शैलीकार यशवंतराव ७८

पण कृष्णाकाठच्या सुबत्तेची निदान सोबत तरी लाभली आहे, असा एक दिलासा आम्हा मंडळींना वाटत असे आणि म्हणून कृष्णेबद्दलचे प्रेम हे बाळकडूसारखे माझ्या मनात आहे.''  असे हे निवेदन सरळ, सहज आणि मनाला भिडणारे आहे.  'कृष्णाकाठ'मध्ये कितीतरी सुभाषितवजा वाक्ये आली आहेत.  कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व संस्कारशील होते.  जे चांगले ते उचलावे असा त्यांचा पिंड होता.  त्यामुळे अर्थातच त्यांच्या शैलीत सुभाषितांची पखरण दिसते.  ''माझी आई निरक्षर होती पण मनाने अतिशय सुसंस्कृत होती.''  असे उद्‍गार ते आईबद्दल काढतात.  तर ''मोठी माणसे आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात.''  असा विचार ते सहज प्रकट करतात.  ते स्वतःसंबंधी लिहितात, ''माझे राजकीय शिक्षण माझ्या जीवनाच्या शाळेत होत होते.''  ''तर्क आणि जीवन नेहमीच हातात हात घालून चालते हे खरे नाही'' किंवा ''आयुष्यात काही गोष्टी केव्हा केव्हा आपणहून चालत येतात, तेव्हा त्यांना नकार न देता सामोरे जावे लागते.  त्या पुन्हा अशा येतीलच याची खात्री नसते.''  अशी कितीतरी विचारगर्भ व चिंतनशील सुभाषिते 'कृष्णाकाठ'मध्ये सहज येतात.  

संवादांचा वापर व विनोदी वृत्ती तर यशवंतराव चव्हाणांच्या भाषाशैलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य.  एखादा प्रसंग, त्या प्रसंगातील सर्व नाट्य, मानवी जीवनाचा संदर्भ आणि स्वतःच्या मनात उठलेले भावतरंग तेवढ्याच सहजतेने आणि परिणामकारकपणे ते प्रकट करतात.  एकदा यशवंतराव तमाशा पाहण्यासाठी पाच-सहा मित्रांना घेऊन जात असताना समोरून त्यांच्या शाळेचे शिस्तप्रिय ड्रिल मास्तर येताना दिसले.  या मुलांना पाहिल्यानंतर मास्तरांनी त्यांना विचारले, ''कोठे चाललात रे एवढ्या संध्याकाळी ?  'मी पुढे होऊन सांगितले, ''आम्ही स्टेशनवर चाललो आहोत.  तेथे टॉम शॉ येणार आहे.  त्यांना बघायचे आहे.''  

ड्रिल मास्तरांनी आम्हाला विचारले,
''हा कोण टॉम शॉ ?''
मी त्यांना सांगितले,
''हा बर्नार्ड शॉ चा भाऊ आहे.''
आमचे उत्तर मास्तरांना पटलेले दिसले.  आणि ते म्हणाले,
''जा, जा.  चांगले आहे.''

ते पुढे निघून गेल्यानंतर आम्हाला हसू आवरले नाही.  हसत खिदळत त्या मित्राच्या घरी पोहोचलो आणि त्याला ही कहाणी सांगितली.  तेव्हा फारच मजा आली.''  वरील संवादावरून यशवंतरावांची विनोदी वृत्ती तर दिसतेच शिवाय तेवढ्याच मिस्किलपणे ते शब्दकोट्या करताना दिसतात.  

यशवंतराव लहान असताना ते वारंवार आजोळी देवराष्ट्राला जात.  तेव्हा तेथे त्यांचा मित्र श्री. सखाराम म्हस्के व यशवंतराव यांच्यात वारंवार संवाद होत असे.  यशवंतराव ती आठवण अशी सांगतात, ''ते मला नेहमी म्हणायचे

''तू किती शिकणार आहेस ?''
मी सांगत असे
''जितके जास्त शिकता येईल, तितके मी शिकणार आहे.''
ते मला म्हणायचे
''मामलेदार होण्याइतके तू शिकशील का ?''
मी त्यांना उत्तर देई
''हो, इतके तर नक्कीच शिकेन.''

मग पाणावलेले डोळे करून ते मला म्हणायचे, ''हो, जरूर हो मामलेदार.  मामलेदार झाल्यानंतर विट्याला बदली करून घे.  मग पाटील आणि सगळी मंडळी जमली असताना तू मला नावाने हाक मारून आपल्या जवळ बोलावून घे.  माझी गावात केवढी मोठी इज्जत वाढेल !''  हा प्रसंग संवादामुळे आपल्या नजरेसमोर जसाच्या तसा उभा राहतो.  आणि त्यातून त्या व्यक्तीचे स्वभावही कळण्यास मदत होते.  निवडणूक जिंकल्यानंतर यशवंतराव घरी येतात तेव्हा ते व त्यांची पत्‍नी या दोघांमधील संवादही त्यांनी मार्मिकपणे वर्णन केला आहे.  एखादा प्रसंग, त्या प्रसंगातील सर्व नाट्य, मानवी जीवनाचा संदर्भ आणि स्वतःच्या मनात उठलेले भावतरंग यशवंतराव तेवढ्याच सहजतेने प्रकट करतात.