राजकारणी लोक हे सामान्यत: साहित्यिक नसतात. आपल्या देशात विद्वान राजकारण्यांचे दिवस संपले आहेत. बर्क, पिट, चर्चिल, क्रिप्स किंवा बेव्हन यांसारखे विद्वान राजकारणी आज आपणाला भारतात कुठे आढळतील? नेहरू, राधाकृष्णन, सप्रू, शास्त्री, जयकर यांची जागा कोण घेणार? यशवंतरावांचे वाचन दांडगे होते. ते सुंदर मराठी लिहीत. त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग. ‘‘कृष्णाकाठ’’ हा वरवर जरी चाळला तरी आपणास माझ्या म्हणण्याची प्रचीती येईल. त्यांना मराठी गद्याची फार आवड होती. त्यांची भाषाशैली प्रसन्न, निर्मळ, प्रासादिक, स्पष्ट, ओघवती आणि ओजस्वी होती. ती माणसाच्या हृदयाला जाऊन भिडे. आपल्या आईने दारुण दारिद्र्याशी दिलेल्या झुंजीचे रेखीव वर्णन, प्रतिकूल परिस्थितीशी त्यांनी केलेला मुकाबला, त्यांच्या संस्कारक्षम तरुण मनावर उमटलेला खोल ठसा आणि आपल्या तुरूंगातील जीवनाचे तितकेच रोमहर्षक वर्णन ही सर्व आपल्या मनाची आणि हृदयाची पकड घेतात. आपले आईवडील, भाऊ, तरूण स्वातंत्र्य सैनिक यांची जिवन्त शब्दचित्रे सुरेख आहेत. त्यांची वीर सावरकरांबरोबरची रत्नागिरी येथील पहिली भेट आणि तेथील सागराचे त्यांना घडलेले प्रथम दर्शन ह्या त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या घटना होत्या. त्यांचे आत्मचरित्र कादंबरीइतकेच हृद्य आहे. बाकीचे दोन भाग पूर्ण होऊ शकले नाहीत हे दुर्दैव होय, कारण काळाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. ‘‘ऋणानुबंध’’ मधील परिच्छेदात एक विशेष लय आणि सौंदर्य आहे. या बाबतीत यशवंतरावांनी रशियाला टॉलस्टॉयच्या घराला दिलेल्या भेटीचा उल्लेख करता येईल. त्या प्रसंगी यशवंतरावांनी आपल्या भावनांचे जे चित्रण केले आहे ते अप्रतिम आहे. हे वर्णन अलंकारिक भाषेने नटलेले आहे. या परिच्छेदातील भारून टाकणारे सौंदर्य माधुरी आणि लय ही अव्वल दर्जाची आहे. कोणी अशी कल्पना करील की जर यशवंतराव राजकारणी झाले नसते तर ते मराठीतील एक महान शैलीदार लेखक झाले असते. परंतु तसे होणार नव्हते.
त्यांना चांगल्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची आवड होती आणि परदेश दौ-यावर असताना भरगच्च कार्यक्रमातून वेळात वेळ काढून ते इंग्लंड व अमेरिकेतील प्रसिध्द पुस्तकांच्या दुकानांना भेटी देत. त्यांचे पुस्तकांनी भरलेले ग्रंथालय हे याचा पुरावा आहे. ते संगीताचे भोक्ते होते. तसेच अनेक प्रसिद्ध मराठी आणि इंग्रजी नाटकांच्या प्रयोगाला ते आवर्जून हजर राहात. मराठी काव्यातील अनेक काव्यपंक्ती त्यांना मुखोद्गत होत्या. औरंगाबाद येथे मुक्कामास असताना मराठीतील प्रसिद्ध कवी श्री. ना.धों.महानोर यांच्यासह ते पहाटेपर्यंत बैठकीत बसून होते आणि त्या वेळी ग्रामीण जीवनावरील त्यांच्या अनेक कविता त्यांनी म्हणून दाखवून उपस्थितांना आश्चर्यचकित केले !