एक प्रसंग मला आठवतो. ते मुंबईस आहेत असे समजल्याने मी भेटीसाठी गेलो. ते बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मी नमस्कार करून बाजूला उभा राहिलो. त्यांनी चला म्हटल्यावर गाडीत बसलो. नंतर मला समजले की, पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे कार्यक्रम आहे. मी मनात म्हणालो, ‘‘चला, तीन तास हक्काचे मिळाले.’’ प्रवासात मी त्यांना व्हिएटनाम युद्धावर लिहिल्या गेलेल्या दोन हिंदी कविता व काही शेर सांगितले. तळेगावला पोहोचल्यावर सभा सुरू झाली. भाषणात संदर्भ देतांना त्यांनी प्रवासात ऐकलेल्या अमीर खुश्रूच्या काव्यपंक्ती—
‘‘एक कडी तो जंजीर नहीं
एक नुक्ता तो तसबीर नहीं
तकदीर कौमोंकी होती है
एक शख्सकी तकदीर
तो तकदीर नहीं’’
‘‘एक कडी तो जंजीर नहीं
एक नुक्ता तो तसबीर नहीं
तकदीर कौमोंकी होती है
एक शख्सकी तकदीर
तो तकदीर नहीं’’
या जशाच्या तशा म्हणून दाखवल्या. एकदा सहज ऐकल्यावर काव्यपंक्ती लक्षात ठेवणा-या या त्यांच्या स्मरणशक्तीला मी मनातल्या मनात सलाम करतो !
त्यांच्या संभाषणचातुर्याचा आणखी एक प्रसंग आठवतो. गोहत्ती येथील काँग्रेस अधिवेशवनात त्यांनी काही लोकांना रात्री त्यांच्या बंगल्यावर जेवायला बोलावले होते. सोबत श्री. वसंतराव नाईक, काश्मीरचे त्या वेळचे मंत्री ठाकूर रणधीरसिंग आणि कलकत्त्याचे एक व्यापारी होते. ते व्यापारी शाकाहारी आहेत हे जेवायला बसल्यावर समजले. साहजिकच ऐनवेळी थोडी धावपळ झाली. जेवणाचे टेबल लावले गेले. जेवताना ते व्यापारी म्हणाले, ‘‘जगातील सर्व शक्तिमान प्राणी शाकाहारी आहेत,’’ साहेबांनी पुष्टी जोडली, ‘‘होय, जगातील सर्व उपयुक्त प्राणी शाकाहारी आहेत.’’ टेबलावर हशा पिकला. व्यापारी पुन्हा म्हणाले, ‘‘हे सर्व प्राणी शक्तिमान आहेत. कारण ते शाकाहारी आहेत.’’ साहेब म्हणाले, ‘‘आणि म्हणूनच त्यांच्यावर स्वार होणे सोपे आहे.’’ बोलण्याच्या ओघात कोठेही त्या शाकाहारी माणसाला न दुखावता साहेबांनी आपला मुद्दा सोडला नाही. क्षणाचाही विलंब न लावता ते उत्तर देत होते. बोलताना आणि ऐकताना त्यांचा चेहरा बोलका होत होता. आपण उच्चारलेल्या प्रत्येक शब्दागणिक त्यांच्या चेह-यावर प्रतिक्रिया व्यक्त होत असत! सहमत असल्याचा, नसल्याच्या, रागाच्या आनंदाच्या नि मिस्किलपणाच्या ! म्हणूनच ह माणूस फार मोठा वाटतो नि तो तसा होताही!