मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४६-३

"कुठे काय?.. काहीच नाही रे ! पण बापू, मी तुला आपली येरीच विचारते असं वाटतं की मी रांडल्याक दिवसेंदिवस "बह्याड" होत चालली आहे !"

माझ्या हातचा घास आपोआप ताटात पडला. खरकट्या हातानेच मी आईला बिलगलो. तिला जवळ घेत म्हणालो, " आई तुला बह्याड म्हणणारा अजून जन्मालाच यायचा आहे. तू बह्याड झालीस तर तुझा देवही बह्याड होईल ! काय झालं ते मला सरळ सांग इथे फक्त तू आणि तुझ्या पोटचा पोरच आहे !"

"तसं काही झालं नाही रे?.... बह्याड म्हणजे असं की, तुझ्या या टोंगळ्या एवढ्या टोच्या... (माझ्या तीन मुली ) आजकाल जे बोललेत ते सुद्धा मला समजत नाही."

मी गप्प बसलो. खरकटा हात आडवा करून कसे तरी डोळ्यांतले खारट पाणी टिपलें.

सायंकाळी आई मुरलीधराच्या देवळात गेल्यानंतर सर्व गोष्टींचा खुलासा झाला. सुनेशी आईचे काहीच बिनसले नव्हते. उलट सूनच अचंब्यात पडली होती. त्यामुळे मी भांड्यात पडलो. आईच्या बह्याडपणाचे कारण माझ्या तीन मुली!

या तीन मुलींना घरी सर्व स्वातंत्र्य होते. त्यांच्या स्वखर्चासाठी त्यांची आई त्यांना नियमित पैसै देत असे. खाण्यापिण्याच्या गरजांबाबतही एक दुस-यावर अवलंबून राहण्याची चाल आमच्याकडे नव्हती. मुलांना एकदाच मी सांगितले, ‘‘हे बघा, तुम्ही कसं वागता, कसं राहता हा माझा विषय नव्हे. मीही एक तुमच्यासारखा एक धडपडणारा माणूस. पण आपल्या घरात एक रीत मी रूजवली. मी कॉलेजात जातो तेव्हा रोजच आईला सांगतो की, ‘‘आई मी निघालो.’’ तुमची आई देखील रोजच सांगते, ‘मोठी आई, मी जाऊन येते,’ तीच चाल तुम्ही पाळावी. तुम्हाला काठेही जाण्याची मनाई नाही. पण जाताना मोठ्या आईला मोठेपणा द्या. मायेचे कढ तुम्हाला अजून समजायचे आहेत. सध्या त्याची गरज नाही.’’

माझी मुलेही चाल पाळू लागली. आईच्या त्या ‘बह्याड’ दिवशी दोन कॉलेजात जाणा-या आणि एक हायस्कूलमध्ये असणा-या मुलींमध्ये जो संवाद झाला तो येणेप्रमाणे ...

‘‘अय्या, सुमाताई, अगे, आज पंचशीलमध्ये बघ ‘जागते रहो’ पिक्चर लागलं आहे. चलायचं? अनायसे तिघीही आपण मोकळ्या आहोत.’’

‘‘अगे कुंदे, अडचण काही नाही... पैसे आहेत आपल्याजवळ. पण आता शो सुरू व्हायला आहे अर्धा तास आणि या प्रभाचा नट्टापट्टा आटोपून आपण पोहोचणार केव्हा?’’
’’मी दम देते प्रभाला, जायचं असेल तर ये, नाहीतर उडत जा.’’

आता ह्या मॉर्डन मुलींची तयारी म्हणजे काय असते, हे आई-बाप झाल्याशिवाय कळणे अशक्य. तशा माझ्या मुली पराक्रमीच. त्यांनी तशी दहा मिनिटात तयारी केली. दोघींनी जामानिमा चढविला. धाकटी प्रभा सॅन्डल्स नावाचे एक अद्भुत पादत्राण चढवायला लागली आणि सुमाताई किंचाळली..

‘‘अय्या, मोठ्या आईला सांगायचं राह्यलचं! जा गे प्रभे, मोठ्या आईला सांगून ये!’’

लेखकाची मुलगी! नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये, असं म्हणत म्हणत ती मोठ्या आईजवळ जाऊन थडकली. झाला तो संवाद असा...