शब्दाचे सामर्थ्य ११८

३८

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा या महिन्यात ऐंशीवा वाढदिवस साजरा होत आहे, याबद्दल त्यांचे मनः पूर्वक अभिनंदन ! या निमित्ताने त्यांच्यासंबंधी गेली पन्नास वर्षे माझ्या मनात वसत असलेला आदरभाव व्यक्त करण्याची महत्त्वपूर्ण संधी मला मिळालेली आहे.

मी तर्कतीर्थांना प्रथम पाहिले, ते १९३० च्या कायदेभंगाच्या आंदोलनात. कराड येथील कृष्णेच्या घाटावर भरगच्च गर्दीच्या एका सभेत, वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचा एक तरुण शास्त्री महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीत आपले प्रेरणादायक विचार मांडीत होता. उघड्या अंगावर बंगाली पद्धतीने घेतलेली खादीची शाल, चेह-यावर विद्वतेचे प्रखर तेज, अशी त्यांची मी पाहिलेली मूर्ती मला आजही आठवते; आणि त्यांच्या त्या दिवशीच्या व्याख्यानातील एक वाक्य माझ्या मनात कायमचे घर करून राहिले आहे. ते सांगत होते, 'मी माझ्या गुरूंच्या पायांशी बसून सहा शास्त्रांत पारंगत झालो आहे; आणि आता मला या शास्त्रांचे रूपांतर शस्त्रांत करावयाचे आहे. ही मोठी शास्त्रे आता शस्त्रे बनली नाहीत, तर हिंदुस्थानात कायमची गुलामगिरी राहील.' भारताच्या पारतंत्र्याची कारणमीमांसा इतक्या थोड्या व नेमक्या शब्दांत केलेली मी पूर्वी ऐकली नव्हती. त्या चळवळीत त्यांचा - माझा परिचय झाला. पुढे क्रमाक्रमाने परिचयाचे रूपांतर राजकीय सहकार्य व हळूहळू गाठीभेटींत व पुढे मैत्रीत झाले.

गेल्या पन्नास वर्षांच्या या काळात त्यांच्याशी माझा निव्वळ राजकीय संबंध आला, असे नव्हे, तर त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कार्यांशीही माझा संबंध येत गेला. शास्त्रीबुवांचे व्यक्तिमत्त्व हे एक स्वतंत्र आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जसा भारतीय संस्कृती, इतिहास, साहित्य व तत्त्वज्ञान यांचा गाढा व्यासंग आहे, तसाच मार्क्सवाद व इतर पाश्चिमात्य तत्त्वज्ञान व इतिहासाचा खोल अभ्यास आहे. या सर्व व्यासंगातून जे व्यक्तिमत्त्व उभे राहते; ते एक प्रकारचे अपूर्व असे व्यक्तिमत्त्व आहे. त्या व्यक्तिमत्त्वाला तीक्ष्ण बुद्धिमत्तेची व समतोल विचारशक्तीची झालर लागली आहे.

त्यांच्या जीवनामध्ये राजकीय विचारांची वाढ एक विशिष्ट पद्धतीने झाली आहे. १९३० साली ते गांधीजींच्या सत्याग्रहाचे सैनिक होते. १९४० च्या आधीच मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मानवतावादी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचा त्यांनी स्वीकार केला. १९५० नंतर राजकारणाचा समतोल त्यांनी साधला, असे मला वाटते. पण ह्या सर्व कालखंडात त्यांची जीवनदृष्टी सुसूत्र अशीच राहिली. करुणा आणि मानवतावाद यांवर आधारलेली राष्ट्रीयता व वैचारिक क्रांतीची तितिक्षा, त्याचप्रमाणे सामाजिक व आर्थिक समतेसाठी मनात उठलेला कल्लोळ ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.