मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७५-१

‘‘तुम्ही खरे बोलत नाही असे मी कधी म्हणायचो नाही. बघा इंदिराजींनीही भाषणाने ‘‘मी कशी मूव्ह झाले’’ हे यात लिहिले आहे. विश्वनेताही त्यांच्या भाषणाने हादरून जातो ते वाचून मला तेव्हा खूप अभिमान वाटला.

परवा आमचे हेलिकॉप्टर कृष्णाकाठी लहानपणी प्रारंभ करून तिथेच विसावा घेणा-या यशवंतरावांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी...भरधाव पळत होते. रसिकभाई म्हणाले, ‘‘यशवंतरावांच्या तुम्ही एवढ्या आठवणी सांगता. ओठावर आलेली आठवण सांगा बघू? साळवे, गायकवाड, किंमतकर, तिडके हे कान टवकारून बघू लागले.

‘‘अशीच आमची बैठक संपली होती. उगाच रेंगाळत आमचा जथ्था बसला होता. कविवर्य माडगूळकर होते. त्यांना नुकतीच तयार केलेली लावणी म्हणण्यासाठी वैराळेंनी हट्ट धरला. यशवंतरावांनी आग्रह केला. गारूड्याने नागाला डोलविले नसेल तेवढे आम्ही मंत्रमुग्ध झालो. शृंगाराची लज्जत तर होतीच पण त्यांच्या काव्यातले सारे लावण्य जणू मूर्तिमंत अंगप्रत्यंगात सळसळून गेले. यशवंतरावांनी कविवर्यांच्या समोरचा माईक घेतला व म्हणाले, ‘‘असली लावणी पूर्वीच्या राजाने ऐकली असती तर या थोर शाहिराच्या पायात सोन्याचा तोडा आपल्या हातांनी घातला असता !’’ रसिकभाई, त्या वेळी यशवंतराव हे या महाराष्ट्राचे अनभिषिक्त राजाच होते !

पार्थिव चितेकडे जात होते. कृष्णाकाठावर प्रथमच जनसागराच्या एकापेक्षा एक मोठ्या लाटा उसळत होत्या. सर्वत्र हुंदक्यांचा आवाज घुमत होता. लोकमान्यांच्या निधनानंतर असाच जनसागर उसळल्याचे आम्ही वाचले होते.

लोकमान्य टिळक जसे स्वातंत्र्यपूर्व काळात असंतोषाचे जनक होते तसेच यशवंतराव स्वातंत्र्योत्तर काळामधले संतोषाचे, प्रसन्नतेचे स्थिरस्थावरतेच्या क्षात्रतेजाचे जनक होते. जेव्हा राष्ट्र मरगळते तेव्हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्राच्या म्यानातून चिनी सैन्याशी मुकाबला करण्यासाठी समशेर बाहेर उपसली होती या ‘‘समशेरी’’चे नाव होते ‘‘यशवंतराव चव्हाण!’’ कृतान्ताने ही समशेर म्यान करून कृष्णाकाठावर आज टाकली होती.

यशवंतराव इंदिराला तुम्ही आपली बहीण मानत होता. त्यांची हत्या होताच तुम्ही केवढे हळहळला ! आम्ही पाहिले त्या तेजोगोलाच्या क्षात्रतेजाचा हा अंश आपणाला जपायचा आहे यात राष्ट्राची आशा आहे. भविष्य आहे, सर्वस्व आहे तो आपल्या मातेच्या रक्तांकित धगधगत्या होम कुंडाकडे जात आहे- सत्तास्थानाकडे नव्हे.

आपणास त्याला जोपासायचे आहे. टी.जी. विदर्भ तुम्ही उभा करा. लहान मोठी शक्ती कामाला लावा, असे म्हणतात.

तर मग यशवंतराव आपण एवढी जाण्याची घाई का केली? धकाधकीच्या संकटकाळात तुम्ही नेहमीच सह्याद्रीच्या वज्राप्रमाणे दिमाखाने उभे राहिलात, अन् आता आपल्या भाच्याला-राजीव गांधीला एकटेच सोडून ही घाई करणे तुम्हाला शोभले काय?

जाताना थोडे तर विचारायचे असते, बोलायचे असते? पंडित नेहरूंनी ‘‘संरक्षणमंत्र्यांची वस्त्रे तुम्हाला सांभाळायची आहेत, उद्या दिल्लीत येऊ शकाल का?’’ असे विचारले असता आपण म्हणालात, ‘‘थोडा वेळ द्या, मला विचारू तर द्या.’’

‘‘तुम्हाला कोण आहे तेथे की, त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे’’ तुमचे उत्तर ऐकून पंडित नेहरू गदागदा हसले. तुम्ही उत्तर दिले होते की, ‘‘माझ्या सौभाग्यवती वेणूला !’’

यशवंतराव, तुम्ही जाण्याची घाई केली.. कारण तुम्हाला आता विचारणारे कोणी उरले नव्हते
ना ! घाई केली कारण तुम्हाला ना पुसायचे होते, ना विचारावयाचे होते ! खरं ना ?