मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४९

४९. महाराष्ट्रातील लोककर्तृत्वाचा सोनहिरा – बा. ह. कल्याणकर

ख-या अर्थानं यशवंतरावजी चव्हाण हे सामान्य जनतेचे पहिले मुख्यमंत्री होते. सामान्य जनतेतून वाढलेले सामान्यांचे मित्र होते. शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात जोतीराव फुले आणि राजर्षी शाहू महाराजांएवढी कर्तृत्त्ववान माणसं महाराष्ट्रात झाली. यशवंतरावजी चव्हाण यांनी फुले, शाहू आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांतील नेमका भाग घेऊन आपली सत्ता त्या दिशेनं रावबविली. महाराष्ट्रातल्या सर्व स्तरांतील आणि क्षेत्रातील माणसांपर्यंत यशवंतराव चव्हाण पोचलेले नेते होते. त्यांचं नेतृत्व वरून आलेलं नेतृत्व नव्हतं, ते लोकांतून वाढलेलं नेतृत्व होतं. त्यामुळं यशवंतरावांच्या राजकीय कृतीला लोकांचं भान सतत जागतं होतं. महाराष्ट्रातील लोककर्तृत्त्वाचं ते एक सुसंस्कृत नेतृत्व होतं.

माझा आणि यशवंतरावजी यांचा संबंध खूपच अलीकडचा. मी पाचवीला असताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ खूपच जोरात होती. आमचा कंधार तालुका म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीचा बालेकिल्ला. या वादळी चळवळीच्या महापुरात मीसुद्धा सहभागी होत गेलो. यशवंतराव चव्हाण त्या वेळी द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आपली आग्रही भूमिका लोकांसमोर ठेवत होते. यशवंतरावजी चव्हाण आणि नेहरू हे त्यांच्या टीकचे लक्ष्य असायचे. माझ्या या कोवळ्या वयावर ही चळवळ संस्कार करीत होती. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने का नाहीत? नेहरूंच्या बाजूने आपली भूमिका काय म्हणून घेऊन आहेत? संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांची भूमिका मनाला पटत होती. आणि मी पाचवीत असताना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना एक पत्र लिहून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविरुद्ध का आहेत हे विचारलं. माझ्या या पत्राला त्यांचे सेक्रेटरी डोंगरे

यांची सही असलेलं उत्तर आलं. त्यांनी कळवलं, ‘तुमचं मत मुख्यमंत्र्यांना सादर केलं आहे.’ मला त्यांच्या या उत्तरानं खूपच आनंद झाला. यशवंतराव चव्हाणांचं पत्र आल्याचा हा आनंद मला संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यासारखाच होता. त्या वेळी ते पत्र मी माझ्या खिशात कितीतरी दिवस बाळगून होतो आणि अनेक मित्रांना ते पत्र दाखवत होतो.

यशवंतरावजी चव्हाण यांची पहिली सभा मी ऐकली नांदेडला ऑगस्ट १९६९ ला. मी त्या वेळी पदवीपूर्व वर्गात नांदेडच्या यशवंत कॉलेजमध्ये शिकत होतो. १९ जुलै १९६९ ला बंगलोर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीत एक वादळ उभे राहिले होते. प्रारंभी यशवंतराव चव्हाण श्री. संजीव रेड्डी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन होते. हे वादळ बैठकीपुरतं थांबलं नाही. तर या वादळानं एकसंध काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे केले. सिंडिकेट विरूद्ध इंडिकेट या दोन गटांत काँग्रेस पक्ष विभागला गेला. यशवंतराव चव्हाण पुढच्या घडामोडीत सिंडिकेट बरोबर न जाता इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा देत भूमिका मांडू लागले. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, इ. पावले उचलून आपल्या सत्तेला पुरोगामी वळण दिले होते. नांदेडच्या जुन्या मोंढा मैदानावर यशवंतराव यांची काँग्रेस पक्षाची ही नवी भूमिका प्रतिपादन करणारी प्रचंड जाहिर सभा झाली. सभेला सारं नांदेड शहर लोटलं होतं आणि यशवंतरावजी चव्हाण यांना फॉर्म गवसला होता.

यशवंतरावजींची इतकी मोठी आणि इतकी चांगली सभा त्यानंतर कधीच मी ऐकली नाही. लोकशाही जीवन, समाजवादी विचारप्रणाली, काँग्रेस पक्ष, जन आंदोलन, सामान्य जनतेच्या जीवनात लोकशाही राजकारणाबद्दलचा विश्वास इ. विषयांवर यशवंतरावजींचं प्रतिभाशाली, वक्तृत्वपूर्ण आणि समाजवादी कृतींचा गतिमान आवाका असलेलं भाषण मी त्या दिवशी ऐकलं. त्यांना मी अगदी पहिल्यांदाच पाहात होतो. अगदी जवळून त्यांना मला पाहायचं होतं, ऐकायचं होतं. एक सुवर्णसंधी त्या दिवशी मी अनुभवली. कंधार हा माझा तालुका. कंधारचं शिवाजी कॉलेज हे शेतकरी कामगार पक्षाच्या संचालनाखाली चालणारं. १९६०-६१च्या दरम्यान हे महाविद्यालय बंद पडतं की काय अशी परिस्थिती. यशवंतरावजी या महाविद्यालयात पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आले आणि या महाविद्यालयाचं जीवन पुन्हा ताजं झालं. संस्था कोणत्या पक्षाच्या नसतात त्या जनतेच्या असतात आणि म्हणून यशवंतरावजींनी महाराष्ट्रभर ज्या ज्या संस्था समाजाच्या जवळच्या संस्था आहेत त्या सर्व संस्था आपल्या घरच्या बागेला पाणी दिल्यासारख्या सांभाळल्या, जोपासल्या, त्यांची अंत:करणापासून पाठराखण केली. महाराष्ट्रातील आजच्या राजकारणानं आणि महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी यशवंतरावजींकडून एवढी बाब जरी आत्मसात केली तरी महाराष्ट्राचं लोकजीवन फुलायला वेळ लागणार नाही.