७९. विधायक कार्याला प्रेरणा देणारे यशवंतराव – डॉ. जयंत पाटील
१९७५ सालचा जानेवारी महिना. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बोर्डी येथील शिबिराला उपस्थित राहून यशवंतराव मुंबईस परत जाताना वाटेत कोसबाड येथील कृषिसंस्थेत थांबले होते. आम्ही त्यांना रघ्या करबट नावाच्या आदिवासीची शेती पाहण्यास घेऊन गेलो. रघ्याने त्याच्या शेतीवर गहू पिकविला होता व त्याचे पीक फार सुंदर आले होते. कोकणात गहू पिकू शकतो व तोही एक आदिवासी शेतकरी पिकवू शकतो हे पाहून यशवंतरावजींना केवढा आनंद झाला ! रघ्याने आपली शेती त्यांना दाखविली. मध्येच थांबून यशवंतरावजींनी त्याला विचारले, ‘‘तुम्ही हे सर्व कसे केले ?’’ त्यावर रघ्याने सांगितले, ‘‘साहेब मी मजूर होतो. शेजारच्या एका धनिक बागवानाकडे मी मजुरी करून पोट भरत असे. परंतु कोसबाडच्या कृषिसंस्थेतील कार्यकर्त्यानी मला विहीर खणण्यास व पंप बसविण्यास मदत केली. मला त्यांनी चिकू, आंब्याची कलमे दिली, चांगल्या जातीच्या भाताचे व गव्हाचे बी दिले व मला शेतीचे शिक्षण दिले. त्यामुळे मी आता मजुरीला जात नाही. माझ्या शेतीवरच मी, माझी बायको व मुले वर्षभर काम करतो. पूर्वी मला पोटभर भात पिकत नसे. वर्षातून तीन-चार महिने आम्हास भाताची पेज अगर नागलीची आंबील प्यावी लागे. आता भात व गहू असल्याने आम्हास पोटभर अन्न मिळते. पूर्वी आम्ही भाजीपाला खात नसू, परंतु आता आम्ही वांगी, टोमॅटो, वांगी भाजी करतो. आमच्या मुलांना आता पोटभर अन्न मिळाल्याने ती शाळेत जातात. माझी बायको रोज भाजीपाला विकण्यास डहाणूस जाते व त्या विक्रीतून आम्हास ८ ते १० रुपये मिळतात. त्यातून आम्ही तेल, मिरची, मसाला विकत आणतो. ’’
यशवंतरावजी हे अगदी मन लावून ऐकत होते. महाराष्ट्रातील एक तळागाळातील आदिवासी त्याच्या विकासाची कथा त्यांना सांगत होता. ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्या यशवंतरावांना केवढे समाधान मिळत असावे ! त्यांच्या स्वप्नाची पूर्ती रघ्याच्या सांगण्यातून त्यांना मिळत होती ना ?
यशवंतराव मजकडे वळून मला म्हणाले, ‘‘जयंतराव, हेच राष्ट्रउभारणीचे खरेखुरे कार्य आहे. तुम्ही गरीब आदिवासींच्या सेवेला जे वाहून घेतले त्यात तुम्हाला जे समाधान लाभेल ते शासनातल्या मोठ्या जागेवर राहून मिळणार नाही.’’
विधायक कार्यकर्त्यानी शासनातील जागेची अपेक्षा न ठेवता आपले सेवाकार्य हेच महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे हेच यशवंतरावांच्या उद्गारांचे सार होते. तद्नंतर यशवंतराव मला जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा तेव्हा आदिवासींतील शेतीच्या कामाबद्दल विचारत असत. माझ्यासारखे महाराष्ट्रातील जे विधायक कार्यकर्ते असत त्यांना यशवंतराव हे आशास्थान होते ! त्यांच्यापासून आम्हास सतत प्रेरणा मिळे.