वाङ्मयाचे सामर्थ्य
भक्ती आणि बुध्दी हे महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे दोन पंख आहेत. आजच्या गतिमान व प्रगतिमान जगात अनेक समस्या आहेत. आमच्या देशात सुप्त सामर्थ्ये फार मोठी आहेत; पण अडचणीही तेवढ्याच आहेत. या अडचणी दूर करण्यात आणि माणसामाणसांतील सहकार्य व स्नेह वाढविण्यात आपण लेखकांनी हातभार लावला पाहिजे. वाङ्मय सहेतुक असावे की नाही, त्यात बोध असावा की नाही, या वादात मी पडत नाही. पण एवढे मात्र मी म्हणेन, की वाङ्मयाने माणसाचा हृदयविस्तार झाला पाहिजे.