याप्रमाणे ना. यशवंतरावजी यांनी अस्पृश्य व नव-दिक्षित बौद्ध यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मोलाची कामगिरी केलेली आहे. अर्थात् त्याचा अर्थ असा होत नाही, कीं या वर्गाच्या सर्व समस्या मूलत: पूर्ण सुटलेल्या आहेत. ना. यशवंतरावजी यांच्या या कार्यामुळे एक सुपरिणाम मात्र निश्चित दिसतो. तो असा की, गेल्या तीस वर्षांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष - अनुयायी व महाराष्ट्रांतील काँग्रेस पक्ष यांच्यांतील कडवट विरोधाची धार कमी होत असून, दोन्ही पक्षांत व पक्षनेत्यांत एक प्रकारचें नवें सलोख्याचें वातावरण निर्माण होत आहे. आपापल्या पक्षाची मूलभूत तत्त्वप्रणाली शिरोधार्य मानून दोन्ही पक्ष-अनुयायांत एकमेकांबद्दल प्रेम, बंधुभाव व सहानुभूति निर्माण झाल्यास लोकशाहीच्या विकासाला तें पोषकच ठरणारें आहे. या दिशेने दोन्हीही पक्ष-अनुयायांत खेडोपाडीं सहजीवन व सहकार या तत्त्वाने जगणारें जीवन निर्माण होईल का ? ना. यशवंतरावजी यांच्या कारकीर्दीत ही अशा सफल होईल का ?
नवा माणूस निर्माण केला पाहिजे
'माझ्या कल्पनेंतील खेडे' या विषयावर ना. यशवंतराव चव्हाण यांनी पुणे आकाशवाणीवरून आपलें मनोगत सांगितले आहे. त्यांच्या मतें ज्या खेड्यांतला समाज आपले सगळे प्रश्न एकमेकांच्या जिव्हाळ्याने आणि समजुतीने सोडविण्यासाठी एकत्र बसून त्याचा निर्णय करूं शकतो, असें पंचायतीचे जीवन जगणारे खेडे तुमच्या-माझ्यापुढे असलें पाहिजे."
- पण प्रश्न आहे तो हाच! 'असें खेडें' निर्माण होण्यासाठी खेड्याची जातवार पद्धतीवर आधारलेली समाजरचना नष्ट केली पाहिजे; व समता, बंधुता, स्वतंत्रता व न्याय अशा नवीन मूल्यावर आधारलेले नवें ग्रामीण जीवन उभे केलें पाहिजे. खेड्यांतील जातीय बंधनाच्या चक्रव्यूहांत सापडलेला माणूस मुक्त करून नवा माणूस निर्माण केला पाहिजे; नवी समाजरचना निर्माण केली पाहिजे; नवी खेडीं निर्माण केलीं पाहिजेत. तर ना. यशवंतरावजी म्हणतात त्याप्रमाणे 'माझ्या कल्पनेंतील खेडे' निर्माण होणार ! आणि '...एक मेकाकडे सहृदयतेने मदत' करण्याच्या भावनेने पाहणारा बंधूबंधूंचा असा एक निराळा समाज...' खेड्यांत कधी निर्माण होणार ? हाच मोठा प्रश्न आमच्यापुढे आहे.
हा प्रश्न ना. यशवंतरावजी सोडवतील अशी आशा मनांत धरून, त्यांच्या या ४८ व्या वाढदिवसाच्या निर्मित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतों.
"नवमहाराष्ट्राचा भाग्योदय मला माझ्या नजरेसमोर दिसत आहे. थोडी लांबची वाटचाल आपणांस करावी लागेल. वाट अवघड आहे, कष्ट कमी नाहीत. पण यश निश्चित आहे."
- श्री. चव्हाण ( सांगलीचें भाषण )