मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४७-१

मधूनमधून यशवंतरावांचे कवितेबद्दल पत्र येतच होते. १९५८ साली माझा ‘जलवंती’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. तोही मी त्यांना पाठविला. त्यांना त्यातील कविता फार आवडल्या. त्यासंबंधीची एक आठवण, - अंत:करणाला भिडणारी. त्या वेळी ते मुंबईला मुख्यमंत्री होते. त्यांना भेटायला डॉ.सरोजिनी बाबर गेल्या होत्या. सरोजिनीताई त्यांच्या भेटीच्या हॉलमध्ये गेल्या. त्यावेळी ते छोटेसे पुस्तक वाचत होते. सरोजिनीबार्इंनी त्या आल्याची कल्पना दिली. ‘ताई बसा’ म्हणाले, आणि पुस्तक वाचनात गढून गेले. सरोजिनीबार्इंना कळेना, एवढे काय वाचतायत् ! साहेब वाचत होते, थांबत होते, काही खुणा करीत होते. मधून मधून त्यांच्या चेह-यावर हास्य, कारूण्य, प्रसन्नता यांच्या लाटा उमटत होत्या. त्यांनी पुस्तक वाचून संपवले आणि म्हणाले, ‘‘आता बोला!’’ सरोजिनीबाई म्हणाल्या, ‘‘आपण काय वाचत होता ते आधी सांगा.’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘आहे तुमच्याच कवींचे पुस्तक! कवी सुधांशूंच्या कवितांचे पुस्तक वाचत होतो. फारच सुंदर कविता आहेत. मला फार आवडल्या. त्यांच्या आईसंबंधीच्या कविता अंत:करणाला भिडणा-या आहेत. त्या वाचून मला माझ्या आईची आठवण होते.’’ आणि ते नकळत भारावल्यासारखे झाले.

यशवंतरावजी मुख्यमंत्री असताना मुंबईचे गायक आर.एन.पराडकर यांच्या गायनाचा कार्यक्रम त्यांच्या बंगल्यावर झाला. पराडकरांनी प्रथम दोन-तीन गाणी म्हटली, परंतु ती माझी नव्हती. यशवंतराव म्हणाले, ‘‘पराडकर, आपण सुधांशूंची गीते म्हणता ना?’’ पराडकर म्हणाले, ‘‘हो! मी सुधांशूंची खूप गीते म्हणतो.’’ मग यशवंतरावांनी सांगितले, ‘‘मला फक्त सुधांशूंचीच गीते ऐकावयाची आहेत.’’ आणि मग पराडकरांनी तास दीड तास माझीच गीते गायली. यशवंतरावांनी आणि सौ. वेणूतार्इंनी माझी ती गाणी मोठ्या प्रेमाने ऐकली.

ही हकीगत दोन दिवसांनी स्वत: पराडकरांनी मला कळविली आणि लिहिले की, ‘‘मुख्यमंत्र्यांना किती आवड आहे आपल्या कवितांची! त्यांना काय माहीत माझ्या संबंधीचा जिव्हाळा आणि त्यांची रसिकता!’’

एकदा मी आकाशवाणीच्या काही कामानिमित्त मुंबईस गेलो होतो. याच वेळी मी यशवंतरावांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेलो. मंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग! त्यामुळे मी थोडा बावरलो होतो. मी दाराशी गेल्यावर आत माझ्या नावाचे कार्ड पाठविले आणि काय आश्चर्य! स्वत: यशवंतरावच स्वागतासाठी दाराशी हजर! मी खूप संकोचलो. मला आपल्या शेजारील कोचावर बसविले आणि आत जाऊन सौ. वेणूतार्इंना मी आल्याचे सांगितले. वेणूताईही बाहेर आल्या आणि मला पाहताच ‘‘वा! दत्तदिगंबरच आले की?’’ असे म्हणून मला नम्रतेने नमस्कार केला. मला ‘दत्त दिगंबर’ या शब्दाचे अजूनही आश्चर्य वाटते. मी औदुंबरचा म्हणून दत्तदिगंबर की त्यांना माझे ‘‘दत्तदिगंबर दैवत माझे’’ हे गाणे आवडते म्हणून दत्त दिगंबर, हे मला कळेचना! खरे म्हणजे दोन्हीही खरेच होते.

वेणूताई पूर्वी एकदा औदुंबरी आमच्या घरी आल्या होत्या. माझ्या पत्नी त्यावेळी औदुंबरी महिला मंडळ चालवीत होत्या. त्यांनी आपल्या महिला मंडळातील स्त्रियांची वेणूतार्इंना ओळख करून दिली होती. त्यांनी शेरे बुकात त्यांचा अभिप्रायही घेतला होता. सौ.प्रमिलाबाई अजूनही मोठ्या अभिमानाने वेणूतार्इंचा तो शेरा सर्वांना दाखवितात.

याच सुमारची गोष्ट. आमच्या भागातील दुधगावचे शिक्षक हिंदुराव पाटील मधूनमधून काही लिहीत असत व लिहिलेले मला दाखवीत असत. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काही प्रख्यात कर्मवीरांच्या कथा लिहिल्या होत्या. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, समाजसेवक- गोपाळराव आगरकर, महर्षि आण्णासाहेब कर्वे, कर्मवीर भाऊराव आण्णा, डॉ.आंबेडकर यांच्या कथा मला फार आवडल्या.