यशवंतरावजींच्या निवडीमुळे देशाला कर्तृत्ववान संरक्षणमंत्री लाभला. परंतु महाराष्ट्रावर लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तबगार मुख्यमंत्री गमावण्याचा प्रसंग गुदरला होता. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर काही महिन्यांच्या कालावधीतच यशवंतरावजींनी सर्व महाराष्ट्रावर पूर्ण पकड घेतली. सर्व क्षेत्रातील व स्तरांतील जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई यांचे पूर्वी केव्हाही नव्हते असे भावनात्मक ऐक्य घडवून आणले. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने अपूर्व विश्वास व्यक्त केला आणि नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी त्यांच्या हाती स्वराज्याची सर्व सत्ता सुपूर्त केली. महाराष्ट्राच्या भावी प्रगतीचे चित्र रात्रंदिवस विचारविनिमय करून यशवंतरावजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले होते. समानतेवर आधारित कृषी औद्योगिक समाजरचना निर्माण करण्याचा आणि त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सहकारावर भर देण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने व्यक्त केला होता. १९६२ च्या निवडणुकांसाठी तयार केलेला जाहीरनामा त्या संकल्पनेचेच प्रतीक होते. सत्ता हाती येताच महाराष्ट्राचे शासन व काँग्रेसचे संघटन यांनी एकत्रितपणे जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली. १९६२ च्या ऑगस्ट महिन्यातच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची स्थापना झाली. पुढील प्रगतीची वेगवान वाटचाल सुरू असतानाच चीनचे आक्रमण झाले आणि महाराष्ट्र संघाच्या मुख्य कप्तानावरच आपला संघ सोडून दिल्लीला जाण्याचा प्रसंग ओढवला. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या एका डोळ्यात आनंदाचे तर दुस-या डोळयात चिंतेचे अश्रू मी जवळून पाहात होतो.
नोव्हेंबर १९६२ मध्ये ज्या दिवशी यशवंतरावजींनी दिल्लीकडे प्रस्थान केले तो संस्मरणीय दिवस मी केव्हाही विसरू शकत नाही. दादर येथील टिळक भवनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यालय होते आणि तेथेच मी राहात असे. त्या दिवशी वसंतरावदादा, मी व इतर जवळचे सहकारी सकाळपासून सह्याद्रीवर यशवंतरावजींच्या घरी जमलो होतो. त्यांना निरोप देण्यासाठी जनतेची रीघ लागली हाती. उभ्या महाराष्ट्रातून ठिकठिकाणचे कार्यकर्ते व हितचिंतक आले होते. मुंबई शहरातील, आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिक भेटण्यासाठी व आवडत्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी येत होते. त्यामध्ये कामगार, शेतकरी, हरिजन, गिरिजन, नवबुद्ध, पत्रकार, कलाकार, ज्येष्ठ साहित्यिक, व्यापारी, उद्योगपती, शासकीय अधिकारी आदी सर्वांचाच समावेश होता. निरनिराळया संस्थांचे, विविध पक्षांचे, तसेच अल्पसंख्य समाजाचे नेतेही तेथे आवर्जून उपस्थित होते. सर्व समाजाला बरोबर घेऊन उमेदीने प्रगतीकडे घोडदौड करणा-या महाराष्ट्राचे काय होणार ही चिंता त्यांच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होती. भेटीसाठी येणा-या असंख्य चाहत्यांना व मित्रांना मी पाहात होतो. त्यांच्या बरोबर बोलत होतो, मनातून निरीक्षण करीत होतो. यशवंतरावजींना आणि वेणतार्इंना अभिवादन करीत असताना, त्या सर्वांचे बोलके भाव एकच भावना व्यक्त करीत होते. ती भावना होती- ‘‘सर्व समाजावर प्रेम करणारा, ख-या अर्थाने महाराष्ट्र एकसंध करणारा, समर्थ व स्थिर शासन देणारा आणि सर्व सत्ता हाती असतानाही विनयशील राहून समंजसपणे सामाजिक न्याय देणारा आवडता नेता आणि लोकमान्य मुख्यमंत्री आता दूर जात आहे. अशा तोलामोलाचा नेता परत कसा मिळणार ?’’
सायंकाळी विमानतळावर निरोप देईपर्यंत मी यशवंतरावजींबरोबर होतो. विमानतळावर विविध क्षेत्रांतील नेते उपस्थित होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत दिवसभर पाहिलेले ते भावपूर्ण वातावरण पाहून प्रत्यक्ष भावनेला सुद्धा कढ येत होते. अखेरचे अभिवादन स्वीकारताना यशवंतरावजींनाही राहवले नाही. साश्रुपूर्ण नयनांनी त्या अलोट प्रेमाची पोहोच त्यांनी दिली. काही मिनिटांतच त्यांच्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि आमच्या गाड्याही शहराकडे परत निघाल्या. ते दिवसभराचे हृदयस्पर्शी चित्र मला एकच ग्वाही देत होते. छत्रपती शिवाजीमहाराजांनंतर सर्व महाराष्ट्राचे, इतक्या प्रभावीपणे नेतृत्व करणारा लोकप्रिय नेता आजपर्यंत झाला नाही आणि यापुढे होणे नाही !