शब्दाचे सामर्थ्य ११३

३४

भाऊसाहेब बांदोडकर

कै. भाऊसाहेब बांदोडकरांची आठवण झाली, की त्यांचे हसरे, उमदे व राजबिंडे व्यक्तित्व डोळ्यांसमोर येते. माझ्या-त्यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असताना आणि नंतर दिल्लीतही अनेक वेळा गाठी-भेटी झाल्या. अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा झाल्या. राजकारणातही विरोधी भूमिकांत आम्ही वावरलो. पण भाऊसाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी वाटणारा आदर, जिव्हाळा कायम राहिला. कारण मला वाटते, की त्यांच्यांत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या मातीच्या गुणांचा मिलाफ होता. जिद्द, करारीपणा, स्पष्टवक्तेपणा आणि गरिबांविषयीची आस्था या गुणांत ईश्वरभक्ती, कला-साहित्यप्रेम, संगीत-नाटक यांचे वेड आणि अनौपचारिक जिव्हाळा यांचे इतके बेमालूम मिश्रण झाले होते, की त्यामुळे त्यांचे वेगळेपण नजरेत भरे.

भाऊसाहेबांचा दानशूरपणा हा सुविख्यात आहे. ते आयुष्यभर गरजूंना देतच राहिले. त्यामुळे त्यांच्याभोवती गरजूंची गर्दी असे. अर्थात त्या दानाचाही त्यांना अहंकार किंवा गर्व नव्हता. अगदी सहजतेने ते हजारो रुपयांचे दान करीत. गरीब विद्यार्थी, कलावंत, गरीब शेतकरी, आदी सर्वांना त्यांनी उपकृत करून ठेवले आहे. ते धनवान होते, पण धनलोभी नव्हते. आपली बाग एखादा रसिक मनुष्य ज्या आस्थेने आपुलकीने व कल्पकतेने, विविधतेने फुलवितो, त्यातील फळाफुलांना वाढवितो, तसेच भाऊंनी गोव्याच्या आर्थिक विकासासाठी केले. आपल्या मायभूमीमध्ये सर्व काही आधुनिक सोयी असाव्यात, सौंदर्य असावे, कला बहरावी, असे त्यांना वाटे, आणि म्हणून त्यांनी गोव्याविषयीची आपली स्वप्ने साकार करण्याचा आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रयत्‍न केला.

भाऊसाहेब राजकारणात आले आणि यशस्वी झाले, ते या त्यांच्या दीनदलितांच्या विषयीच्या कळकळीनेच, ते श्रीमंत होते, तरी त्यांना दारिद्र्याच्या दुःखाची कल्पना होती, गरिबांच्या प्रश्नांची जाण होती. त्यामुळे सत्तेवर ते आले, ते गरिबांच्या सुखाची चिंता वाहण्यासाठीच. म्हणून सत्ताधीश होऊनही ते नम्र राहिले. सत्तेविषयीची एक प्रकारची बेफिकिरी त्यांच्यांत होती, ती त्यामुळेच, त्यांचे जनतेशी असलेले नातेही थोरल्या भावाचेच होते. ते जनतेचा विचार करीत, तोही याच भावनेने. गोव्याची देखभाल करीत, जनतेत मिसळत, तेही याच भावनेने. त्यामुळे भाऊ हे त्यांचे नाव सार्थ झाले. त्यातील जिव्हाळा आणि कौटुंबिक आस्था हे त्यांच्या नेतृत्वाचे विशेष होते. राजकीय मतभेद त्यांच्या आड आले नाहीत. त्यामुळे विरोधकांना आणि मित्रांनाही भाऊ हा आधार वाटत राहिला. असे हे एकछत्री नेतृत्व गोव्याच्या राजकारणाला भाऊसाहेबांनी दिले. ते गोव्याच्या मुक्तिलढ्यात जसे उपयोगी पडले, तसे गोवा स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण झालेल्या विविध प्रश्नांतही उपयुक्त ठरले. राजकारणाने भाऊसाहेबांना मोठे केले नाही, तर भाऊसाहेबांच्या मोठेपणाचा राजकारणाला उपयोग झाला.

भाऊसाहेब हे रसिक होते, जिज्ञासू ग्रंथप्रेमी होते आणि विद्याप्रेमी सरस्वतीभक्त होते. पुस्तकांप्रमाणेच शिकारीवर त्यांचे प्रेम होते. ईश्वरावरील त्यांची श्रद्धा नितांत होती. गोव्यात त्यांनी मंदिरेही बांधली, गोव्याबाहेरच्या अनेक चळवळींत भाऊसाहेबांनी लक्ष घातले होते. त्यांना महाराष्ट्रात बहरत असलेल्या साहित्याविषयी, नाट्याविषयी किंवा संगीताविषयी नेहमीच ओढ वाटत असे. त्यामुळे अनेक कलावंत, साहित्यिक व विद्वान यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असत. अनेकांना त्यांनी पुढे आणले, मदतीचा हात दिला. त्यामुळे भाऊसाहेबांचे कार्यक्षेत्र नुसते गोव्यात राहिले नव्हते. त्याचा लाभ महाराष्ट्रातही अनेकांना झाला. दिल्लीतही राजकीय श्रेष्ठींशी ते जो संपर्क ठेवीत असत, त्यामुळे भाऊसाहेब हे छोट्या राज्याचे मुख्यमंत्री असूनही त्यांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला व दातृत्वाला प्रादेशिक मर्यादा कधीच आड आली नाही. त्यामुळे आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांची आठवण गोव्यातील व गोव्याबाहेरील जनतेला जाईच्या फुलांसारखी सुगंधी व ताजी राहिली आहे.