मी त्यांना त्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे सुचविले. या पुस्तकाला यशवंतरावांची प्रस्तावना लाभावी अशी त्यांची इच्छा होती. यशवंतराव त्या वेळी जसे मुख्यमंत्री होते तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षही होते. हिंदुराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक होते, म्हणून यशवंतरावांची प्रस्तावना असावी अशी त्यांची इच्छा! तशी पत्रे पाठवून त्यांनी यशवंतरावांना विनंती केली. आणखी एकदोघांकडून सांगून पाहिले. पण मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे त्यांना लिहिणे शक्य झाले नाही. हिंदुराव फार निराश झाले व मलाच आग्रह करू लागले. तुम्हीच लिहा आता प्रस्तावना. मी म्हटले, ‘‘तुम्हांला यशवंतरावांनी प्रस्तावना लिहावी अशी इच्छा आहे तर मीच यशवंतरावांची प्रस्तावना मिळेल असा प्रयत्न करतो.’’ माझ्या या बोलण्याने ते साशंक दिसले. मग मी त्यांचे देखत यशवंतरावांना पत्र लिहून, हे लेख मला फार आवडले आहेत व आपण त्यांच्या पुस्तकास चार शब्द प्रस्तावना लिहावी असे कळविले.
आठ दिवसांतच त्यांचे पत्र आले. मी प्रस्तावना लिहितोय. लेखन पाठवा. ते पत्र पाहून हिंदुरावांना फार आश्चर्य व आनंदही वाटला.
यशवंतरावांनी त्या पुस्तकाला छोटी पण सुंदर प्रस्तावना लिहिली.
पुढे भेट झाल्यावर मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही कर्मवीर पुस्तकास फार छान प्रस्तावना लिहिलीत. काही वाक्ये अगदी काव्यमय आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘अहो, तुमच्या कविता वाचूनच मी काव्यमय लिहू लागलो.’’ आणि मग विनोदाने हसत म्हणाले, ‘‘तुमच्या कवितासंग्रहास लिहावयाची आहे का प्रस्तावना? मी कशी लिहितो पाहा.’’ आणि पुढे माझ्या ‘स्वर’ कवितासंग्रहास प्रस्तावना लिहावयास मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती सुंदर लिहिलीही.
अलीकडेच कराडला त्यांच्या विरंगुळा बंगल्यावर त्यांना भेटायला गेलो. श्रीनिवास कुलकर्णी माझे बरोबर होते. कराड तालुक्यातील लेखक बजरंग शेलार यांचे पुस्तक प्रकाशन त्यांचे हस्ते, त्यांच्याच बंगल्यात अनौपचारिकरित्या होणार होते. मोजकीच माणसे उपस्थित होती. माझ्या येण्याने यशवंतरावांना फार आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘कविराज आले आहेत, त्यांचे हस्ते प्रकाशन होऊ दे.’’ मी यशवंतरावांना म्हटले, ‘‘लेखकाच्या इच्छेस मान देऊ.’’ आणि मग यशवंतरावांनी प्रकाशन जाहीर केले. मीही दोन शब्द बोललो व चहापानानंतर हा छोटा घरगुती समारंभ संपला.
प्रकाशनास जमलेली माणसे गेल्यानंतर यशवंतराव मला म्हणाले, ‘‘तुमच्या औदुंबरला संमेलनास यंदा कोण येणार आहे? आपले संमेलन ही एक अपूर्व गोष्ट आहे.’’ मी शांता शेळके येणार असल्याचे सांगितले व सहज विचारले, ‘‘आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. आता दिल्लीस मंत्री आहात. आपल्या देशात, एखाद्या लहान गावात अशा प्रकारचा साहित्य सोहळा आपण कोठे पाहिला आहे का?’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘मी तुम्हांला हेच सांगणार होतो की, आपल्या देशात असा सोहळा भरवणारे एकही गाव नाही आणि आपल्या छोट्या गावात ग्रामीण परिसरातील लोकांसाठी साहित्यिकांचे दर्शन घडविणारा, त्यांची भाषणे ऐकविण्यासाठी धडपडणारा तुमच्यासारखा साहित्यिकही मला कोठे भेटला नाही.’’ हे त्यांचे शब्द ऐकून मला मोठी धन्यता वाटली.