शैलीकार यशवंतराव ८२ प्रकरण १०

प्रकरण १० - बंध-अनुबंध

यशवंतरावांचे आत्मकथनपर स्फुटलेखन निरनिराळ्या नियतकालिकांतून सुरुवातीस प्रसिद्ध झाले.  हे स्फुटलेख 'महाराष्ट्र टाईम्स', 'केसरी', 'सह्याद्री', 'सकाळ', 'राजस' आदी नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत.  तसेच 'ॠणानुबंध', 'यशवंतराव चव्हाण : शब्दांचे सामर्थ्य', 'युगांतर', 'विदेश दर्शन' यासारख्या त्यांच्या काही पुस्तकांत आत्मकथनपर लेख संग्रहित झाले आहेत.  या आठवणींमध्ये सुरेख वीण गुंफली आहे.  या विविध लेखांमध्ये अनुभवांचा, भाषणांचा, समावेश होतो.  त्याचप्रमाणे सहवासात आलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचाही समावेश होतो.  यातून यशवंतरावांचे बहुमुखी, बहुश्रुत व चिंतनशील व्यक्तिमत्त्व प्रकट होत जाते.  तसेच यशवंतरावांचे व त्यांच्या लेखनशैलीचे विविध पैलू व वैशिष्ट्ये प्रकट होतात.  त्यातून त्यांच्यातील साहित्यिक अंगाचे स्वरूप जाणवल्याशिवाय राहात नाही.  त्यामुळेच या आत्मकथनपर लेखांचे मोल हे वाङ्‌मयीनदृष्ट्या लक्षणीय आहे.

आत्मकथनपर लेखाची जातकुळी ही इतर वाङ्‌मयप्रकारापेक्षा वेगळी आहे.  कारण काल्पनिक वातावरणापेक्षा वास्तवपूर्ण जीवनाचे सत्यकथन या लेखनात असते.  यामधून प्रकट होणारे जीवन अपरिचित किंवा असंभाव्य वाटत नाही.  म्हणून 'स्व'च्या जीवनातील कुतूहल व आस्था निर्माण करते.  त्याचबरोबर या स्फुटलेखनातील 'कडूगोड' आठवणींचा सूर साधारणपणे रम्य, गहिरा, खेळकर व मोकळा असतो.  तसेच लेखकाच्या जीवनासंबंधीचे हे लेखन तारतम्याची जाणीव ठेवून, शोधक बुद्धीने केलेले असते.  त्यामुळे या लेखनातील सूर गंभीर व सघन असतो.  पण अशा आत्मकथनपर लेखनातून व्यक्तीच्या जीवनाचे समग्र आणि यथार्थ चित्रण साकारणे कठीण असते.  याला कारण हेतुभिन्नता व सुटसुटीतपणा हेच होय.  या स्फुटलेखनामध्ये विशिष्ट, मोजके व लक्षणीय वाटणारे घटना-प्रसंग निवडून त्यांची गुंफण केली जाते.  

आत्मकथनपर स्फुट लेखनाचा मुख्य हेतू आपले विचार, भावना यांना वाट करून देणे हा होय. प्रत्येक माणसाला आपल्या मनातील विचारांना आणि भावनांना वाट करून दिल्याने बरे वाटते.  मग ते विचार, भावना सुखाचे असो अथवा दुःखाचे असो.  आपली सुखदुःखे कुणाला तरी सांगावीत आणि ती कुणीतरी मन लावून ऐकावीत असे प्रत्येकाला वाटत असते.  जीवन जगत असताना जे दुःखाचे अनुभव माणसाला येतात ते कुणाजवळ तरी मोकळेपणाने सांगून टाकले पाहिजेत म्हणजे मनावरील भार हलका होतो.  सुखात्मक अनुभव सांगितले तर आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगात कुणीतरी वाटेकरी झाला याचा आनंद माणसाला निश्चित मिळत असतो.  हे सारे कुणाला तरी सांगणे शक्य नसते.  तेव्हा आपली जीवनकथा लिहून हा आनंद माणसाला मिळवता येतो.  यासाठीच आत्मकथनपर स्फुट लेखनाचा उपयोग केला जातो.

यशवंतरावांसारखी व्यक्ती साहित्यिक असल्याने त्यांच्या या निवेदनात साहित्यिक म्हणून असलेल्या भूमिकेला महत्त्वाचे स्थान प्राप्‍त होते.  यशवंतरावांसारख्या साहित्यिकांची समाजात निर्माण झालेली प्रतिमा, वाचकांचे या व्यक्तीच्या जीवनाबद्दलचे व वाङ्‌मयीन निर्मितीबद्दलचे असलेले कुतूहल याची नेमकी जाणीव आत्मकथनपर लेखन करणार्‍या या लेखकाला आहे.  या पूर्ततेसाठी घटना व प्रसंग यांची सुंदर गुंफण करून त्यांनी आत्मकथनपर लेखन केले आहे.  'माझ्या आयुष्यातील आशा-निराशेचे क्षण', 'जीवनाचे पंचामृत', 'सातव्या मजल्यावरील चढ', 'नियतीचा हात', 'भाषण म्हणजेच संवादच', 'सोनहिरा', 'स्वातंत्र्याचा पहिला दिवस', 'शांतिचितेचे भस्म', 'केल्याने देशाटन', 'माझी जीवननिष्ठा' इत्यादी यशवंतरावांच्या आत्मकथनपर लेखांची शीर्षके जरी डोळ्यांखालून घातली तरीसुद्धा या लेखाची प्रतिची येते.  यशवंतरावांनी जीवनातील पुष्कळ वेळ विशिष्ट ध्येयाच्या पूर्तीसाठी, साहित्य निर्मितीसाठी घालवला आहे.  त्यामुळे त्यांच्या या आत्मनिवेदनात वाङ्‌मयविषयक विषयांना आवर्जून स्थान मिळाले आहे.  तसेच लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून आपल्या जीवनाचे अवलोकन ज्या लेखांमध्ये त्यांनी केले आहे त्या लेखांतील निवेदनाचा सूर बराच मोकळा आहे.  समंजस व गंभीर वस्तुनिष्ठतेचा प्रत्ययही त्यातील काही लेखांमधून येतो.  उदा. 'नियतीचा हात' हा त्यांचा लेख त्यांच्यावर घडलेल्या संस्कारांचा व नियतीने आणि योगायोगाने त्यांना कशी साथ दिली याचा प्रांजळ असा पुरावा आहे.  यशवंतरावांच्या जीवननिष्ठा व वाङ्‌मयीन निष्ठा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  जीवन जगणे आणि वाङ्‌मयनिर्मिती करणे यात ते फरक करत नाहीत.  प्रत्यक्ष जीवन जगत असताना त्यांचा जो अर्थ लागत गेला, लावला गेला त्याची अपरिहार्य परिणती वाङ्‌मयनिर्मितीच्या रूपाने होत गेली.