यशवंत चिंतनिका २८

भारतीय साहित्य

जसे विश्वसाहित्या विषयी आपण उदासीन राहता कामा नये, तसेच आपण भारतीय भाषाभगिनींकडे दुर्लक्ष करता कामा नये. गेल्या पंचवीस वर्षांत सर्वच भारतीय भाषा कमीजास्त प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्यांच्यातील नव्या प्रवाहांची ओळख आपण करून घेतली पाहिजे. भारतीय साहित्य म्हणजे वेगवेगळ्या भाषांतून लिहिल्या जाणा-या सामाजिक अनुभवांचा आरसा असेल. मी केवळ राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने राष्ट्रीय साहित्य आवश्यक आहे, असे म्हणत नाही. पण ज्ञानेश्वर, तुकाराम आणि कबीर भारतीय कवी आहेत, असे मी मानतो याचे कारण भारताच्या अंतरंगाचे दर्शन त्यांचे साहित्य घडविते. आधुनिक काळात शरच्चंद्र किंवा ह. ना. आपटे हे जसे या राष्ट्रीय उष:कालाचे कादंबरीकार होते, तसेच आता राष्ट्रीय प्रबोधनाचे साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत. भारतीय संगीत, भारतीय रंगभूमी या संकल्पना आता जशा रूढ होत आहेत, तशी भारतीय साहित्य ही संकल्पना आता रूढ झाली पाहिजे.