शैलीकार यशवंतराव ७९

'कृष्णाकाठ' मधील काव्यात्मक वृत्ती

यशवंतरावांच्या काव्यात्मक वृत्तीचे दर्शन 'कृष्णाकाठ'मध्ये अनेक वेळा होते.  यशवंतराव कृष्णा, कोयना, वेण्णा या नद्यांच्या उगमाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात, ''महाबळेश्वरात एकाच ठिकाणी पाच नद्या उगम पावतात.  डोंगराच्या वळचणीतून वेगवेगळ्या अंगांनी वाट काढीत सपाटीवरून धावताना दिसतात.  या पाच बहिणींचे परस्परावरचे प्रेम मोठे अमर्याद.  जन्मस्थळापाशी त्यांचे वेगवेगळे अस्तित्व दिसते.  पण ते तेवढ्यापुरतेच.  फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे, असे दिसावे तोच त्या हातात हात घालून, गोफ विणून एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर उडी घेतात.  मग मात्र यातील कृष्णा कोणती, कोयना कोणती, वेण्णा कोणती ?  दिसते ती एक धार.  गोमुखातून ही शुभ्र धार कुंडात उडी घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटा काढीत वेगवेगळ्या वाटांनी या बहिणी निघून जातात.''  अशा स्वरूपाचे यशवंतरावांचे काव्यात्मक वृत्तीचे सूक्ष्म दर्शन येथे घडते.  एवढेच नव्हे तर या काव्यात्मक आणि संवेदनक्षम वृत्तीचे दर्शन 'कृष्णाकाठ' मध्ये ठायी ठायी घडते.  देवराष्ट्राच्या विशाल आणि प्रसन्न वातावरणाचे वर्णन ते या गावाबद्दल वाटणार्‍या प्रेमापोटी करतात.  हे गाव ऐतिहासिक अवशेषांनी भरलेले आहे. इथे लेणी आहेत.  देवळे आहेत.  सर्वात जुने मंदिर म्हणजे समुद्रेश्वराचे.  म्हणजेच महादेवाचे गाव.  त्याला सागरोबा म्हणतात.  आसपासच्या टेकड्या, ॠषीमुनींच्या गुहा यासारखे वातावरण त्यांना प्रसन्न वाटे.  त्यामुळे सोनहिरा व त्या परिसराची आठवण सांगताना ते लिहितात, ''समुद्रात स्नान केले की त्रिलोकातील तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळते, अशी जुनी माणसे म्हणतात.  त्याचप्रमाणे अमृतसेवनामुळे सर्व जीवनरसांचे सेवन घडते, असेही म्हणतात.  इथे मात्र साक्षात समुद्रेश्वरच कुंडात उभा आहे आणि त्याच्याच प्रेमामृताने 'सोनहिरा' वाहतो आहे.  या लहानशा नदीला लोक ओढा म्हणतात.  तिथे डुंबण्यात माझे बालपण गेले.  त्यातील अमृतमय पाणी माझ्या पोटात आहे !  'सोनहिर्‍या'ची ही अमृतभूमी म्हणजचे माझे हे आजोळ.  माझा अंकुर अवतरला तो इथेच.''  असे बालपणातील ते मोरपंखी दिवस यशवंतरावांनी आपल्या मनात जपून ठेवले आहेत.  अशा या काव्यात्मकतेसोबत एक रसिकतेचा धागाही यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो.  

'कृष्णाकाठ'मधील चिंतनशीलता

काव्यात्मकतेप्रमाणे चिंतनशीलता हा यशवंतरावांच्या प्रकृतीचा धर्म आहे.  शिक्षण, छोट्या मोठ्या चळवळी, वकिली व्यवसाय, राजकारणानिमित्त पाहिलेल्या वेगवेगळ्या प्रदेशांनीही दिलेला अनुभव यांची समृद्धी, बहुश्रुतता, वाचन, चिंतनातून मनाचा झालेला विकास, चौफेर निरीक्षण, लोकसंग्रहामुळे झालेले मनुष्यस्वभावाचे विपुल ज्ञान अशा अनेक गोष्टींमधून चव्हाणांची चिंतनशीलता संपन्न झाली आहे.  ते म्हणतात, ''या पार्श्वभूमीवर माझे विचारविश्व बनत होते.  केव्हा केव्हा असे होई, की ज्यांचे म्हणणे ऐकावे, त्यांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटे, पण मग सगळ्यांचेच म्हणणे बरोबर कसे असेल ?  कोणते तरी एकच म्हणणे बरोबर असेल.  पण ते कोणते ?  याचा निर्णय आपण आपल्या मनाशी केला पाहिजे.  शेवटी मी मनाशी ठरविले की कोणताही निर्णय, कोणी सांगितले म्हणून आपण स्वीकारायचा नाही.  विचारांच्या क्षेत्रातील निर्णय हा आपला आपणच केला पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन केले पाहिजे.  चिंतन केले पाहिजे.''  अशा प्रकारे चिंतनशील वृत्तीने यशवंतराव स्वतःची ओळख करून देतात.  मुलभूत मानवी मन आणि सामाजिक प्रेरणा सर्वत्र एकसारख्या असल्याने आपण या सर्वांत कुठे बसू शकतो याची जाणीव ते व्यक्त करतात.  एवढेच नव्हे तर स्वतःला सुंदर रूपात मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्‍न आहे.

एकदा यशवंतराव, त्यांची आजी आणि आई असे तिघे मिळून पंढरपूरला गेले.  त्यावेळी त्यांना पंढरपूरच्या विठोबाचा आलेला अनुभव व नंतर त्यांनी केलेले भाष्य अतिशय महत्त्वाचे आहे.  ते म्हणतात, ''मी कुठल्या एका दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे असे कधी मानत नाही.  परमेश्वर म्हणून कुणी एक व्यक्ती कुठे बसून आहे आणि सर्व जग चालविते आहे असे माझे मत नाही.  परंतु आपल्याला न समजणारी अशी एक जबरदस्त शक्ती आहे व तिचे अस्तित्व मानणे आवश्यक आहे.  त्याशिवाय अनेक गोष्टींचा उलगडाच होत नाही.  बुद्धिवादाने ईश्वर आहे, हे सिद्ध करता येत नाही.  तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही.  म्हणून ज्या ठिकाणी शेकडो वर्षे समाजपुरुष नतमस्तक होत आला तेथे नतमस्तक होणे मी श्रेयस्कर मानतो.  मंदिराला जाण्याच्या पाठीमागची माझी भावना हीच आहे.  याच भावनेने मी तुळजापूरला जातो.  प्रतापगडला जातो.  यामध्ये देवभोळेपणाचा भाग नसतो.  परंतु हे करण्याने माझ्या मनाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभते.  ही गोष्ट मी कबूल केली पाहिजे.''  अशी ही चव्हाणांची चिंतनशीलता आत्मानुभवी व वास्तवाधिष्ठित आहे.