मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४६

४६. तैसे उजू अंतर – प्रा. वामनराव चोरघडे

चालत्या बुद्धीला फाटे फोडले तरच विद्वत्ता दिसते, अशी एक चाल पडली आहे. मूळची बुद्धी सरळच असते. अहंकाराने तिला फाटे फुटतात.

सरळ शब्दावरून उगीच आठवण झाली. "सरळ" शब्दाचा अर्थ फार सोपा आहे, असे आजवर वाटत आले. आता वाटत नाही. सरळपणाचे विवेचन श्रीमद् भगवद्गीतेमध्ये तीन ठिकाणी आलेले आहे.
अध्याय तेरावा-श्लोक सात, अध्याय सोळा-श्लोक एक, अध्याय सतरा श्लोक चौदा ! या तीन ठिकाणी आर्जव शब्द आला आहे. शब्दाचा अर्थ सरळ नाही. ते तेव्हाच ध्यानात आले. तेराव्या अध्यायात आर्जवाच्या अगोदर चार गुणांचे कथन आहे. सोळाव्या अध्यायात "अभया" पासून सुरु होऊन "तपा"पर्यंत गेल्यानंतरच आर्जवाचा उल्लेख आहे. सतराव्यात आर्जुवाच्या अगोदर दोनच गुणांची साधना अभिप्रेत आहे. म्हणजे इतके गुण अंगी बाणल्याशिवाय "आर्जवाची" बात करणे, हा अहंकारच ! कारण त्या गुणांसाठी जन्म अपुरा पडायचा ! पडो !! त्यामुळे निदान पुढच्या जन्माचे कर्म निश्चित होईल. हे सर्व आठवण्याचे कारण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण याना जाऊन परवा एक वर्ष लोटले. त्यांचे "असणे" आणि त्यांचे "नसणे" याचा भिन्नभिन्न मनावर काय परिणाम झाला. हा जिज्ञासेचा विषय होऊ शकेल. पण त्यात "आर्जव" असलेच असे नाही.

शब्दावर जशी माझी श्रद्धा आहे तशीच साहेबांवर होती, आहे ! त्यांच्या असण्याने माझा काही फायदा होता आणि नसल्याने क्षती झाली. असे सुतराम नव्हते. "पत्री" सरकारच्या काळापासून त्यांना मोह जडला तो अगदी निरपेक्ष आणि सततचा म्हणून तो टिकलाही असेल. साध्याही माणसाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की, त्या वेळी तो हतबुद्ध होतो. तेव्हा कुणाची तरी त्याला आठवण येते. अर्जुनाला श्रीकृष्ण सखा भेटला. कारण तो अर्जुन होता.

आम्ही केवळ कण, अणू रेणू पण या अणूरेणूनांही कधीतरी कोणीतरी हवेच असते. आई जिवंत असेतो काहीच वाटत नाही. ती नसली म्हणजे मग कोणीतरी डोळ्यासमोर असावे असे वाटते.

माझ्या क्षणाक्षणाच्या जीवनातले असे एक स्थान मी साहेबांना देऊन टाकले होते. त्या निमित्तच एखादी आठवण सांगण्याचा प्रयत्न, अपयश माझे, यश साहेबांचे-देवाचे ! पुसद येथे माहे दिसंबर १९६४ साली विदर्भ साहित्य संघाचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन भरले होते. उद्घाटक "साहेब" होते. साहेबांच्या सोईसाठीच अधिवेशनाच्या तारखा पुढे पुढे सरकत होत्या. पुसद हे मुख्यमंत्र्यांचे गाव. सगळी हाल व सगळी चाल मुख्यमंत्री वसंतरावांची. थाट तोलामोलाचा एखादे पर्व साजरे व्हावे तसे ते अधिवेशन झाले. अधिवेशनाचा पहिला दिवस सकाळी दहा वाजता सुरु झाला. बड्या मंडळींना बघायला वीस हजाराचा श्रोतुसमुदाय जमला. लेखक साहित्यिकांत आचार्य अत्रे, ह. रा. महाजनीपासून त्या वेळची सर्वच मंडळी जमली होती. यजमान म्हणून वसंतरावजी तासभर स्वागतपर बोलले. शुभेच्छासाठी तास अर्धा तास गेला. साहेबांनी नाटके. प्रसंगोचित, प्रामाणिक, असे रसपूर्ण भाषण केले. आणि बिचा-या संमेलनाध्यक्षाच्या वाट्याला दुपारी टळटळीत दोन वाजता श्रोतृसमुदाय आला. तो बिचारा अध्यक्ष मी ! अध्यक्षाच्या अगोदर साहित्याचा जो तोलमोल उचलला, सांभाळला गेला त्याने अध्यक्षालाही झिंग चढली, लिखित भाषण बाजूला ठेवले व स्वत:चा व इतरांचा आब-राब सांभाळीत तास दीड तासानंतर तोही खाली बसला. बाबूराव अत्रे जागचे उठून धावले आणि त्यांनी मला कवेत घेतले. वेणूताई चव्हाण यांच्या डोळ्यांना रुमाल लागलेला दिसला. साहेब गोरेमोरे झाले. वसंतराव नाईक तृप्तीने आणि अचंब्याने बघत होते.