शब्दाचे सामर्थ्य २११

६८

आजचे तरुण व सैनिकी शिक्षण

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारतमाता दास्याच्या शृंखलेतून मुक्त झाली. अनेक वर्षे चालू असलेल्या स्वातंत्र्य-संग्रामाचा शेवट झाला. स्वातंत्र्य-संग्रामात नेत्यांनी व भारतीय जनतेने केलेल्या आवाहनाला भारतीय तरुण-तरुणींनी प्रतिसाद दिला आणि त्याग व बलिदानाने एक अविस्मरणीय कामगिरी करून दाखविली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आम्ही आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी पावले उचलली. सोळा वर्षांच्या कालावधीत भारताचा बराच कायापालट झाला. शेतीचा विकास झाला. विद्युत केन्द्रे निर्माण करण्यात आली. अनेक कारखाने उघडले. परंतु ही आमची प्रगतीची वाटचाल चालू असतानाच २० ऑक्टोबर, १९६२ रोजी आमच्या शेजार्‍याने आमच्या पवित्र भूमीवर आक्रमण केले. ज्या हिमालयाने आजपर्यंत आमचे शत्रूपासून संरक्षण केले, तोच हिमालय स्वतःच्या संरक्षणासाठी भारतीय पुत्रांना बोलावू लागला. आमच्या जवानांनी या आक्रमणाला त्याग व बलिदानाने सहर्ष तोंड दिले. भारतीय तरुण देशाच्या रक्षणार्थ वेळेचा क्षण व धनाचा कण वाया न जाऊ देता तयार झाले.

युद्धबंदी झाली. चिनी सेना मागे परतली. पण जणू काही आम्हांला सदैव तयार राहण्याचा संदेश देऊनच, ते आक्रमण एक वरदान ठरले. भारताचे संरक्षण करण्याचा विचार चिनी आक्रमणामुळे राष्ट्रव्यापी झाला.

सैन्य हा जीवनाचा एक आवश्यक भाग झाला, तरच एवढ्या विशाल देशाचे संरक्षण होऊ शकेल. म्हणून आम्ही शत्रूमध्ये धडक भरविणारी सामर्थ्यसंपन्न आधुनिक सेना उभारीत आहोत. तरुण विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनापासून सैनिकी प्रशिक्षण मिळावे, म्हणून भारत सरकारने १५ ऑगस्टपासून एन्.सी.सी.- चे शिक्षण अनिवार्य केले आहे. देशरक्षणाच्या शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपणहून एन.सी.सी. चे शिक्षण घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. एन.सी.सी. ही एक सैनिक योजना आहे. तसेच, ती शैक्षणिक योजना पण आहे. हे शिक्षण सैनिक अधिकार्‍यांकडून दिले जाते, म्हणून ती सैनिक योजना आहे. तसेच, ती शिक्षणाची पूर्ती करते, म्हणून शैक्षणिक योजनाही आहे. एन.सी.सी. च्या शिक्षणामुळे तरुणांमध्ये चारित्र्य, बंधुभाव, आदर्श सेवावृत्ती व नेतेपणाची शक्ती यांची जोपासना व वाढ होते.

शत्रूशी सामना देण्यासाठी आपण आपला देश आर्थिक व वैज्ञानिकदृष्ट्या प्रबळ बनविला पाहिजे. देशात नुसते मोठे सेनापती असून भागत नाही, तर शत्रूवर विजय मिळविण्याच्या कामी महान शास्त्रज्ञांची जरुरी असते. म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्याने आपले जास्त लक्ष वैज्ञानिक विषयांकडे दिले पाहिजे. त्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे. युद्ध केवळ रणांगणावर लढले जात नाही, तर ते शेतात, कारखान्यातही लढवावे लागते. यासाठी कुशल तंत्रज्ञांची पण आवश्यकता आहे. याची पूर्ती शाळेतून व महाविद्यालयातून बाहेर पडणार्‍या तरुणांकडूनच होऊ शकेल. समाजातील तरुणांचे मन व मनगट बळकट पाहिजे. ही सुद्धा लष्करी शिक्षणाची प्राथमिक गरज आहे.

युवतींनाही देशाच्या संरक्षण-कार्यात भाग घेता येईल. समाजातील क्षात्रधर्माची वृत्ती व निरंतर तयारीची ईर्ष्या जागृत ठेवण्याचे कार्य त्या गावोगावी जाऊन कुशलतेने करू शकतात. सैनिकांची शुश्रूषा करण्याची जबाबदारीही त्या सुलभतेने उचलू शकतात. या कार्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे.

आज देशात अनेक क्षेत्रे तरुण-तरुणींच्या कर्तृत्वाचे स्वागत करण्यास सिद्ध आहेत. भारताचे रक्षण करण्याची व स्वातंत्र्य चिरकाल टिकविण्याची जबाबदारी देशातील तरुण रक्तावर आहे. स्वतःचे रक्षण करू न शकणारा देश स्वाभिमानाने व स्वतंत्र कधीच राहू शकत नाही. म्हणून आपल्या कर्तृत्वाचा उपयोग प्रथम देशरक्षणासाठीच झाला पाहिजे, हे ध्येय देशातील प्रत्येक तरुणाने आपल्यासमोर ठेवले पाहिजे.