तो माणूस खासगी जीवनात कसा होता, याच्याशी वाचक म्हणून माझा काही संबंध आहे, असे मला वाटत नाही. तो ज्या वैशिष्ट्यांमुळे नावारुपाला आला, याबद्दल त्याने तपशीलवार लिहावे एवढीच माझी अपेक्षा असते व ती पूर्ण झाली, की मला समाधान वाटते. सगळीच माणसे गांधीजी, रसेल यांच्याइतकी महान कशी असू शकतील? तशी अपेक्षाच करणे चूक आहे, असे मला वाटते. शिवाय सगळ्यांनाच घडलेल्या घटनांचे सूक्ष्म विश्लेषण करता येणे शक्य नसते. त्यासाठी कलावंताची - विशेषतः साहित्यिकाची - स्वयंविश्लेषणाची व आविष्काराची सवय असावी लागते. म्हणूनच कलाकारांची आत्मचरित्रे अधिक अंतर्मुख, तर राजकीय - सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आत्मचरित्रे सामान्यतः अधिक बहिर्मुख असतात, असा अनुभव येतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आत्मचरित्रांतून खूप माहिती मिळाली, तरी कलावंतांची आत्मचरित्रे चटका लावून जातात. उदाहरणार्थ, 'हंसा वाडकरांचे आत्मचरित्र'. विशेषतः, मराठवाड्यातील एका खेड्यात त्यांनी काढलेली दोन-तीन वर्षे व एका मॅजिस्ट्रेट महाशयांनी त्यांच्यावर आणलेले निर्लज्ज संकट याची स्मृती मनाला अस्वस्थ करून जाते.
आत्मचरित्रांमधून सत्य लपविले जाणे, आत्मगौरव व आत्मसमर्थन होणे याला आपले सामाजिक जीवनातील दुहेरीपण ब-याच प्रमाणात जबाबदार असावे. म्हणजे आपले आदर्श, आपली तत्त्वे आणि व्यवहार यांत फरक असतो, विरोध असतो. या आजच्या सामाजिक वास्तवतेचा - हवे तर दांभिकतेचा म्हणा - आविष्कार आत्मचरित्रलेखनातही अपरिहार्यपणे होतो. म्हणून आत्मचरित्रांचे मोठेपण, मी, ती संपूर्ण सत्य सांगतात, की नाही, या कसोटीवर ठरवत नाही, आणि खरे म्हणजे, संपूर्ण सत्य हे शेवटी आकाशपुष्पासारखेच नाही काय?
राजकीय-सामाजिक कार्यक्षेत्रातील-किंबहुना सार्वजनिक जीवनात भाग घेणा-या व्यक्तीने आत्मचरित्र लिहिणे आवश्यक आहे; ते तिचे एक कर्तव्य आहे, असे मला वाटते. कारण त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचे धागेदोरे उलगडणे सुलभ होईल. आपल्याकडे वस्तुनिष्ठ, विश्लेषणात्मक इतिहासलेखन न होण्याचे एक कारण म्हणजे अशा सामग्रीचा अभाव, असे मला वाटते.
मी आत्मचरित्र लिहिणार का, अशी ब-याच वेळा मला विचारणा करण्यात येते. मी नियमितपणे डायरी लिहावी, असेही अनेक मित्र वेळोवेळी सुचवतात. पण ते काही मला आजवर जमलेले नाही. काही वेळा महत्त्वाच्या प्रसंगाच्या नोंदी मी करून ठेवतो, नाही, असे नाही. पण डायरी लिहिणे मात्र धावपळीच्या जीवनामुळे जमत नाही. गेल्या चार-सहा वर्षांत मी काही निवडक आत्मचरित्रे मुद्दाम मिळवून वाचीत आहे. ती निवड अशा चरित्रनायकांची आहे, की ज्यांचे आपल्यावर काही वैचारिक, बौद्धिक व भावनात्मक ॠण आहे. अलीकडे अधूनमधून माझ्या मनाला शंका चाटून जाते, की या वाचनाद्वारे मी माझ्याच आत्मचरित्र - लेखनाची तयारी तर करीत नाही ना? मी ज्या घटनांतून गेलो, त्याबद्दल इतरांना काय म्हणावयाचे आहे, याबद्दल मला उत्सुकता वाटण्याचेही कदाचित हेच कारण असावे. पण आतापर्यंत प्रसंगोपात्त लेखनाशिवाय अन्य लेखन मी केलेले नाही; करू शकलो नाही. आत्मचरित्र लिहायला मला आवडेल. पण त्यालाही कदाचित अवकाश आहे. मनाला तटस्थता आल्याशिवाय असले लेखन करणे शक्य नसते. मी जर कधी काळी आत्मचरित्र लिहिले, तर त्यात अभिनिवेश नसेल, माझे तेच खरे, असा हट्टाग्रह नसेल, अशी मला आशा आहे.