मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७४

७४. प्रभावी वक्ते यशवंतराव – बॅ.पी.जी. पाटील

कराड येथे विद्यार्थिदशेपासून त्यांनी आपली वक्तृत्व कला विकसित केली. कुमार वयात पुणे येथे वक्तृत्वकलेतील प्रशंसनीय केळकर पारितोषिक त्यांनी मिळविले होते. जाहीर सभांना उपस्थित राहून ते भाषणांच्या टिपण्या लिहून घेत. खोलवर केलेले चिंतन आणि खडतर सराव याचा त्यांना खूप फायदा झाला.

त्यांची भाषणे संक्षिप्त, मुद्याला धरून, परिणामकारक आणि प्रसंग डोळ्यापुढे उभी करणारी असत. विषयांवर त्यांचे प्रभुत्व असे. तसेच अस्खलित भाषण करण्याची त्यांची शैलीही प्रभावी होती. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात डिसेंबर १९७४ मध्ये अनावरण करताना ते म्हणाले, ‘‘शिवाजीमहाराजांनी अनेक डोंगरी किल्ले बांधले, परंतु यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांनी निष्टावन्त अनुयायांचे पथक निर्माण केले. प्रत्येक अनुयायी म्हणजे मजबूत, अभेद्य आणि त्यामुळेच बलाढ्य औरंगजेबाविरूध्द वीस वर्षे ते लढू शकले.’’

संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सचिवालयातील समारंभात पहिले सार्वजनिक भाषण करताना ते म्हणाले, ‘‘काही लोक नवे राज्य मराठी राज्य असेल की मराठा राज्य असेल? अशी नाहक चिंता व्यक्त करीत आहेत. त्यांच्यासाठी मी नि:संदिग्धपणे असे जाहीर करू इच्छितो की, हे मराठी राज्य असेल.’’ त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी एका जाहीर सभेत ते म्हणाले, ‘‘अमुक एका गुरुकडून मी माझे धडे घेतले असे मी सांगू शकत नाही. गांधीजी, पंडीतजी, एम्.एन्.रॉय आणि राजकारणातील माझ्या कनिष्ठ सहका-यांकडूनही मी अनेक गोष्टी शिकलो. शिकण्याची ही अखंड प्रक्रिया असते.’’ ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केलेल्या रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे २४ वर्षे अध्यक्ष होते. ते दरवर्षी ८ मे रोजी कर्मवीरांच्या पुण्यतिथीला धार्मिक निष्ठेने उपस्थित राहात. कर्मवीरांच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणत, ‘‘अण्णांनी ग्रामीण भागात शेकडो शाळा—कॉलेजे सुरू केली. ही खरोखर मोठी कामगिरी आहे यात संशय नाही. परंतु त्यांनी सामुदायिक शिक्षणाची मोठी चळवळ सुरू केली ही गोष्ट आपण विसरता कामा नये. परंतु कर्मवीरांच्या शाळा आणि महाविद्यालये महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतर घडवून आणणा-या ख-याखु-या प्रयोगशाळा आहेत. त्यांचे अनुयायी या उच्च ध्येयाने प्रेरित झालेले प्रचारक आहेत.’’

परंतु श्री. भाऊसाहेब खांडेकर यांचे त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी अभिनंदन करण्यासाठी कोल्हापुरातील खासबागेत आयोजित केलेल्या समारंभप्रसंगी यशवंतरावांनी जे वक्तृत्वपूर्ण भाषण केले त्याची आम्हास खास करून आजही आठवण होते. त्या दिवशी संध्याकाळी तेथे प्रचंड जनसमुदाय जमला होता. यशवंतरावांनी शेवटी भाषण केले. कोल्हापूर येथे महाविद्यालयात असताना आपण खांडेकरांचे चाहते कसे झालो हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले. खांडेकरांच्या कादंबरीतील अनेक प्रसंग वर्णन करून त्यांनी त्यातील काही प्रसंगाचे यथायोग्य मूल्यमापन केले. एकदा पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळी अंधुक प्रकाशात आपण खांडेकरांची एक नवी कादंबरी कशी वाचली याचा किस्सा त्यांनी संगितला. त्या कादंबरीच्या कातडी बांधणीचा मधुर वास अजूनही आपल्या नाकात घुमत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट भाषणाचा तो एक नमुना होता आणि त्याबद्दल मराठीच्या प्राध्यापकांनीही ‘‘शाबास, यशवंतराव ’’ असे उद्गार काढले.

ते केवळ प्रभावी वक्ते, होते असे नव्हे तर एक बुद्धिवान संसदपटूही होते. लोकसभेत वित्तआयोगाच्या अहवालांची त्यांनी केलेल्या प्रशंसेमुळे श्रीमती इंदिरा गांधी अतिशय खूष झाल्या आणि त्यांनी खाजगी टिप्पणीद्वारे आपली त्या अहवालाला मान्यता असल्याचे कळविले असे समजते.