मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४६-४

‘‘मोठी आई, आम्ही जातो.’’

‘‘कुठं वो? तुमची माय नाही, तुमचा बाप नाही.’’

‘‘माहित आहे गे! पण आम्ही पिक्चरला चाललो!’’

‘‘कोठं?’’

‘‘काय मोठी आई! तुला समजत तर काही नाही. पण सांगावं मात्र लागतं,.. अगे, पंचशीलमध्ये ‘पिक्चर’ लागलं आहे. आत्ता अडीच वाजता ‘मॅटिनी’ सुरू व्हायचा आहे. आमच्या जवळ पैसे आहेत. बाबांनी सांगितलं म्हणून तुला सांगून जातो.’’

संवाद संपला, मुली सिनेमाला गेल्या. आणि ‘पिक्चर’, ‘मॅटिनी’, ‘शो’ हे तीन शब्द न समजल्यामुळे अर्थ ‘बह्याड’’ ठरून तिच्या पोटच्या पोराला आपली आत्मग्लानी सांगू लागली.

पुसदच्या माझ्या अध्यक्षीय भाषणात कसल्यातरी धुंदीत गोष्ट सांगून झाल्यावर ऊध्र्व बाहू करून मी आवेशात आलो

‘‘बाबांनो, भारतात उपलब्ध होणा-या सर्व पदव्या मिळविलेल्या माझ्यासारख्या लेखकाची ही आई! गेली चार हजार वर्षे ऋषी शेतीपासून तो साधी शेती करणारा कष्टाळू शेतकरी, त्याला मदत करणारी त्याची कष्टाळू बायकामुले...

या देशातल्या राबणा-या आया-बहिणी, इथले कामगार, इथले अलुते-बलुते सर्वच या विसाव्या शतकाच्या मध्यावर ‘‘बह्याड’’ ठरली आहेत का? तर त्यांना ‘पिक्चर’, ‘मॅटिनी’, ‘शो’ असले भुक्कड इंग्रजी शब्द येत नाही म्हणून! व्यासांपासून तर विनोबांपर्यंत सगळे हरले आणि जीत झाली कुणाची? तर कवडीमोलाच्या ह्या तीन शब्दांची! यापुढे मला सांगा, तुमची मराठी भाषा बोलेल कोण आणि वाचेल कोण?

‘‘नवल असे की, भूमितीच्या प्रमाणाने इंग्रजीची प्रमादी प्रतिष्ठा वाढतच आहे. सोय, व्यवहार म्हणून अधिकाधिक ‘‘बह्याड’’ एकाचे दोन, दोनाचे दहा होत आहेत. अन् वर तेच ‘‘मराठी असे आमुची मायबोली!’’ कर्म!

इथेच मी थांबलो होतो. इथेच यशवंतराव गहिवरले होते, वेणूतार्इंच्या डोळ्याला पदर होता. अन् दोन सहज खा-या थेंबांनी मी जो चिंब झालो तो अजून आजतागायत तसाच !... तोच !..

चांगल्याला वाईट म्हणणे या चालीचे अनुसरणे करायला अहंकाराशिवाय इतर भांडवल नको असते. शिवाय या भांडवलावर माणूस विद्वान ठरतो. चांगल्याला चांगले म्हणायचे, एवढेच नव्हे तर त्याचे कौतुक करायचे! याला जी शक्ती लागते त्या शक्तीचे पोषण फक्त ऋजुत्व करू शकते, पण त्यासाठी अगोदरचे तपादी गुण मिळवावे लागतात, त्याची दाद घ्यायची तर अशाच एका मूर्तिमंत ऋजुत्वाची आठवण करावी लागते. प्रत्येक माणसाला आई असतेच. पण देवाला आई असते की नाही, मला माहीत नाही, पण माणसाला आई असणे हे माणसाचे देवपण ! देवाचे ‘‘आई नसणे’’ हे त्याचे माणूसपण. त्यातले खरे काय अन् खोटे काय, ह्यासाठी हवे असलेले आर्जव हाच तर खरा साधनामार्ग आहे !