मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४९-२

‘‘श्री. शिवाजीराव सावंत यांच्यासंबंधी लिहिलेले तुमचे पत्र मिळाले. परवा २९मेला शिवाजीरावांची प्रतापगडावर भेट झाली. ‘छावा’ माझ्या हस्ते भवानी मातेच्या चरणी अर्पण करावा म्हणून मुद्दाम आले होते. मला त्यांचा प्रश्न माहीत आहे. तुम्ही कळविलेल्या कामात किंवा त्यांच्या इतर दुस-या कामात माझा उपयोग झाला तर मला आनंद वाटेल.’’ मी या पत्रांचा उल्लेख जाणीवपूर्वक यासाठी करीत आहे की, यशवंतरावजी आपला राजकीय आणि प्रशासकीय व्याप सांभाळून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांसोबत राहायला ते विसरत नव्हते. त्यांच्याकडून घेण्यासारखा हा त्यांचा अतिशय सुंदर असा हा गुण आहे असं मला वाटतं.

दरम्यान बीडहून माझी बदली औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात झाली. मार्च १९८०चं राजकारण खूप उलटंपालटं झालं होतं. यशवंतरावजींचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले. २९ मार्च ८०च्या त्यांच्या मला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं, ‘‘तुमचे १७ मार्चचे पत्र मिळाले. राजकारणातील अस्थिर परिस्थिती आणि माणसे यासंबंधी तुम्ही लिहिलेले विचार वाचले. तुमच्या सद्भावानाबद्दल मी आभारी आहे. पत्रासोबत पुस्तक पाठविले असल्याचे तुम्ही लिहिले आहे. पण ते मला मिळाले नाही. कदाचित पोस्टातून अजूनही मिळेल. पुस्तक पाहिल्यानंतर प्रतिक्रिया जरूर कळवीन. लगेच ९ एप्रिल १९८० ला माझं पुस्तक त्यांना मिळाल्यावर लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं, ‘‘तुमचे पत्र व ‘उठाव’ पुस्तक मिळाले. आपुलकीने तुमचे नवे पुस्तक पाठविल्याबद्दल आभारी आहे. १०-१२ दिवसांच्या प्रवासाकरिता मी महाराष्ट्रात जाणार आहे. पुस्तक वाचण्यासाठी बरोबर घेत आहे. कधी प्रत्यक्ष भेटीचा योग आला तर बोलता येईल.’’ माझ्या ‘उठाव’ या कवितासंग्रहाला यशवंतरावजी चव्हाण यांनी वाचल्यानंतर ३जून १९८०च्या पत्रात मला लिहिलं. ‘‘ ‘उठाव’ निवडणूकीच्या दौ-यात वाचला. मला अतिशय आवडला. अभिनंदन.’’ आपलं राजकारण, आपली कामे सांभाळून यशवंतरावजी माझ्यासारख्या तरुण साहित्यिकाचे पुस्तक वाचायला आणि वाचून पुस्तकासंबंधी प्रतिक्रिया कळवायला विसरत नाहीत हा त्यांचा गुण आमच्या मराठी या विषयाच्याच नाहीतर सर्व विषयाच्या प्राध्यापकांनी का घेऊ नये? दरम्यान मराठवाड्यातील आम्ही काही साहित्यिकांनी ‘मराठी साहित्य सभा’ स्थापन करण्याचा आणि साहित्य सभेच्या उद्घाटनाला यशवंतरावजी चव्हाण यांना बोलविण्याचा निर्णय घेतला. १५ जून १९८१च्या पत्रात माझ्या निमंत्रणाला यशवंतरावजींनी उत्तर दिले. ‘‘आपले १० जूनचे पत्र मिळाले. आभारी आहे. एका नवीन राजकीय वादळात सध्या मी आहे. ते काहीसे आटोक्यात आल्यानंतर मग बाकीचे उद्योग. त्यामुळे जून अखेरीस मी येऊ शकेन असे दिसत नाही.’’ यशवंतरावजी या दरम्यान आय. काँग्रेसमध्ये दाखल होऊ इच्छित होते पण प्रवेश दिला जात नव्हता. या त्यांच्या मन:स्थितीची छाया वरील पत्रात स्पष्ट उमटली आहे. अखेर माझ्या पाठपुराव्यानंतर त्यांनी साहित्य सभेच्या उद्घाटनासाठी २९ नोव्हेंबर १९८१ तारीख दिली. आणि त्याच्या सहा दिवस अगोदर २३ नोव्हेंबर १९८१ला यशवंतरावजी आय. काँग्रेसमध्ये दाखल झाले.

साहित्य सभेच्या उद्घाटनाचं सुंदर भाषण त्यांनी केलं या भाषणात त्यांनी सांगितलं. ‘‘माणसांनी भाषा निर्माण केली आता भाषेला माणसे निर्माण करावी लागणार आहेत.’’ याच भाषणाच्या वेळी त्यांनी नागपूरच्या दलित कवीची कविता म्हणून दाखविली.

‘‘चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो
कुणी फिरकलं नाही
सोनं पांघरून चिंध्या विकल्या
गर्दी हटली नाही.’’

सायंकाळी आम्ही त्यांचं देवगिरी व्याख्यानमालेत ‘भारत समाजवादापासून अजून किती दूर?’ या विषयावर व्याख्यान ठेवलं होतं. पन्नास मिनिटे त्यांनी या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. म्हणाले, ‘‘कल्याणकरांनी मला हा विषय जेव्हा दिला तेव्हा मी कोणत्याच राजकीय पक्षात नव्हतो, आता एका राजकीय पक्षात आहे.’’ प्रचंड हशा यावेळी पिकला. कारण नुकतेच यशवंतरावजी आय. काँग्रेसमध्ये आले होते. त्यामुळं त्यांचे भाषण ऐकण्याची प्रचंड उत्सुकता औरंगाबादकरांना लागलेली होती. गर्दी तर अफाट होती. यशवंतराव बोलत होते, ‘‘आता कल्याणकरांनी ते सुरुवातीला सांगितलं त्याचा उल्लेख मला करायला पाहिजे आहे. त्यांनी सांगितलं की मी एक विचारवंत म्हणून या विषयावर बोलणं अवघड आहे. कारण मी Practical politics ज्याला म्हणतात, असा एक व्यावहारिक राजकारणी म्हणून गेली ५० वर्षे काम केलेलं आहे.’’ यापुढचे विचार मांडताना यशवंतरावजींनी त्यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांबद्दल आर्थिक सवलतीचा जो निर्णय घेतला त्या संदर्भातला एक प्रसंग सांगितला. म्हणाले, ‘‘ज्यांचं उत्पन्न ९०० च्या आत आहे त्यांच्या मुलांना विद्यापीठीय शिक्षण मोफत केलं जावं असा आम्ही निर्णय घेतला. त्या दरम्यान पुण्याला शिक्षण तज्ज्ञांचं एक Seminar होता.