मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४८-१

कोल्हापूरच्या रोखाने भरधाव गाडी धावत असते. रस्त्याच्या कडेला रस्त्यावर मैलकुली माती पसरण्याचे काम करीत असतात. त्यांच्यावर देखरेख करीत उभट फरटोपी घालून एक मुकादम उभा असतो. त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धावत्या गाडीतून ओझरता पाहतो. ‘अरे, गाडी मागे ने, वीर माने वाटतो?’ असा ड्रायव्हरशी मोजका संवाद होतो. धावती गाडी थांबते. मागे येते. जतींद्रनाथ दासांचा चाहता गाडीतून बाहेर येतो. दोघे मित्र मोजक्याच दोन-तीन लोकांच्यासमोर त्या निर्मनुष्य रस्त्यावर एकमेकांना कडकडून भेटतात. या उरभेटीला कारणीभूत असतो १९४२ चा काळ. दोघांही मित्रांनी एकाच बेडीत ब्रिटिशांच्या तुरुंगात काही दिवस काढलेले असतात, ही त्यामागील घटना, दोघेही आपआपल्या स्थानावर संतुष्ट असतात. एक मैलकुल्यांवरचा मुकादम तर एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री !

पुण्यात वृद्ध महिलेचा सत्कार असतो. एका वृद्धेला बालगंधर्व स्टेजच्या पाय-या चढणे शक्य होत नाही, ज्यांच्या हस्ते हा सत्कार होत असतो तो प्रमुख पाहुणाच स्टेजच्या पाय-या स्वत: उतरून वृद्धेला हार घालतो.

हे असे कितीतरी प्रसंग अक्षरश: असंख्य ज्या माणसाला दैनंदिन जीवनात घडत असतात त्याचे नाव असते यशवंतराव चव्हाण!

पुण्यात म.म.दत्तो वामन पोतदार यांच्या समवेत कार्यक्रमाचा फोटो आदल्याच दिवशी वर्तमानपत्रात पाहावा आणि दुस-याच दिवशी माधवराव बागल यांच्या समवेत त्याच माणसाच्या कार्यक्रमाचा फोटो कोल्हापुरात यावा ही किमया यशवंतरावच करू जाणे.

प्रत्यक्ष पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फोनवरून अट घालून सवाल विचारला असताना की, ‘मुझे सिर्फ हाँ या ना इन दोही शब्दोंमें जवाब देना। मैने आपकी भारत के रक्षामंत्री के नाते दिल्ली लेनेका निर्णय तय किया है। जवाब दिजीये हाँ या ना।’’ या प्रश्नाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जबाब देतो, ‘‘लेकिन पंडितजी हाँ या ना मैं भी जबाब देनेसे पहिले मुझे कमसे कम एक व्यक्तीसे पूछनाही होगा।’’ पंडितजी गोंधळून दिल्लीहून विचारतात, ‘‘ऐंसी कौनसी महनीय व्यक्ती है जिसकी राय तुम्हे पूछनीही होगी!’’ या प्रश्नाला अभिजात साहित्यिकाचा मिस्किलपणाने जबाब जातो, ‘‘मेरी धर्मपत्नी।’’ पंडितजी दिल्लीहून फोनवर हे उत्तर ऐकताना खळखळून हसतात.

अशा अनेक हृद्य प्रसंगांनी, व्यक्तिविशेषांच्या सहवासांनी आणि सर्वांहून अधिक आपणच, आपणाहून अनुभवसंपन्न, विवेकसमृद्ध झालेले असे यशवंतरावांचे जीवन आहे. त्यांच्या इंग्लिशमधील चरित्राला हात घालणा-या एका लेखकाने फार पूर्वीच त्यांच्याबद्दल लिहून ठेवले. "chavan is a man of crisis" पडत्या काळाचे प्रतिनिधी म्हणूनच चव्हाणांचे मूल्यमापन करता येईल.

जेव्हा यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्यपूर्वकाळात राजकारणात पडले तेव्हा देशाचा पडता काळ होता. त्यापुढील १९४२ च्या चळवळीचा काळ हा त्या काळचे नंबर एकचे नेतृत्व सरकारने गजाआड केले होते. म्हणून तोही पडता काळ होता. स्वातंत्र्यानंतर व्यक्तिश: यशवंतरावांच्या जीवनातील पडता काळ आला तो संयुक्त महाराष्ट्राच्या वेळचा ! त्यानंतर आला तो १९६२ साली. देशाने चीनकडून सणसणीत सैनिकी मार खाल्ला त्यावेळचा पडता काळ ! आणीबाणीचा काळ ! ती संपतानाचा काळ ! जनता पक्षाचा कालखंड ! नंतर आज देशभर सर्वांगीण समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे तो पडत्याचा काळ ! या सर्वांना अमाप धैर्याने तोंड देत व समर्थ रामदासांनी वर्णन केलेल्या शब्दात, ‘‘सावधपर्णेसि केले राजकारण’’ असे वागत महाराष्ट्राचे हे नेतृत्व चालले आहे.