, नाही तर मानवी स्वभाव पाहावा ! अधिकारावर आलेला साधा शिपुरडा सुद्धा जवळच्या माणसाला ओळख देत नाही, इतका त्याला ताठा चढतो.
पूर्ण विचारांतीं मी या निर्णयास आलों आहें.
माझ्या वयाला ६५ वर्षे होत आलीं. ४० वर्षें मी राजकीय आयुष्य काढलें आहे. माझ्या आयुष्यांत अनेक स्थित्यंतरें झाली. मी कितीही भावनाप्रधान असलों तरी प्रत्येक वेळचे निर्णय मी पूर्ण विचारांतीं घेतले आहेत. प्रत्येक पाऊस टाकतांना महिनेन् महिने विचार करून निर्धाराने टाकलें आहे. स्वीकायांचा तसा माझ्या जातीचा विरोध पत्करून मीं प्रथम एकाकीच मार्ग काढला. पण त्यांत मला प्रत्येक वेळीं यशच मिळत गेलें. माझ्या व्यक्तिश: फायदा झाला असा त्याचा अर्थ नाही. समिती सोडून मी आजजो यशवंतरावांचा आणि काँग्रेसचा चाहता झालों तो कोणाच्या सांगण्यावरून झालों नाही. त्यासाठी मंगळूर जेलमध्ये व जेलमधून सुटल्यानंतरहि कित्येक महिने विचार करुन या निर्णयास आलों आहें की, महाराष्ट्राचें कल्याण यशवंतरावांच्या नेतृत्वाखालीच लवकर होण्याची शक्यता आहे. हे म्हणत असतांना मी माझें स्वातंत्र्या राखलें आहे. अद्याप मी काँग्रसेचा सभासद झालेला नाहीं व होणारहि नाही. असें असूनहि मी म्हणतों, मिळालेलं हें नेतृत्व सांभाळण्याने व बळकट करण्यानेच बहुजनसमाजाचें, तसेंच सर्वसामान्य जनतेचें, कल्याण साधणार आहे. या मतास येतांना माझ्या सदसद्विवेक बुद्धीशीं मीं प्रतारणा केली आहे अशी अंतकालींहि मला बोचणी लागणार नाहीं.
"कल्याणकारी राज्यांत जोपर्यंत शिक्षण, सहकार, शेती व आरोग्य या चार खात्यांच्या कामांना प्राधान्य आणि महत्त्व मिळत नाही तोपर्यंत तें खरे लोककल्याणकारी राज्य झालें, असें मानतां येणार नाही. या खात्यांतील लोक ज्या प्रमाणांत लोकांच्या जवळ जाऊं शकतील, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनांत ज्या प्रमाणांत आपुलकी आणि जिव्हाळा वाढेल त्याप्रमाणांत या देशांतील लोकशाही आणि राज्यकारभार यशस्वी होणार आहे."
- श्री. चव्हाण