या रगेल जीवनाला क्रीडा, नाट्य, संगीत, इत्यादी कलांची जोड मिळाली. शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन अनेक मल्लांना राजाश्रय दिला. किंबहुना कोणत्याही क्षेत्रातील ते गुणी लोक असतील, त्यांना कोल्हापुरात आणण्याची महाराजांना फार हौस होती. यामुळे अल्लादियाखां सारखा गानमहर्षी, बाबूराव पेंटरांप्रमाणे चित्रमहर्षी कोल्हापुरात आपल्या कलानंदात मग्न असत. रियासतकार सरदेसाईंविषयी महाराजांना प्रेम होते व महाराज हे कलेचे एवढे भोक्ते, की आपल्या जवाहरखान्यातील दागिनेही ते नाटक मंडळीला वापरावयास देत. गोविंदराव टेंब्यांनी कंपनी काढली, तिला महाराजांचा मोठा आधार मिळाला. गोविंदरावांच्या पेटीवादनाचे महाराजांना फार कौतुक होते अणि ‘शिवसंभव’ नाटकाच्या वेळी महाराजांनी आपल्या जवाहरखान्यातील खास शाही दागिने वापरण्यासाठी दिले होते.
‘शिवसंभव’ नाटकातील शिवजन्माचा प्रसंग येताच शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि त्यांनी नाटकातील शिवाजी महाराजांना लवून मुजरा केला. असा मोठ्या दिलाचा हा राजा होता.
महाराष्ट्राच्या समाजकारणात लोकमान्य टिळक व छत्रपती शाहू महाराज यांचे ग्रह जमले नाहीत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होती. पण कोल्हापूरची गादी ही शिवाजी महाराजांची गादी, यास्तव लोकमान्यांना गादीचा अभिमान व गादीवरील वारसाबद्दल आदर होता. उलट, लोकमान्य टिळकांशी वेदोक्त वगैरे प्रकरणांवरून कितीही मतभेद असले, तरी इंग्रजांशी निधडेपणाने लढणा-या लोकमान्यांबद्दल शाहू महाराजांना आदर होता. महाराज भोजनासाठी पानावर बसले असता लोकमान्यांच्या निधनाची वार्ता समजली, तेव्हा त्यांनी आपल्यापुढील ताट बाजूला केले, ‘असा लढवय्या पुरूष होणार नाही’ असे म्हणाले व पाटावरून उठले.
कसब, गुण, कर्तृत्व यांविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्यागांजल्यांबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते, तसेच त्यांचे मनही होते. यामुळे समाजातील गुणी, कर्तृत्ववान यांना महाराजांचा आधार होता. त्याचप्रमाणे लहानशा खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना, पीडितांना तो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा. शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते आणि लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्यांप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षि शाहू महाराज हे केवळ वारसा-हक्काने राजे नव्हते, तर ते लोकांचे राजे होते.