गांधी टोपी त्यांनी शेवटपर्यंत धारण केली. यशवंतराव कराडमध्ये डुबल आळीत राहात असत. त्यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा कसा प्रभाव झाला त्याचा उल्लेख त्यांनी या आत्मचरित्रामध्ये अनेक वेळा केला आहे. ''बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सत्यशोधक चळवळ किंवा पुढे तिला राजकारणामध्ये ब्राह्मणेतर चळवळ असे स्वरूप आले. ती वळवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी बहुजन समाजातल्या मुलामुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, वाचन केले पाहिजे, सार्वजनिक कामात भाग घेतला पाहिजे. अशा तर्हेने मानसिक व वैचारिक वातावरण त्यावेळी तेथे होते.'' अशा तर्हेने ब्राह्मणेतर व सत्यशोधकीय चळवळीचे संस्कार त्यावेळी झालेले होते. त्यांचे बंधू गणपतराव यांच्यामुळे सामाजिक संस्कार झाले हे यशवंतराव मान्य करतात. गणपतरावांचा सत्यशोधकीय चळवळीशी संबंध निकटचा होता. त्यामुळे यशवंतरावसुद्धा ओघानेच या चळवळीत सक्रिय सामील झाले. या अगोदर राजर्षी शाहू महाराज या चळवळीचे नेतृत्व करीत होते. १९२२ ला ते वारले. १९२० ते १९३२ पर्यंत भास्करराव जाधवांची सातारा जिल्ह्यावर पकड होती. १९२४ ला मुंबई कॉन्सिलवर ते सातारा जिल्ह्यातून निवडून गेले. त्यांचा प्रचार यशवंतरावांनी केला. पण १९२९ च्या दरम्यान ते खर्या अर्थाने राष्ट्रीय चळवळीकडे आकर्षित झाले. यशवंतरावांचे राजकारण व्यापक होते. ते कोणाचा द्वेष किंवा भेदभाव करत नसत.
लोकमान्य टिळकांच्या काळापासून सातारा जिल्ह्यात राजकीय परिषद भरत असे. १९३१ च्या अधिवेशनात भाई बागल यांना बोलावण्यात आले. बागल यांनी या परिषदेत राजकीय मागण्यांबरोबर आर्थिक स्वरूपाच्या मागण्याही सुचवल्या. यशवंतराव याबाबात लिहितात, ''परंतु पिळल्या जाणार्या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते, ते या राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात माधवराव व पर्यायाने आम्हीही यशस्वी झालो. याचा आम्हाला आनंद वाटला. स्वराज्याच्या चळवळीला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न त्यांना स्पर्श केल्याशिवाय आपली स्वातंत्र्याची चळवळ पुढेच जाऊ शकणार नाही.'' चव्हाणांनी भाई बागलांच्या शेतकरीवादी विचारांना पाठिंबा दिला. बागल सत्यशोधकी विचारांचे हेते. राजकारणात निकोप समाजकारणाचा पाठिंब असावा लागतो. आर्थिक प्रश्न समाजकारणापासून व राजकारणापासून दूर ठेऊन चालणार नाहीत, असे चव्हाणांना वाटते. यशवंतरावांनी म. फुले यांचे विचार स्वीकारले. त्यांची त्यांनी प्रशंसा केली. तसेच जग जरी फार पुढे गेले आहे तरी मार्क्सला वाट पुसतच पुढे जावे लागेल असा विचार ते मांडतात.
हरिजन चळवळीच्या गांधीकाळात यशवंतरावांचे लक्ष हरिजनोद्धाराकडे लागले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे त्यावेळी अग्रेसर होते. त्याकाळी कराडमध्ये हरिजनवस्तीत शाळा चालवण्यासाठी दररोज यशवंतराव चव्हाण शिक्षक म्हणून जात असत. त्यांनी विठ्ठल रामजींना व्याख्यानासाठी कराडला येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी चव्हाणांना जो सामाजिक अनुभव आला तो आजही महत्त्वाचा आहे. देशाच्या अवनतीचे कारण विषमता हे आहे असाच अनुभव त्यांना आला. यावरून म. फुले व महर्षी शिंदे यांच्या कार्याचे मोल त्यांच्या लक्षात आले.
वर्णभेद व जातिभेद त्यावेळी होता. यशवंतराव शिकत असताना त्यांना संस्कृत शिकण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्या शास्त्रीबुवांचासुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. ''मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकवणार नाही.'' असे संस्कृत शिकविणार्या शास्त्रीबुवांनी सरळ व स्वच्छ शब्दांत त्यांना सांगितले. कोट्यवधी गरीब शेतकरी मागासलेपणात बुडून गेले आहेत. त्यांचे भवितव्य काय ? त्यांच्यासारखी अनेक तरुण मुले शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे अंधारात आहेत, असा विचार त्यांच्या मनात येई.