यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व मुळातच सहृदय आणि रसिक असल्याने त्यांच्या लेखनातही त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. साधे आणि मोजके शब्द, छोटी व सुटसुटीत वाक्ये ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यासोबत साध्या साध्या उपमाही त्यांच्या लेखनात अगदी सहजपणे येऊन जातात. यशवंतरावांवर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैचारिक भाषणांचा प्रभाव पडला होता. कराडच्या घाटावरील भाषणाची ते अशी आठवण सांगतात, ''तुम्ही बसला आहात तो घाट जसा गरम झाला आहे तशी तुमची बुद्धी व मने गरम झाली पाहिजेत. देशाची तुमच्याकडे आज ही मागणी आहे.'' अशा साध्या पण भावपूर्ण शब्दांचा ते सहज उपयोग करतात. आचार्य भागवतांबद्दल यशवंतराव लिहितात, ''आचार्य भागवत हे सर्वंकष बुद्धीचे गृहस्थ होते. प्रखर विद्वत्ता आणि तितकीच परखड वाणी ही त्यांची दोन मोठी आयुधे होती. ते अनेक विषयांवर तासनतास बोलत असत आणि ते ऐकूनसुद्धा कोणी मनुष्य बहुश्रुत, ज्ञानी झाला असता !'' अशा या व्यक्तीची आठवण ते सहज सांगून जातात. या त्यांच्या आठवणी उत्कट व प्रत्ययकारी आहेत, शिवाय सूचकही आहेत.
यशवंतराव आयुष्यामधल्या विविध सामाजिक, राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी झाले. या चळवळीत एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या लेखनातील आवेश, जिद्द आणि शब्दफेक 'कृष्णाकाठ' मध्ये ठायीठायी पाहावयास मिळते. लेखकाच्या मनातील आशय प्रकटीकरणासाठी शब्दांची हेतुतः केलेली मांडणावळ म्हणजेच त्या कलाकृतीची वाङ्मयीन शैली आणि त्या कलाकृतीला सहाय्यभूत होणारी शब्दकला म्हणजेच शैली यशवंतरावांनी आशय व्यक्त करणसाठी वापरली आहे. एक वाणी म्हणजेच वाचा. दुसरे त्यांचे लेखन. यशवंतराव लिहितात किंवा बोलतात ते स्वतःसाठी नव्हे तर विराट जनसमुदायासाठी. ते व्यासंगी आणि अभ्यासू ललित लेखक आहेत. त्यांची भाषाशैली मर्हाटमोळी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व जसे प्रसन्न, उमदे विविध अंगी आहे त्याचप्रमाणे त्यांच्या लेखनशैलीचे सामर्थ्य तिच्या पारदर्शक प्रामाणिकपणात आहे. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातून आणि जीवनातून त्यांच्या शैलीचा उगम झाला आहे. छोट्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे त्यांच्या लेखनशैलीवर उमटलेले आहेत. त्यामुळेच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार त्यांच्या 'कृष्णाकाठ'मधील शैलीवर उमटलेला आहे असे म्हणता येईल.
'कृष्णाकाठ'मधील भाषाशैली
यशवंतरावांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली, पण पुढे स्वकर्तृत्वाने ते मोठे झाले.  भरपूर लोकप्रियता मिळाली.  कायदा आणि राजकारण, समाजकारण यांसारख्या क्षेत्रांत त्यांनी काम केले.  असे असले तरी त्यांचे जीवन अगरी सरळ बिनगुंतागुंतीचे होते.  त्यांचे लिहिणे-सांगणे हे सुतासारखे सरळ, मऊ-मुलायम आहे.  त्यामुळे त्यांना जे सुरेश रीतीने समजले आहे किंवा समजावून घेतले आहे ते तितक्याच समर्थपणे मांडण्याकडे यशवंतरावांचा कल राहतो.  विनाकारण गुंतागुंतीची लेखनशैली ते वापरत नाहीत.  त्यांच्या विविध आणि संमिश्र व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या भाषाशैलीत उमटलेले दिसते.  भाषाशैली प्रांजळ, प्रामाणिक, निष्कपट, सरळ इ. गुणांनी समृद्ध आहे.  यशवंतरावांच्या भाषाशैलीला वकृत्वशैलीचा बाज आहे.  प्रवाहीपणा हा यशवंतरावांच्या शैलीचा विशेष म्हणता येईल.  कोट्या, छोट्या छोट्या गोष्टी, किस्से, विनोद, सुभाषितवजा वाक्ये, वाक्प्रचार, म्हणी, सहज बोलीतील सुंदर अन्वर्थक शब्द इ. गुणसंपत्तीने यशवंतरावांची भाषाशैली नटलेली आहे.  अगदी सरळपणाने यशवंतराव हे सारे मांडतात.  साजशृंगार नाही की नखरे नाहीत.  जे काही यशवंतरावांनी लिहिले ते सर्वसामान्यांच्या उद्बोधनासाठी.  त्यामुळे आपली लेखनशैली संवादी, बोलघेवडी, प्रसन्न आणि सोप्या विणीचीच असली पाहिजे अशी जाणीव दिसते.  त्यामुळे मनातील तळमळ सामान्य लोकांच्या भाषेत त्यांच्यापुढे मांडण्याची यशवंतरावांची हातोटी विलक्षण आहे.
'कृष्णाकाठ'चे लेखन म्हणजे यशवंतरावांच्या बालपणापासून ते जीवनात मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याच्या काळापर्यंतचा एक आलेखच होय.  या आत्मचरित्रात सर्व काही सांगण्यासाठी जी गद्यशैली वापरली आहे ती अतिशय ओघवती आणि प्रसंगानुसार वळणे घेणारी आहे.  त्यासाठी लेखकाने आपल्या अकृत्रिम भाषाशैलीचा वापर केला आहे.  एखादा प्रसंग सांगताना त्यांच्या शब्दसामर्थ्याला भरती येते.  लेखक जणू आपल्याशी बोलतो आहे असा भास आपल्याला होतो.  ''कृष्णाकाठी जसे कुंडल नव्हते व आजही नाही त्याचप्रमाणे देवराष्ट्रही कृष्णाकाठी नव्हतेच व आजी नाही; पण तरीसुद्धा आम्ही सर्वजण स्वतःला कृष्णाकाठची माणसे समजतो त्याला कारण आहे.  कृष्णेत आणि कुंडल किंवा देवराष्ट्र यांच्यामध्ये चार दोन मैलांचे अंतर आहे.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			