यशवंतराव चव्हाण सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीमध्ये सक्रीय सहभागी झाले होते. त्याकाळात ती चळवळ गनिमीकाव्याची सशस्त्र चळवळ होती. याच चळवळीस पुढे 'पत्री सरकार' असे संबोधिले गेले. सरकारबरोबर आणि सरकारधार्जिण्या समाजकंटकांबरोबर लढणे हे या चळवळीने महत्त्वाचे काम मानले होते. यशवंतराव चव्हाण या चळवळीत गुंतले होते. सर्वत्र पोलिसांचे फार मोठे दडपण होते. १४ जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी कराड पोलिसांनी सौ. वेणूताईंना अटक केली. सौ. वेणूताईंना या चळवळीचा अनुभव नव्हता. यामुळे त्यांच्या प्रकृतीवर आणि मनःस्थितीवर त्याचा परिणाम होईल असे यशवंतरावांना वाटत होते. पुढे वेणूताईंची तब्येत बिघडली. निश्चित निदान होईना म्हणून त्यांना फलटणला पाठविले. पण तेथे माहेरीही त्यांची तब्येत बिघडल्याचे कळताच यशवंतराव त्यांना भेटण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना पकडले व दहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आणि येरवडा येथील तुरुंगात रवानगी झाली. तेथे त्यांनी राज्यक्रांतीसंबंधीचे बरेच वाङ्मय वाचून काढले; पण आपण सौ.वेणूताईंची कोणतीच अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याची जाणीव मात्र त्यांना सदैव राहिली.
इ.स.१९४२ च्या उग्र आंदोलनानंतर इ.स.१९४६ च्या निवडणुकीत यशवंतराव व काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व निवडणुकांमध्ये सरळ, बिनखर्चाची, तत्त्वनिष्ठ व जनतेच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्यावर निवडून आलेली ही निवडणूक होती. या यशानंतर त्यांनी आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा सौ. वेणूताईंनी यशवंतरावांना ओवाळले. त्याविषयी ते लिहितात, ''तेव्हा माझे डोळे पाणावले. मी तिला ऐकू जाईल असे सांगितले, 'वेणूताई, या यशात तुझाही वाटा आहे.' ती किंचित हसली आणि म्हणाली, 'अशी वाटणी करायची नसते.'' या प्रसंगाच्या अनुरोधाने समीक्षक प्रा.स.शि.भावे असा अभिप्राय देतात, ''या एका प्रसंगात यशवंतराव या लेखकाची लेखनामागील वृत्ती प्रकट होते. त्यांचे डोळे पाणावतात. तथापि त्यांची लेखणी पाणावत नाही. तिच्यामुळे पुस्तकांची पाने पाणावत नाहीत. कारण या आत्मचरित्रात महत्त्व चरित्राला आहे. 'आत्म'ला नाही. यशवंतरावांची ही 'आत्म'विलोपी वृत्ती जशी आयुष्यात तशी या आत्मचरित्रातही उतरली आहे. हे 'कृष्णाकाठ'चे मोठे यश आहे.''
'कृष्णाकाठ' यशवंतरावांच्या राजकीय जीवनाचा पट उलगडून दाखवत असले तरी त्यांची कौटुंबिक कहाणी वाचत असताना वाचकांचा कंठ भरून येतो. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती, लहानपणीच वडिलांचा झालेला मृत्यू, चळवळीच्या धामधुमीच्या काळात दोन्ही बंधूंचा मृत्यू, अशा स्थितीत आईची व पत्नीची झालेली मनोवस्था या चिंतेने यशवंतरावांची झालेली भावाकुल मनःस्थिती यांसारखे काही प्रसंग वाचले की हृदय हेलावल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर यतिन्द्रनाथाच्या आत्मबलिदानाने यशवंतरावांच्या मनाची झालेली सुन्न अवस्था यांसारखे कितीतरी प्रसंग रोमांच उभे करणारे आहेत.
'कृष्णाकाठ' मधील समाजचित्रण
राजकारण म्हणजे निकोप समाजकारण. चव्हाणांचे समाजकारण निरोगी होते. हे 'कृष्णाकाठ'मधील त्यांच्या विश्लेषणावरून लक्षात येते. या आत्मचरित्रात अगोदर परिसराची भौगोलिक माहिती देऊन इतिहास कथन केला आहे. ह्या ग्रामीण पार्श्वभूमीवर त्यांच्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेविषयी पुढे जी कणव व कैवार दिसून आला त्याची बीजे आढळतात. यशवंतरावांचे विविध समाजाच्या संबंधाचे निरीक्षण व परीक्षण मोठे होते. यशवंतरावांच्या लहानपणातील सणगर, धनगर, मुसलमान, रामोशी यांचा त्यांना लाभलेला शेजार व सहवास हा त्यांच्या आयुष्यातील एक विशेष ठेवा होता. या संदर्भात ते लिहितात, ''आमच्या आजोळच्या घराशेजारी असणार्या मुसलमान कुटुंबाशी असणारा घरोबा, त्याचप्रमाणे शेजारच्या सणगर आणि धनगर मंडळींशी असणारा जिव्हाळा, हे त्यावेळचे सगळे आठवले म्हणजे जातिजमातीतील वैमनस्य ही समस्या पुढे केव्हा, कशी निर्माण झाली हे समजत नाही. एकमेकांशी माणुसकीच्या नात्याची बांधीलकी होती.'' ब्राह्मण समाजाविरूद्ध जो उठाव झाला त्याचीही आठवण ते नमूद करतात. त्यावेळी त्यांना स्वतःला अनुभवास आलेली विषमता, सामाजिकता, पक्षपात या बाबी त्यांनी योग्य शब्दात मांडल्या आहेत. त्यांच्यावर गांधी, नेहरु यांच्या राजकारणाचा परिणाम तरुण वयात झाला.