शैलीकार यशवंतराव ७१

त्यामुळे वाङ्‌मयाच्या इतिहासात यास स्थान द्यावे लागते.  हे आत्मचरित्र म्हणजे सहज सायंकाळी शिळोप्याच्या गप्पा माराव्यात आणि एका प्रसंगातून दुसरा प्रसंग सांगावा या पद्धतीने 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्राची मांडणी झाली आहे.  हेच या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य होय.  'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रामध्ये एकूण तीन प्रकरणे आहेत.  'जडणघडण' (१९१३-३०), 'वैचारिक आंदोलन' (१९३०-३७) आणि निवड (१९३७-४६).  जडणघडणमध्ये चरित्रनायकाचा जन्म, जन्मग्राम, जन्मकाळची त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, कुटुंबाचा विस्तार, परिवार, शेजार, त्यांच्यावर बालपणी घरात किंवा पुढे शाळेत किंवा इतरत्र झालेले संस्कार, ते संस्कार करणार्‍या व्यक्ती किंवा परिस्थिती, शिक्षण, वाचन इ.चे संस्कार, सामाजिक किंवा इतर कार्यात पडल्यावर आलेले अनुभव, जोडले गेलेले मित्र, त्यांचा जीवनावर आणि मनावर झालेला परिणाम, जीवनात मिळालेले यशापयश, त्यासंबंधी चरित्रनायकाची भावना इत्यादीसंबंधीची माहिती पहिल्या प्रकरणात मिळते आणि यशवंतरावांचे व्यक्तिचित्र वाचकांपुढे साकारत जाते.  त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी 'कृष्णाकाठ'मधून अनवधानाने वर्णन करायच्या राहून गेल्या असतील, काही विस्ताराने आल्या असे वाटेल.  पण हे मुद्दे गौण आहेत.  यशवंतराव ही व्यक्ती, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्या व्यक्तिमत्त्वाची घडण आणि त्याची वैशिष्ट्ये यांचे दर्शन 'जडणघडण'मध्ये होते आणि ते पुरेसे स्पष्ट आहे.  त्यातल्या लहान मोठ्या सर्व आठवणींत त्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे आणि बहुधा प्रत्येक आठवणीतून यशवंतरावांच्या स्वभावाचा एखादा पैलू किंवा जीवनातला महत्त्वाचा अनुभव किंवा जीवनदृष्टिकोन प्रकट झाला आहे.  ते स्वतःकडे अलिप्‍तपणे, तिर्‍हाईतपणे पाहू शकतात.  आपल्या उपकारकर्त्यांचे, सहाय्यकांचे ॠण मोकळेपणाने, कृतज्ञतेने मान्य करतात.  आपल्या अपकर्त्यांवरही स्वच्छपणे, धीटपणे बोलतात.

त्यांच्या मनावर सगळ्यात खोल आणि सगळ्यात चिरस्थायी ठसा जर कोणाचा असेल तर तो त्यांच्या आजोळचा, देवराष्ट्राचा व आई विठाईचा.  ते म्हणतात, ''देवराष्ट्र हे माझे जन्मगाव आणि आजोळ असल्यामुळे माझ्या अगदी लहानपणाच्या आठवणी ह्या देवराष्ट्राच्या आठवणी आहेत.  माझ्या जीवनातल्या पहिल्या चार-पाच वर्षांच्या ज्या आठवणी आहेत त्या देवराष्ट्र, वडगाव, कुंडल, ताकारी या गावांशी निगडित आहेत.  ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी हा माझ्या जीवनाचा श्रीगणेशा आहे.  पुढे मी राजकीय कामानिमित्त आणि सरकारी कामासाठी देशांतर्गत आणि सर्व जगातही खूप फिरलो.  तरी पण या परिसराची ओढ माझ्या मनात कायमची राहिली आहे.  असे का होते ते मला माहिती नाही.  पण वस्तुस्थिती ही अशी आहे.''  अशी बालपणाची आठवण ते सांगतात.  देवराष्ट्र हे खेडे त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे.  कुतूहल आणि जिव्हाळा वाटावा असाच हा परिसर आहे.  देवराष्ट्र या गावाशी यशवंतरावांचा लहानपणी सतत संबंध येत असल्याने तेथील सामाजिक परिस्थिती, माणसे, आलेले अनुभव हा त्यांच्या जीवनाचा अपरिहार्य भाग झाला.  सर्व स्तरातील लोकांची संगत आणि निकटचा सहवास यामुळे त्यांच्या मनात त्या समाजाविषयी कायमची आपुलकी निर्माण झाली.  या आजोळच्या गावातील कितीतरी आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.  त्या अनुभवाची शिदोरी त्यांना एक प्रकारचे शिक्षण देत होती.  कार्यकर्ता म्हणून मनाची तयारी आणि सामाजिक जाणिवांची माहिती त्यांना यातून हळूहळू मिळत गेली.  या परिसराबद्दल ते लिहितात, ''देवपण घेऊनच जन्माला आलेले हे गाव.  पण त्यांच्यात राष्ट्र ही कल्पना सामावलेली आहे.  सागरोबाच्या चोहोबाजूनी आनंदवनाने भरलेल्या.  धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ येथे सार्थपणे वावरत असतात.  सुपीक जमिनीत बी पेरले म्हणजे चांगले फोफावते.  तशी इथली माणसे आणि मने !  या मातीचा गुण आणि माणसांचे मोल हिंडता-फिरता दिसू लागते.''  यावरून यशवंतरावांची देवराष्ट्र या गावाबाबतची ओढ स्पष्ट होते.  कोणत्याही व्यक्तीला निसर्गापासून आणि समाजापासून अलग राहून जीवन जगताच येत नाही.  यशवंतरावांनीसुद्धा या निसर्गरम्य परिसराचा लहानपणी मनमुराद आस्वाद लुटला.  'कृष्णाकाठ'मध्ये यशवंतरावांनी देवराष्ट्र व आजूबाजूच्या परिसराचे सुंदर चित्र रेखाटले आहे.  ते लिहितात, ''संपूर्ण कृष्णाकाठ हा माझ्या प्रेमाचा, आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.  महाबळेश्वरात उगमापासून निघावे आणि कृष्णामाईच्या काठाकाठाने थेट राजमहेंद्रीपासून तिच्या मुखापर्यंत जावे असे मला नेहमी वाटते.  बदलत्या पात्राची भव्यता पाहावी, निसर्गाचे सुंदरपण मनात साठवावे, तीरावरच्या गावांना भेटी द्याव्यात, लोकांच्या ओळखी करून घ्याव्यात, पिकांनी डोलणारी शेते पाहावीत असे अजूनही मनात येते.''  यशवंतरावांच्या जीवनाला अधिक व्यापकपणा येण्याला कृष्णाकाठचा परिसर व देवराष्ट्रातील वास्तव्य अधिक कारणीभूत ठरले.  किंबहुना येथेच त्यांच्या बालमनावर अनेक संस्कार झाले.  त्यामुळे कृष्णाकाठची आठवण झाली म्हणजे बालपणातील आणि ऐन तारुण्यातील जीवनाची जडणघडण करणार्‍या काळाची आठवण येऊन मन आजही कसे हेलावून जाते असे कृष्णाकाठ व देवराष्ट्राच्या आठवणी सांगताना ते लिहितात.