३७
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या कर्तृत्ववान बुद्धिमंतांना पं. नेहरूंनी प्रारंभीच्या काळात एकत्र आणले, जवळ केले, त्यांत डॉ. राधाकृष्णन् यांचे स्थान स्वतंत्र होते. डॉ. राधाकृष्णन् यांनी पूर्वायुष्यात केलेली अखंड ज्ञानोपासना, भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मीमांसक म्हणून असलेली त्यांची ख्याती, विद्यापीठाच्या शिक्षण क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून त्यांची असलेली कीर्ती ही सर्व पार्श्वभूमी त्यांच्यामागे होतीच. पण भारताच्या नवरचनेच्या प्रारंभ - पर्वातील प्रश्न सोडविताना अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना सामोरे जावयाचे होते. याची जाणीव राष्ट्रीय नेत्यांना होती. भारत म्हणजे नुसता भौगोलिक मर्यादा असलेला किंवा राजकारणाच्या गरजेतून निर्माण झालेला देश नव्हता, तर राष्ट्र म्हणून त्याच्यामागे प्राचीन समृद्ध सांस्कृतिक व्यक्तित्व होते. अशा वेळी त्या परंपरेची डोळस जाण असलेल्या, त्यातील सनातन मूल्यांचा वेध घेण्याची बौद्धिक क्षमता असलेल्या, पण आधुनिकतेचे भान असलेल्या व त्या परंपरेचा आधुनिकतेशी मेळ घालू शकणा-या दार्शनिकाची देशाला गरज असते.
डॉ. राधाकृष्णन् यांच्याकडे स्वतंत्र भारताच्या नेत्यांनी याच अपेक्षेने पाहिले. डॉ. राधाकृष्णन् यांची कामगिरी या दृष्टीने फार मोलाची आहे. राधाकृष्णन् यांचे जीवन प्रशांत होते, त्यात खळाळ नव्हता. पण त्याला आतूनच एक ओढ होती. त्यामुळे ते गतिमान होते. इतिहासाला कलाटणी देणा-या घटनांनी किंवा डोळे दिपविणा-या नाट्यमयतेने त्यांचे जीवन भरलेले नव्हते. ते सामान्य माणसांना सहजासहजी आकर्षित करणारे जीवन नाही. म्हणूनच त्याचे महत्त्व मुद्दाम समजावून सांगितले पाहिजे. दार्शनिक मुत्सद्दी, स्वतंत्र भारताच्या ध्येयधोरणाचे मार्मिक भाष्यकार म्हणून देशात आणि परदेशांत डॉ. राधाकृष्णन् यांनी केलेली कामगिरी भारत विसरणार नाही.
डॉ. राधाकृष्णन् यांनी परदेशांतील भारतीय राजदूत म्हणून केलेली कामगिरी किंवा वेळोवेळी परदेशांत दौरे काढून निर्माण केलेली भारताविषयीची सदिच्छा यांना राजकीय महत्त्व आहे. रशियातील त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली होती. विशेषतः, त्यांनी स्टॅलिनशी जोडलेले आपुलकीचे संबंध म्हणजे डॉ. राधाकृष्णन् यांच्या ॠजू, अनौपचारिक व्यक्तित्वाचा विजय होता. त्यांची ही अनौपचारिकता राष्ट्रपतिभवनातही त्यांनी संभाळली. सर्वांशी ते मनमोकळेपणाने, अनौपचारिकतेने वागत. त्यामुळे कोणालाही ते जिंकत असत. पण हा त्यांचा साधेपणाही शोभिवंत होता.
डॉ. राधाकृष्णन् यांच्या वक्तृत्वाची त्यांची स्वतःची अशी खास शैली होती. ते मंत्रमुग्ध करणारे होते. संमोहक होते. वक्त्याचे कोणतेही हावभाव नाहीत. आवाजाची फेक नाही. त्यातील नाटकी चढ-उतार नाहीत. मनाला स्पर्श करणारे भावनापूर्ण शब्द नाहीत. अशी कोणतीही रूढ लक्षणे त्यांच्या वक्तृत्वात नव्हती. तरीही ते प्रभावी ठरे. कारण त्यांच्या भाषणात भावनांपेक्षा बौद्धिकतेला आवाहन असे. सरस्वती तर त्यांचेवर सदैवच प्रसन्न असे.
त्यांची इंग्रजी भाषा इंग्रजांनाही मोहित करणारी होती. किमान शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याचे त्यांचे कसब विलक्षण होते. विचारमौक्तिकांच्या सरी डोळ्यांसमोर येत आहेत, असे वाटे. त्यांची शब्दकळा दार्शनिकाची होती. वाणी 'सुभाषित' होती. संस्कृतमधील अर्थपूर्ण व समयोचित वचने हे तर त्यांचे खास वैशिष्ट्य होते. पण त्यांची ही उद्धृते बाहेरून जोड लावल्यासारखी वाटत नसत. विचारांच्या विणीत बसविलेली असत. डॉ. राधाकृष्णन् यांचे शब्दलावण्य विचारगांभीर्य व अर्थघनता आणि या सर्वांना आपल्याबरोबर खेचून नेणारा त्यांचा ओघ ही त्यांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्ये प्राध्यापकीय नव्हती; खरे तर, ते ईश्वरी देणे होते.
- आणि या ओघवती वाणीवरून जन्मभर लक्षात राहील, अशी एक आठवण सांगण्यासारखी आहे.
काही वर्षांपूर्वी मी जागतिक बँकेच्या बैठकीसाठी वॉशिंग्टनमध्ये होतो. बैठकीच्या एका संध्याकाळी अधिकृत स्वागत-समारंभ होता आणि या समारंभात अक्षरशः शेकडो माणसे होती. भरलेले ग्लास घेऊन इतस्ततः हिंडणारे वेटर्स, हास्यविनोदाची खळखळ, गटागटाने चाललेल्या संभाषणाच्या आवाजाने, खरे म्हणजे, काही ऐकावयासही येणे अवघड. अध्यक्षांना भेटून हस्तांदोलनाने हजेरी देऊन मी अधून मधून भेटणार्या ओळखीच्या चेहर्यांना मानेने दाद-देत बाहेर पडणार्या दरवाज्याकडे निघालो होतो.