मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४५-३

गेली अकरा वर्षे मी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा सभासद आहे. पण माझी त्यांची भेट झाली की, ते पहिला प्रश्न विचारतील "नवीन काय लिहिताय? " मी माझ्या मनातल्या कल्पना, योजना सांगतो. ते लवकरलवकर लिहिण्याचा आग्रह करतात. मग आम्हा दोघांचेही मित्र असे काही साहित्यिक आहेत, त्यांची चौकशी सुरु होते. मराठीतल्या कुण्या लेखकाचे आपण काय वाचले त्याचा ऊहापोह होतो. अन्य भाषेतला कुठला ग्रंथ नव्याने वाचला. त्याचे नवनीत मला आवर्जून दिले जाते. केवळ साहित्य आणि कला यांच्यासंबंधीची आमची बोलणी इतकी रंगत जातात की, त्यांच्या कुणीतरी सचिवाला येऊन आठवण करावी लागते. "साहेब, वेळ झाला. आपल्याला कार्यक्रम आहे!" मग यशवंतराव उठतात. फार प्रसन्नपणे हसतात. अगदी मनापासून म्हणतात, "अण्णा, दिल्लीला या."

"जरूर!" मी उत्तर देतो.

त्यांनी म्हणावे, आपण होकार द्यावा ठीक आहे. पण एकदा खराच योग आला. मुलीला "स्थळ" शोधण्यासाठी मी सहकुटुंब दिल्लीला गेलो त्याच वेळी मला "पद्मश्री" पदकही घ्यायचे होते. पदकग्रहणाचा समारंभ झाला. दुस-या दिवशी यशवंतरावांचे आमंत्रण. सा-या महाराष्ट्रीय पारितोषिक विजेत्यांचा त्यांनी सत्कार केला. या समारंभाला माझी पत्नी आणि मुलगी याही हजर होत्या. यशवंतरावांशी त्यांची ओळख झाली. सौ. वेणूताईंशी परिचय झाला. आम्हाला तिघानाच मग त्यांनी भोजनासाठी बोलावले. अगदी साधा बेत भारताच्या कोणा श्रेष्ठ नेत्यासमोर आम्ही बसलो आहोत असे आम्हाला वाटलेच नाही. यशवंतराव व वेणूताई दोघांच्याही वागण्यातील जिव्हाळा खरोखरीच अविस्मरणीय होता. त्या दिवशी पोटभर जेवलो. पोटभर बोललो.

यशवंतराव शूर आहेत तितकेच हळवे आहेत. आई आणि पत्नी यांच्याविषयी त्यांच्या मनात कमालीचा प्रेमभाव आहे. आईला तर ते फार मानीत असत. एक लोक-साहित्यविषयक परिसंवादात त्यांनी आपल्या आईने रचलेल्या दोन ओव्या म्हणून दाखवल्या. त्यांचा साद गहिवरलेला वाटला. मुंबईला "सह्याद्री" बंगल्यात त्यांच्या मातोश्री आजारी होत्या. थोर-थोर मंडळी मुद्दाम त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येत-जात होती. यशवंतराव एकटेच गॅलरीत एका वेताच्या खुर्चीवर बसले होते. मी गेलो.

"या अण्णा. बसा." यशवंतराव म्हणाले

"कसं आहे आईचं?"... मी

"बरं आहे, पण तो वेडा कुंभार काय करील ते खरं." ते खिन्नपणे उद्गारले.

माझ्या त्वरित लक्षातच आले नाही. पण "वेडा कुंभार" हा शब्द त्यांनी "परमेश्वर" या अर्थाने वापरला होता. त्या शब्दाचा संदर्भ माझ्याच एका गीताशी होता. ते गीत त्यांच्या लक्षात राहिलेले होते. यशवंतराव देवभोळे नाहीत, पण नास्तिक निश्चित नाहीत. विज्ञानाइतकाच त्यांना अध्यात्माविषयीही आदर आहे. मात्र ज्योतिषा-बितिषाचे थोतांड त्यांना मुळीच आवडत नसावे. एखदा असेच आम्ही काही साहित्यिक मध्यरात्रीनंतरही त्यांच्याशी चर्चा करण्यात रमून गेलो. एक वाजला तसे सर्वांचे भान जागे झाले.

"चलू या आता" कुणीतरी म्हणाले.

"जाणार कसे अण्णा?" यशवंतरावांनी मला विचारले.

मी म्हणालो, "सवालच आहे. माझी मोटर नाही. आमच्या कुंडलीत वाहनयोग नाही."

"तुम्ही असं का, " यशवंतराव गंभीरपणे म्हणाले, "एक वाहन घ्या आणि कुंडली त्यात लावून ठेवा. कुंडलीत वाहन नाही तर वाहनात कुंडली !" आम्ही सर्वजण खळाळून हसलो.

माझा आणि त्यांचा स्नेह ही एक भाग्याची गोष्ट आहे. १९४२ च्या काळात त्यांनी माझे पवाडे ऐकले असतील. निकमाच्या तोंडूनही काही ऐकले असतील. आपल्या शेजारचा लेखक म्हणून त्यांना माझ्या बद्दल कुतूहल असेल.